नानू भाग 4
नानू भाग 4
भाग::-- चौथा
पेरणीसाठी मदत करायला आलेल्या वसंताने वारकऱ्याचं घर व त्यात तात्या आले म्हटल्यावर आपला प्रोग्राम घरात करण्यापेक्षा खळ्यातच करणं बरं असा विचार करत वासंतीकडून डबा घेत तो झोपण्यासाठी तात्या आधीच खळ्यात आला. नंतर तात्या आल्यावर खळ्यात झोपणाऱ्या सालदारानं तात्याची रजा घेत घरी निघाला.दोन तीन दिवसांपासून एकसारखी झड सुरूच असल्यानं खळ्यात व गावात जिकडे तिकडे पाणीच पाणी साचलं होतं.तात्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये आपली बाज टाकली.तर वसंतानं तात्याचा अडसर नको म्हणून पत्र्यांच्या शेडच्या काटकोनात असलेल्या गुरांच्या गोठ्याच्या दाराशी आपली बाज टाकत झडकनाची थंडी काढण्यासाठी बाटली रिचवू लागला.गोठ्यातल्या रद्दा व दगडात बांधलेल्या भिंताडाला लागून गाई,म्हशी, बैल,वासरं शांतपणे कोरडा कडबा चघळत पाण्यामुळं झालेल्या माशा चिलटे आपल्या झुलत्या शेपट्यांनी हाकलत होते. वारा मध्येच सूर्रर्रsss,सायं सूर्रर्र झर्रर्रर्रsss वाहत होता.वास्तविक वळीवानंतर वादळ तर शमलं होतं व आता पुनर्वसुचा 'तरणा' पाऊस सुरू झाला होता.पण वातावरणात अचानक थंड हवेची वावटळ उठत होती.भिंताडाजवळच्या जुन्या विस्तीर्ण बाभळी झिंझोट्या धरून हालवावं तशा हवेनं हालत होत्या. तात्यांना त्याचाच अचंबा वाटत होता.पावसानं या वेळेस शांत रितं होणं झरणं त्यांना अपेक्षित होतं तर चिन्हे मात्र अलगच होती. पण तात्यांना त्याहीपेक्षा नानूचीच जास्त रूखरूख निर्माण झाली म्हणून मांत्रिकानं घोळ केल्यानं सनावदला काल जरी नानू आला नाही पण आज येथे नानू नक्कीच काहीतरी अस्तीत्व दाखवेल याची त्यांना मनात खात्री नी धास्तीही होती.
तात्यांनी झोपण्याचं सोंग घेतलं तरी पण त्यांना झोप लागलीच.
टल्ली झालेला वसंता अंथरूण न टाकताच खट्या बाजल्यावर उताणा झाला व घोरू लागला.पाऊस मात्र बरसतच होता. गोठ्याबाहेर साचलेल्या पाण्यात कुणीतरी चालत येत असल्याची पावलं चिबाकss.. डिबाकsss...टूबाक टूब वाजली.बैलांनी खाडकन उठत कान ताठ केले.गाई म्हशी मारक्या व तिरक्या नजरेनं पाहत गव्हाणीस तर काही खुट्यास बांधलेल्या दोरांना हिसके देऊ लागल्या.तरण्या खोंडांनी खुरानं व शिंगांनी खालची ओली माती व मुरूम उकरायला सुरूवात केली. पावलांचा आवाज तसाच काटकोनात पत्र्याच्या शेडकडे वळताच गोठ्यात हळूहळू शांतता झाली. तात्यांची शाल वाऱ्यांनं अंगावरणं उडाली.त्यांना झोपेतच वाखरीच्या आसपास वारीचा ठेपा असतांना दहा बारा वर्षांपूर्वी जशी इवली मिठी पडली होती तशीच मिठी पडल्याचं स्वप्न तरळू लागलं.नी सुरू झाला स्वप्नाचा की सत्याचा भास आभास प्रवास.....
घोरणाऱ्या तात्यांना मिठीतच स्फुंदके जाणवू लागले.
.
.
"तात्या! दरवर्षी तुम्ही वारीला जातांना कधीच मी हट्ट करत नव्हतो पण आई गेली, वहिनी घरात आली व बदलत्या वागणुकीचे चटके जाणवू लागताच मागच्या वर्षी मी तुमच्या मागे लागलो.पण तुम्हाला ते कळलंच नाही .अन्यथा आज..."
"....."
स्वप्नाचा प्रवास प्रवाही झाला.बाहेर धुदाना फुटुन बरसणाऱ्या पावसागत.
तात्या वारीला गेलेले.विठा दादा शेतात.रविवार असल्यानं नानू घरीच होता.वहिणी संगमनेरहून आलेल्या भावासोबत गप्पा मारता मारता उठली.
"नानू चल जरा कोठ्यातून बाजरी काढायचीय मदत कर!"
वसंता उठून पुढच्या दाराशी थांबला.
नानू अंधार खोलीत सव्वा मापी बाजरी भरलेल्या कोठ्याजवळ आला.झाकण वर करून वहिणीनं नानूस वर उचलत कोठ्यात उतरवलं.कोठा निम्मापेक्षा जास्त खाली.
"नानू मी घमेली आणते थांब ती भरून दे मधून" नी क्षणात वरचं झाकण पडलं की पाडलं? पण नानू आत अंधारात कोठ्यात बंद झाला.काही कळायच्या आत झाकणाची कडी नकोशात घुसली.नानू गुदमरू लागला.त्यानं वहिणीला आरोळ्या मारायला सुरुवात केली.पण वहिणी पुढच्या घरात घमेली आणायला मुद्दाम निघालेली.नानू लाथा बुक्क्यांनी कोठा ठोकू लागला.हवा कमी होऊ लागली तशा लाथा बुक्क्या वाढल्या पण झाकण उघडेना व वहिणीही येईना.श्वास आता काही क्षणाचीच सोबत करून वहिणीसारखाच दगा देणार याची न कळत्या वयातील नानूस जाणीव होताच तो क्षीण केकाटू लागला.पण तितक्यात दैव बलवत्तर की काय सालदार गडी मागच्या दारातून पोतं घेऊन खावठी घेण्यास आला.त्यानं आवाज ऐकून कोठ्याचं झाकण उघडून धापा टाकणाऱ्या नानूस बाहेर काढलं.नानूनं गड्याच्या कमरेला रडतच गच्च मिठी मारली.सालदार गडी अधिकार नसतांनाही वयानं व माणुसकीच्या नात्यानं संतापला." ताई ध्यान कुठं होतं!आवाज ऐकूनही झाकण उघडत नव्हता.पोरास मारायचा बेत होता का?"
"बाबा नाही हो नानूस कोठ्यात उतरवून घमेलं घ्यायला आली तितक्यात गॅसवर ठेवलेलं दुध मांजर पित असल्यानं त्यास हुसकवत होते इकडे मात्र भिंतीला टेकलेलं झाकण खाली पडल्यानं नानूच्या हाका ऐकूच आल्या नाही.
वसंता मात्र वहिणीकडं 'सोपवलेलं एक काम धडं करत नाही ' या रागानं पाहत होता. गड्यानं खावठी न घेताच नानूस सोबतच घरी नेलं.नानूची भिती व रडणं थांबतच नव्हतं.
संध्याकाळी विठा दादा आल्यावर गड्यानं सारं सांगत नानूस दादाच्या हवाली केलं.पण नवव्या संसारात रममाण दादांचं मन वासंतीवर शंका घ्यायला धजावेना.
नंतर नानू मात्र खळ्यातच गड्या सोबत झोपू लागला नंतर उशीरानं विठा दादा खळ्यात आला की झोपलेल्या नानूस आपल्याजवळ घेई.
बाणाई आक्का सलवाडीला आली.नानू आक्काला बिलगत रडू लागला.पण आक्काला वाटलं आई गेली,तात्या वारीला व आपण सासरी म्हणून नानू रडत असावा.तिला गांभिर्य कळालच नाही व नानूनही सांगितलं नाही.पण आक्का निघाली तेव्हा तो रडतच आक्का मागं लागला."आक्का तात्या येईपर्यंत मला तुझ्यासोबत यायचं.मला इथं नाही रहायचं"
"नानू हे काय नविन खूळ काढलं.विठा दादा आहे ना! शिवाय आता चार पाच दिवसाचा तर प्रश्न आहे.तात्या येतीलच वारीहून.म्हणून शाळा चुकेल तुझी नको येऊस."
बाणाई नविन संसार व सासू सासरे यामुळं नानूस समजावू लागली.
भेदरलेला नानू मात्र खळ्यातून बस स्टॅण्डपर्यंत गाडीमागे रडत रडत धावतच गेला.ओल्या पापणकाठाआड गाडी गेली व बाणाई आक्काही गेली नानूस कायमचा सोडून.
'चार दिवसात तात्या वारीहून परत येतील 'हे बाणाईचं वाक्य वसंताला पुन्हा पुन्हा आठवू लागलं.बहिणीला पूर्ण इस्टेटीची मालकीण करायची असेल तर वडिलांनी सोपवलेली कामगिरी तात्या परतण्याआधीच उरकावीच लागेल हे त्यानं मनाशीच ठरवलं.
आषाढ दशमीच्या राती म्हणजे एकादशीची पहाट त्यानं ठरवली.
पहाटे खळ्यात झोपलेला विठा घरी दुधाच्या बाकी बादल्या घेण्यासाठी गेला. वसंता तिकडनं जनावराची भिजलेल्या पेंडेच्या घमेल्या घेऊन आला. त्यानं नानूस उठवलं. नानू अर्धवट झोपेत होता. त्यानं गाईचं वासरू सोडलं ते गाईस धावू लागलं. निमित्त करत वसंता खेकसला.
"नानू वासरू नीट पकड कमरेत लाथ घालीन"
नानूनं जोर लावून वासरू ओढलं पण तोपर्यंत वसंतानं सोडलेली गायच वासरूजवळ येत वासरूस चाटू लागली व वासरू पुन्हा गाईच्या आचेआ लागलं. वसंतानं हे पाहताच संतापत जवळच खळ्यात कालच छप्पर शाकारण्यासाठी तोडलेल्या बेटातील बांबूचे हात दोन हात लांबीचे तुकडे पडलेलेच होते. वसंतानं बांबूचा तुकडा उचलला नी नानूच्या कानाच्या भागात डोक्यावर जोरानं फटकावला. नानूनं एकाच दणक्यात चढ्ढी भरली. तो पिसाटल्या कुत्र्यावाणी गनंमनं खळ्यात धावू लागला. त्याच्या कानातून रक्त निघालं. तो गरागरा फिरू लागला. तोच संधी साधत जागेवरच काम तमाम करण्यासाठी वसंता त्याच्याकडं धावला. त्या ही स्थितीत नानूनं बचावासाठीजवळ पडलेली बादलीच डोक्यात उलटी अडकवली. पण तरीही वसंतानं कानाच्या दुसऱ्या बाजूस त्याच ओल्या बांबूच्या तुकड्यानं दणका लगावला. बादली डोक्यातच चीप होऊन अडकली. नानू धडपडत गाईच्या गव्हाणीत तोंड खुपसुन पडला. त्याची छातीतील धडपड मंदावू लागली. वसंताच्या डोळ्यातील आग कमी झाली. आता त्यानं नियोजनानं सोडलेल्या वाघ्या गाईचा दोर नानूच्या कमरेस गुंडाळत गाठ मारली. अडकलेली बादली बखोट्यास पायाचा रेटा देत काढून खळ्याबाहेरील विहीरीत फेकली. नी त्याच बांबूनं वाघ्या गाईच्या पाठीत जोराचे दोन तीन दणके हासटले. वाघ्या गाईनं शेणाची चिरकांडी उडवत बस स्टॅण्डकडं नानूसहीत धावायला सुरुवात केली. नानू दोरासहीत चेंडूसारखा उधळत ओढला जाऊ लागला. तोच मागून येत वसंतानं थांबू पाहणाऱ्या गाईच्या पाठीत पुन्हा टोला गणकावला. आता मात्र गाय बेफान उधळत स्टॅण्डकडं झेपावली. रस्त्यावरच्या खळ्यामध्ये नानू रक्ताळला. स्टॅण्डवरच्या गाई बांधण्याच्या खुंटांमध्ये नानू ठोकला जाऊ लागला. मापाडी पोपट्यानं गाईला धरत पुचकारत थांबवलं. गाय कावरीबावरी होत थयथयाट करत जेमतेम थांबली. पोपट्यानं कमरेच्या दोराची आवळलेली गाठ दगडानं तोडली पण तो पावेतो आधीच तमाम झालेला नानूबाबत पोपट्यानं बोंब ठोकली.
तात्यांची स्वप्नमालिका खंडीत होताच घामाघूम होत ते उठले. बाहेर पडणाऱ्या पावसात आता हवेची एकसारखी सुरकी सुरू झाली होती. गोठ्यात झोपलेल्या वसंताला आताच जाऊन उभा तोडावा असं त्यांना वाटलं. पण आता आपणास आपला उमगलंय आपला नानू कसा गेलाय. घाई उपयोगाची नाही. सकाळी पाहू कायदेशीर काय करायचं ते. असा विचार करत ते तळमळत पडले. त्यांना मागच्या वर्षी वारीतच विठोबाच्या दर्शन रांगेतून फोन येताच खाजगी वाहनानं परतावं लागल्याचं आठवलं. त्यावेळेस आपण विठा व पोपट्यावर विश्वास ठेवून काहीच न करता नानूचा विधी आटोपून चूक केल्याचा पश्चात्ताप वाटू लागला. नानूचा दोर डकून मृत्यू हा धक्काच अनपेक्षित असल्यानं खुनाची शंकाही मनात आली नाही. असल्या विचारातच त्यांना पुन्हा झपकी लागली.
नानू आता तात्याकडंनं गोठ्यात वसंता जवळ आला. पावसाची तीन चार दिवसाची झड मंदावली पण वारा सुरू झाला. तृप्त जमिनीतील जुन्या झाडांची मुळं सैल झाली.गोठ्याजवळच्या बाभळी आता झिंझोळू लागल्या रद्दा व दगडाची भिंतीतल्या तड्यातही हवा शिरत तडे वाढले. तोच काडकाड आवाज करत बाभळीची फांदी मोडून सारा विस्तार भिंताडावर पडत मोडलेला खोडाचा अणकुचीदार भाग खाली बाजल्यावर झोपलेल्या वसंतावर पडला. पोटातील कोथळा बाहेर येत तो प्रतिक्षिप्त क्रियेनं सेकंदाच्या काही भागात तो झोपेतून उठला. तोच बाभळीचा शाखाविस्तार पडल्यानं आधीच हवेनं तडे फाटलेलं भिंताड गडगड करत पुर्ण मलदा वसंतावर पडला. रद्दा व दगडांच्या ढिगाऱ्यात तो अर्धवट उठलेल्या व पोटात खोड घुसलेल्या अवस्थेत गाडला गेला. नानू जवळच समाधानानं पाहू लागला. फांदीच्या आवाजानं तटातट दोर तोडत जनावर पळणार तोच भिंताडाचा खच त्यांच्यावर ढासळला तरी ते कुड मोडत मागं सरल्यानं बचावत खळ्यात धावली. आवाजानं तात्या उठले. त्यांनी बॅटरी चमकावत पाहीलं नी गाव गोळा केला. तो पावेतो पहाट झाली. लोक गोळा होताच ढिगारा व झाड मोडलेलं दिसलं पण गुरं बाहेर दिसताच साऱ्यांना हायसं वाटलं. तो पावेतो विठा ही धावत पळत आला. तात्यांना सुखरूप पाहताच त्यानं सुटकेचा नि:श्वास टाकला. पण अचानक त्याला वसंता दिसेना म्हणून तात्यांना विचारलं. नी मग धावपळ सुरू झाली. जो तो मिळेल ते साधन घेऊन ओला ढिगारा बाजुला फेकू लागले. चिखल, दगड, फांद्या यात वसंता... वासंती व नंतर आलेल्या विश्वासरावांनी टाहो फोडला. पण तात्या मनातल्या मनात विश्वासरावांना बजावते झाले.
"विश्वासराव या तात्याला जरी व्यवहार कळत नसला तरी नियतीला व्यवहार अचूक कळतो व ती हिशोब चुकता करतेच."
कालचक्र फिरलं. दिवस भरले. बाणाईस मुलगा झाला. अगदी तेच सोनेरी कुरळे केस! वसंता गेला त्याचवेळी गर्भातल्या हालचालीचा बाणाईला अर्थ उलगडला.
बाळाचे पापे घेत "नानू भावा आता तुला कधीच दूर सारणार नाही मी!" म्हणताच चिमुकल्या बाळानं टॅव करत रडायला सुरुवात केली...