प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

3.0  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

मलाला युसूफजई

मलाला युसूफजई

14 mins
390


मलाला हे नाव आता जगासाठी अपरिचित राहिले नाही.शौर्य,साहस,धैर्य,प्रबळ इच्छाशक्ती आणि स्वकर्तृत्वाने संपूर्ण जगासाठी ती आदर्श अन प्रेरणास्त्रोत ठरली आहे.एक शालेय विद्यार्थिनी जिने तालिबान्यांच्या विरोधात आणि स्त्रियांच्या अधिकारासाठी/शिक्षणासाठी तसेच शांततेसाठी रणशिंग फुंकले.तालिबान्यांनी घातलेल्या मुलीच्या शिक्षणावरील बंदी विरोधात आवाज उठविला.परिणामाची तिला जाणीव नव्हती असे नाही.पण मलालाने हे आवाहन धाडसाने स्वीकारले.तिचा हा आवाज कायमचा बंद करण्यासाठी प्रतिक्रियाही उमटल्या.त्यांच्या कार्यात अडसर ठरत असलेल्या मलालावर शस्त्रधारी तालिबाण्याकडून जिवघेणा हल्ला अर्थात बेछुट गोळीबारही करण्यात आला होता.अशाही स्थितीत ती डगमगली नाही.मृत्यूवर मात करून तितक्याच ताकदीने पुन्हा खंबीरपणे उभी राहिली.तिच्या या लढाऊ बाण्याने ती संपूर्ण जगभरासाठी विशेषतः महिलांच्या आत्मसन्मानासाठी लढणाऱ्यासाठी पथदर्शक व प्रेरणास्त्रोत ठरली आहे.शालेय जीवनातील हा प्रवास तिच्यासाठी वाटते तितका नक्कीच सोपा नव्हता.परंतु कणखर मलालाने आपल्या धैर्याने दहशतवादाच्या विरोधात तसेच स्त्रियांच्या शिक्षणासाठी/शांततेसाठी प्रस्थापितांच्या विरोधातील उभारलेला यशस्वी लढा हा संपूर्ण जगाने अनुभवलाच नाहीतर देश-विदेशात तिच्या कार्याची दखल सुद्धा घेतली आहे.अशा या लढवय्या मलालाचा जन्म १२ जुलै १९९७ रोजी पाकिस्तानातील खैबर पख्तुनवाला प्रांतातील स्वात जिल्ह्यातील मिंगोरा येथे एका पश्तून सुन्नी मुस्लिम कुटुंबामध्ये झाला आहे.तोर पेकाई युसूफजई आणि जियाउद्दीन युसुफजई हे तिचे माता-पिता.पारंपारिक समाजव्यवस्थेत जन्मलेल्या मलालाच्या गावी मुलाच्या जन्माप्रमाणे मुलीचा जन्म हा तितका शुभ मानल्या जात नव्हता.तेथील तांडयामध्ये मुलाच्या जन्माचे स्वागत गोळ्याच्या फ़ैरी झाडुन केल्या जात तर मुलीला पडद्याआड दडविण्याची प्रथा आहे. मलालाच्या बाबतीत मात्र असे काही घडले नाही.याउलट तिच्या जन्माचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.मलाला हे नाव पाकिस्तानातील "जोन ऑफ आर्क"समजल्या जाणाऱ्या माईवाड येथील प्रेरणादायी "मलालाई" या नावावरून ठेवण्यात आले."मलालाई" या शब्दाचा अर्थ "शोकमग्न किंवा दुःखी"असा आहे.कुटुंबात लाडकी आणि वडीलांसाठी "जानीमून"असलेल्या मलालाने हे नाव स्वकर्तृत्वाने आनंददायी आहे असे सिद्ध करावे या उद्देशाने तिचे आजोबा रोहुल अमिन तिला मलाला या नावाने हाक मारीत असत.मलाला नावाचा अर्थ "जगातील सर्वात जास्त आनंदित मुलगी"असा आहे.

  

  मलालाचे कुटुंब तसे सुधारणावादी,परिवर्तनवादी सुसंस्कृत असे कुटुंब.मलालाची आई अतिशय प्रभावशाली अशा कुटुंबाशी संबंधित आणि धार्मिक, सद्गुणी प्रवृत्तीची.स्त्रियांना मस्जिदमध्ये प्रवेश नसतानाही घरीच दिवसातून किमान पाच वेळा नमाज पडणे हा तिचा नित्यक्रम.वडील सुधारणावादी तसेच पर्यावरणवादी,उत्कृष्ट कवी,एका शाळेचे मालक आणि एक शैक्षणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख तर आजोबा भारत-पाक फाळणीपूर्वी भारतात शिकलेले अन सुधारणावादी नेत्याच्या संपर्कातील व्यक्तिमत्व. भारत-पाक फाळणीच्या झळा त्यांच्याही कुटुंबाला सोसाव्या लागल्या.अशा उदारमतवादी मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधित असलेल्या मलाला उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या प्रांतातील स्वात जिल्हा म्हणजे पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण आणि डोंगरी भागातील स्वर्गा समान हा प्रांत आहे असेच मलाला वाटत असे. हिंदुकुश पर्वतांनी वेढलेला आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने/सौंदर्याने नटलेला हा प्रदेश पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.तसेच बौद्ध धम्मातील हीनयान आणि महायान पंथीयांचे मुख्य ठिकाण म्हणून स्वात राहिले आहे.अशा या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वातावरणात आणि सुसंस्कारी,सुधारणावादी कुटुंबात मलालाची जडण-घडण झाली आहे.मोहम्मद पैगंबर,येशू ख्रिस्त,भगवान गौतम बुद्ध,मार्टिन ल्युथर किंग,महात्मा गांधी आणि मदर तेरेसा हे तिचे अध्यात्मिक प्रेरणास्त्रोत आहे.तिच्या कुटुंबियाकडून तेथील तांडयाच्या शौर्यकथा,थोर पश्तून नेते,संताच्या कथा नेहमीच ऐकत आली आहे.बालमनावरील हाच प्रभाव तिच्यासाठी खऱ्या अर्थाने दिशादर्शक ठरला आहे.   

 

मला तशी न समजण्याच्या वयापासूनच कुशाग्र बुद्धीची आणि हुशार होती.मलालावर झालेल्या तालिबानी हल्ल्यानंतर एका टीचरनी मुलाखती दरम्यान सांगितले होते की,मलाला अगदी अडीच वर्षाची असताना ती आपल्या शाळेत (तिचे वडील एका शाळेचे मालक होते) ती आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलांमध्ये बसत असे. निरागस मलाला न समजण्याच्या वयात केवळ अवलोकन व निरीक्षण करीत असे.शालेय जीवनात मात्र ती स्वात घाटीतील शाळेत नेहामीच अव्वल राहिली आहे.तल्लख बुद्धिमत्तेची पण साधारण दिसणारी मलाला ही भविष्यात सर्वांसाठी "खास"ठरेल असा कयास कदाचित तिलाही आला नसावा!!!

     

मलाला तशी अल्लड,भावंडांशी भांडणारी,मारामाऱ्या करणारी,लोकांना विचलित करण्यात आनंद मानणारी,वडिलांना चिडविणारी पण तितकीच धाडसी व साहसी मुलगी.तिच्या दृष्टीने पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण असलेल्या स्वात प्रांतावर तालिबान्यांनी ताबा मिळविल्यानंतर स्वर्गाचे रूपांतर दहशतीत झाले.तालिबानी पाकिस्तानमध्ये प्रवेशल्यानंतर तालिबानी आणि सरकार यांच्यातील सततच्या संघर्षामुळे येथील पर्यटनाला जबरदस्त धक्का बसला.जनजीवन विस्कळीत झाले.शांतता तर कधीचीच भंग झाली होती.२००९ मध्ये सरकारशी झालेल्या एका शांतता करारान्वये स्वात प्रांत तालिबान्यांच्या अधिपत्याखाली आला होता.तालिबानी हे अफगाणिस्तानातील कट्टरपंथी इस्लामिक राजकीय चळवळ म्हणून या संघटनेची ओळख आहे.या चळवळीतील नेते हे प्रखर सनातनी आणि पारंपारिकतेने घट्ट जखडलेले नेते आहे.त्यांचा स्त्रिया व मुली बाबतीत कठोर असा दृष्टिकोन आहे.त्यांनी महिलांना/शाळकरी मुलींना सामाजिक आणि सांस्कृतिक नियमात चांगलेच जखडून ठेवले आणि तसे कठोर नियम सुद्धा घालून दिले होते.महिला व शाळकरी मुलींच्या दृष्टीने हे अतिशय जाचक आणि विविध बंधनात घट्ट अडकविणारे होते.त्यांच्या इच्छित ध्येयपूर्तीसाठी त्यांनी दहशतवादाचा आश्रय घेतला होता.


   तालिबानने २००७ ते २००९ पर्यंत स्वात घाटीवर पूर्णपणे वर्चस्व मिळविले.त्यांचा प्रवेश व दहशती कारवायानी/हस्तक्षेपामुळे स्वात घाटीचे चित्र पूर्णपणे बदललेले होते.शांततेचे रुपांतर दहशतीत कधी झाले हे कळलेच नाही.कट्टरपंथी मानसिकतेने डोके वर काढले होते.शांततेच्या पूर्णपणे चिंधड्या उडविल्या आणि दहशतवादाला खतपाणी घातले.स्त्रिया बाबतीतील दृष्टिकोन तर अधिक कडक आणि स्त्रियांना गुलाम बनविणारा होता.स्त्रियांना एकांतात डांबून ठेवणे,नोकराप्रमाणे राबवून घेणे, आणि चार भिंतीच्या आत राहतील अशी तजवीज करण्यावर त्यांचा अधिक भर होता.त्यांच्या वाढत्या दहशतीने शाळकरी मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते.इतकेच नव्हे तर स्वात घाटीत मृत्यूने थैमान घातले होते.लोकांचे विव्हळणे आणि वेदना यापेक्षा वेगळे काही ऐकू येत नव्हते.अशी विदारक स्थिती स्वाद घाटीमध्ये झाली होती.सुंदर पर्यटनाचे केंद्र असलेले स्वाद सह मिंगोरा पूर्णपणे दहशतीच्या खाली आले होते.


  १५ जानेवारी २००९ नंतर मिंगोरामध्ये कोणतीही मुलगी शाळेत जाणार नाही असा फतवाच तालिबान्यांनी काढला.इतकेच नव्हे तर त्याच रात्री मिंगोरातील रस्त्यावर गोळीबाराचा वर्षाव सुद्धा करण्यात आला.१०० पेक्षा अधिक मुलींच्या शाळा उद्ध्वस्त करण्यात आल्या.मुलीना शाळेत जाण्यावरील बंदी बरोबरच टीवी पाहणे,संगीत ऐकणे,मैदानावर खेळणे,बाजारात जाणे,डान्स करणे,ब्युटीपार्लर ला जाणे इत्यादीवर बंधने लादलीत. एकंदरीत स्त्रिया व मुलीच्या वाट्याला गुलामीचे जिणे आले होते.त्याचबरोबर २००८ अखेर पर्यंत जवळपास ४०० शाळाही बंद करण्यात आल्या होत्या.तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली स्वातं घाटीत मुलीच्या शिक्षणाची अत्यंत दूरावस्था झाली होती.

 

 स्वात खोऱ्यातील अशा प्रकारच्या बदलाचा मलालाच्या बालमनावर चांगलाच परिणाम झाला.म्हणून तिने महिलांचे हक्क आणि शालेय मुलींच्या शिक्षणासाठी तालिबान्यांच्या विरोधात बंड पुकारले. पाकिस्तानमध्ये महिलांकरिता अनिवार्य शिक्षणाची मागणी लावून धरली.दहशतवादा विरोधातही तिने तितक्याच ताकदीने लढा उभारला.वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी पेशावर येथील कॉन्फरन्समध्ये "हाऊ डेयर द तालिबान टेक अवे माय बेसिक राईट टू एज्युकेशन" या विषयावरील भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.१८ फेब्रुवारी 2009 मध्ये मलाला यूसुफजईने "राष्ट्रीय करंट अफेयर्स शो कॅपिटल टॉक"वर तालिबाण्याच्या विरोधात प्रखर असे मत मांडले.त्यानंतर अवघ्या तीन दिवसातच तालिबानी नेता मौलांना फजलुल्ला यांनी एफ एम रेडिओ स्टेशनवर महिलावरील प्रतिबंध हटविणे आणि १७ मार्च पासून परीक्षेसाठी शाळेत जाण्याच्या परवानगीची घोषणा केली मात्र बुरखा घालणे अनिवार्य केले होते.येनकेन प्रकारे दहशतीला पोषक असे वातावरण निर्माण करणे आणि महिलावरील बंधने अधिक कडक करण्याच्या धोरणाने स्वात घाटीतील लोकांसह महिला स्वतःला असुरक्षित समजत असे!! म्हणून महिलांसाठी न्याय विषयक भूमिका घेऊन ती तालिबान्यांच्या विरोधात खंबीरपणे उभी राहिली.विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चॅनेलवर आपली भूमिका मांडू लागली.१९ ऑगस्ट २००९ ला "कॅपिटल टॉक"मध्ये तिने दुसऱ्यांना हजेरी लावली.ती दूरचित्रवाणीवर जाहीररित्या येऊन मुलींच्या शिक्षणाचे समर्थन करू लागली.

 

   दहशतवाद्यांनी आपल्या नियंत्रणाच्या काळात मुलींच्या शेकडो शाळा उद्ध्वस्त करून टाकल्या.मुलीनी शिक्षण घ्यावे असे त्यांना अजिबात वाटत नव्हते हाच मलालासाठी काळजीचा व चिंतेचा विषय होता.म्हणून मुलीचे सक्षमीकरण, संघटन आणि जनजागृती तसेच मुलीच्या शिक्षणावर भर देऊ लागली.शिक्षण हे मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. मुलाप्रमाणेच मुलींसाठीही तितकेच आवश्यक आहे.मुलींना सुद्धा स्वतंत्र व मुक्तपणे शिक्षणाचा अधिकार असावा असा तिचा आग्रह होता.परंतु स्वात घाटीतील वातावरण मुलीच्या शिक्षणासाठी नक्कीच पोषक नव्हते.दहा वर्षाच्या मलालानी ४०० पेक्षा अधिक शाळा उध्वस्त होताना पाहिले.तसेच मुलींच्या शिक्षणाप्रती उदासीनता तिच्या दृष्टी आड जात नव्हती.त्यातील एक प्रसंग विशद करताना मलालाने आपल्या मैत्रिणीचा एक  अनुभव कथन करताना सांगितले की,तिच्या एका धाडसी मैत्रीणचे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी लग्न उरकुन टाकले.तिला शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचे होते.ती मुलगी असल्याने डॉक्टर ऐवजी तिला लग्नाच्या बेडीत अडकावे लागले आणि अवघ्या १४ व्या वर्षी तिच्यावर आई बनण्याची वेळ आली.असे जगात कित्तीतरी उदाहरण आहे.केवळ मुलगी असल्याने तिच्यावर अशी वेळ आली होती.तिची व्यथा मलाला साठी प्रेरक ठरली.मलालाने असे प्रकार मोडून काढण्याचा संकल्प करण्याबरोबरच सर्वदूर ठिकाणच्या मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पुढे भर देऊ लागली.तसेच स्वातमध्ये स्त्रियांना/मुलींना कठोर शिक्षा आणि लोकांना ठार मारण्याचे सत्र थांबता थांबेना.सुंदर स्वप्नाचे रूपांतर भीतीदायक/भयानक स्वप्नास होण्यास वेळ लागत नव्हता.शिक्षण घेणे हा हक्क न होता गुन्हा ठरवला जात होता.स्त्रियांची चहुबाजूंनी होणारी कोंडी मलाला पाहू शकत नव्हती.मलाला साठी हे क्लेशदायक होते.अशावेळी तिच्या समोर दोनच पर्याय होते. एक म्हणजे मारले जाण्याची व शांतपणे प्रतीक्षा करण्याची आणि दुसरे म्हणजे जुलमी अत्याचारास विरोध करण्याचा निर्णय घेणे.महिलांचे हक्क डावलणे,निर्दयपणे लोकांना ठार मारणे आणि इस्लामाचा गैरवापर करणे यासारख्या दहशतवादी कृत्यांना आम्ही निमूटपणे पाहू शकत नव्हते.दहशतवाद्यांना सडेतोड जाब विचारण्याचा निर्णय तिने घेतला.आपण एखाद्या स्वतंत्र पक्ष पक्षासारखे जगायचे आणि स्वतःवर कसल्याही प्रकारची बंधने लादून घ्यायची नाहीत असा निश्चयच तिने केला.असे स्वातंत्र्य मुलीच्या वाट्याला कधी येणार?अशी संधी तिला कधी मिळेल?त्यांना साजशृंगार आणि ब्युटीपार्लर पेक्षा काही हवे आहे,हे जगाला कधी कळेल.असे मलालाला नेहमीच वाटत होते की,महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळायला हवेत आणि कोणत्याही बंधनाशिवाय आकाशाला गवसणी घालायला हवी असे तिला मनोमन वाटत असे.म्हणून तिने जगभरात स्री समानता,शिक्षण आणि स्रीमुक्तीसाठी मोहीम आरंभली होती.

    

मलालाने तालिबानी धोरण व दहशतवादाला उघड आव्हान दिले होते.परिणामांची कल्पना असतानाही तिने हे आव्हान स्वीकारले.आपले जीवन पणाला लावले.एका शालेय विद्यार्थिनीच्या प्रखर आव्हाने तालिबानी निश्चितच चवताळले होते. मलालाच्या या भूमिकेचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व निश्चितच वाढले असले तरी तितक्याच गतीने तिच्या अडचणीही वाढल्या होत्या.तालिबण्यानी तिच्यासह संपूर्ण कुटुंबास वेठीस धरले होते. कुटुंबाच्या हत्येच्या बाबतीत विविध वृत्तपत्रात बातम्याही झळकू लागल्या होत्या.धमकीचे पत्र तसेच वृत्तपत्रे घरी दरवाज्यात टाकण्यात येऊ लागली पण अशा धमक्यांना मलालाने कधीही भीक घातली नाही.तिचा वाढता प्रभाव आणि धाडसाने ती दहशतवादाच्या कार्यात अडसर ठरत असल्याने तिला कायमचे संपवण्याचा घाट दहशतवाद्यांनी रचला होता.तालिबानी नेत्यांनी एका बैठकीत तिला कायमचे संपविण्याच्या निर्णयावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब केले. त्याची परिनिती ९ ऑक्टोंबर २०१२ रोजी प्रत्यक्षात आली.शाळेसाठी प्रवास करीत असताना अचानक त्या बसमध्ये बंदूकधारी घूसले आणि गरजले "आपल्या पैकी कोण मलाला आहे? बोला ! नाहीतर सर्वांना मारून टाकीन!दहशतवादाच्या धमकीने सर्व मुली घाबरल्या असताना तितक्याच धिटाईने ती उभी राहून "मी आहे मलाला"असे ठणकावून सांगितले.दहशतवाद्यांनी कसलाही विचार न करता तिच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. पहिल्याच गोळीने मलालाच्या डोक्याला छेद केला.गोळी मलालाच्या डाव्या भुवईजवळ तिच्या डोक्यातून आरपार जाण्याऐवजी तिच्या चामड्याला स्पर्श करून तिच्या खांद्यात घुसली अन जागीच कोसळली. अन्य दोन गोळ्यांनी तिच्या मैत्रिणी कायनात रियाज आणि शाजिया रमजान जखमी झाल्या. गंभीर आणि बेशुद्ध मलालाला उपचारासाठी पेशावर मधील सैन्य हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.डोक्यातून गोळी घुसल्याने तिचे शरीर पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले होते.पाच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर तिच्या डोक्यातून गोळी काढण्यात डॉक्टराला यश आले असले तरी १५ ऑक्टोबरला पुढील उपचारासाठी युकेतील महाराणी एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.तेथेही मलालाची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती.ती पूर्णपणे कोमात गेली होती. तिच्या जगण्याची आशा पूर्णपणे मावळल्याने कुटुंबियांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा चालविली होती.महिला सन्मान, स्त्रीशिक्षण आणि शांततेसाठी लढाई लढणाऱ्या शूरवीर मलालाच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी जगभरातून प्रार्थना होऊ लागली. थोरामोठ्यांची प्रार्थना/आशीर्वाद आणि डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर १७ ऑक्टोबर २०१२ रोजी मलाला अखेर कोमातून बाहेर आली आणि ३ जानेवारी २०१३ रोजी हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली.

     

मलालावरील जीवघेणी हल्ला आणि त्याच्या रोषाचे मूळ कारण तिने लिहिलेली डायरी हेच होते.तालिबान्यांना स्वातमध्ये इस्लामी कायदा लागू करण्यास मलाला ही मुख्य अडचण ठरत असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखविले त्यातूनच हा हल्ला घडून आला. मलाला ही वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी पहिल्यांदा आपल्या डायरीच्या मदतीने जाहीर रित्या जगासमोर आली.डिसेंबर २००९ मध्ये वडील जियाउद्दीने मलालाची पहिल्यांदा जाहीररीत्या सार्वजनिक ओळख करून दिली. ओळख लपविण्यासाठी गुल मकाई या नावाने तिने हा लढा उभारला होता.ही डायरी बीबीसी उर्दूवर प्रकाशित करण्यात आली. या डायरीमध्ये तालिबण्याच्या कुकृत्यांचे वर्णन तसेच इतर बाबी ज्यामध्ये सर्व मुलींना शिक्षणाचा अधिकारावर स्वात मधील सैनिकी कारवाईने भितीदायक वातावरण आणि मुलीला शाळेत जाण्यास वाटणारी भीती/बंदी,रंगीत कपडे वापरण्यावरील बंदी,दहशतीचे वातावरण, मौलाना सुट्टीवर जाण्याची कारणे,गोळ्याच्या आवाजाने हादरलेल्या कित्येक रात्र, पोलिसांची अनुपस्थिती,३ जानेवारी २००९ ते १९ फेब्रुवारी २००९ या कालावधीतील घडामोडी,शालेय गणवेशावरील बंदी.तालिबान्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत संभ्रम,संचारबंदी, शालेय दिनक्रम,मौलाना शाह दुरीन यांच्या निधनाची अफवा (मुलींनी शाळेत न जाण्याची घोषणा यांनीच केली होती) पाकमधील बॉम्बस्फोट मालिका,अन्य ठिकाणी शिक्षण घेण्याच्या काही मुलींचा मनसुबा,पाकमध्ये निर्माण झालेली भीती,शाळा बंद,उद्ध्वस्त शाळा,तालिबान्यांकडून सार्वजनिक ठिकाणी लोकांना होणारी मारझोड,लोकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर,परीक्षा कालावधीतील मुलींची घालमेल,स्वातवरील इस्लामी दहशतवाद्याचा भयानक हल्ला,आणि चिघळलेली स्थिती, शाळेच्या आठवणी,स्फोटाच्या धमक्या,मौलाना फजल उल्लाह यांचे मिंगोरा सोडून न जाण्याचे आवाहन,हिंसाचाराला वैतागलेली जनता,पळापळीचे वातावरण,लोकांना लागलेली शांततेची आस इत्यादी बाबींचा डायरीमध्ये सविस्तर उल्लेख केलेला आहे.अर्थात डायरीच्या माध्यमातून स्वात मधील एकंदर चित्रच तिने जगासमोर उभे केले होते.ही डायरी जानेवारी ते मार्च २००९ या कालावधीत प्रकाशित झाली.अत्यंत धाडसी/साहसी वृत्तीने लिहिलेल्या डायरीने तिला आंतरराष्ट्रीय ओळख दिली.तसेच डायरी ला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद त्याच्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने अखेर दहशतवाद्यांनी अत्यंत निर्दयपणे निरागस आणि कोवळ्या वयाच्या मलालावर जीवघेणी हल्ला केला.बंदुकीची गोळी विजयी ठरली असली तरी तिचा कणखर आणि बुलंद आवाज मात्र त्यांना थांबवता आला नाही.साध्या आणि सरळ शाळकरी मुलीकडून तालिबानी हतबल झाले होते.

    

मलालाच्या हत्त्येच्या प्रयत्नाचे चित्र देश-विदेशातील प्रसार माध्यमांनी जगभर दाखविले आणि लोकांमध्ये संताप आणि सहानुभूतीची लाट उसळली.मलालावर ज्या दिवशी हल्ला करण्यात आला त्याच दिवशी पाकिस्तानी गायिका म्याडोना हिने आपल्याला लॉस एंजलस येथील कन्सर्ट मध्ये "ह्युमन नेचर"नावाने गीत समर्पित केले तर पाकिस्तानचे राष्ट्पती आसिफ अली जरदारी यांनी "हे सभ्य लोकांवर केलेले आक्रमण असल्याचे म्हटले".अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी "या घटनेला घृणीत,त्रासदायक आणि भित्रेपणाचे म्हटले तर संयुक्त राष्ट्र संघाचे जनरल सेक्रेटरी बांनकी मुन यांनी हे एक घाणेरडे आणि भित्रेपणाचे कृत्ये असल्याचे मत व्यक्त केले होते.जगभरातील अनेक मान्यवरांनी या हल्याचा निषेध व निंदा केली.तिच्या शौर्यबाबत अमेरिकेच्या प्रथम लेडी लारा बुश यांनी"वाशिंग्टन पोस्ट"मध्ये मलालाची तुलना एनि फ्रेंक यांच्याशी केली तर हिलरी क्लिंटन यांनी "मलालाने शूरपणाने मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविला होता असे म्हटले.भारतीय दिग्दर्शक अमजद खान यांनी मलालावर चित्रपट तयार करण्याचे घोषित केले होते. अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोलीने "मलाला निधी" साठी २००,००० डॉलरची देणगी दिली होती.

      

हल्ल्यानंतर (शिक्षण घेतल्या नंतर) स्वगृही परतीच्या वेळी पाकिस्तानात तिच्या बाबतीत संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटल्या.प्रधानमंत्री शाहिद खानशी मुलाखती दरम्यान दहशती व भितीविना स्वदेशी परतण्याचे तिचे स्वप्न असल्याचे सांगितले.मात्र अधिकतर पाकिस्तान्यांनी तिचे स्वागत हे नकारात्मक दृष्टीने अधिक केले. तालिबान्यांशी निगडीत आणि त्यांच्याशी सहानुभूती असलेल्यांनी तिच्या विरोधाचा सूर आवळला तर रूढीवादी आणि कट्टरपंथीय मुस्लिमांनी मलालाची विचारधाराच मुस्लिम आणि पाक विरोधी असल्याचे मानले.ऑल पाकिस्तान प्रायव्हेट फेडरेशनने १,५२,२०० सदस्य संस्थामध्ये "I am Malala" या पुस्तकावर प्रतिबंध लावले तर मिर्झा काशीक अलीने "I am not Malala" या नावाने एक पुस्तकच जारी केले होते.सदरच्या पुस्तकात मलालावर पाकिस्तानी सेनेवर हल्ला करण्याचा ठपका आणि तिच्या वडिलांना गद्दाराच्या पिंजऱ्यात उभे केले होते.पत्रकार असद बंगने पाश्चात्य साम्राज्यवाद योग्य ठरविण्यासाठी मलालाचा वापर केला जात असल्याचे ठासून सांगितले होते.तसेच पाकिस्तान मधील तालिबानचा प्रवक्ता एहसान उल्ला यांनी या हल्याची जबाबदारी घेतली आणि प्रतिक्रिया व्यक्त केली की,मलाला काफिर असून निर्लज्ज आहे. त्यांनी पुढे असेही मत व्यक्त केले की,ती जर जिवंत राहली तर तिला पुन्हा निशाणा करण्यात येणार असल्याचे म्हटले.जिने पाकिस्तानला आदरणीय देशाच्या रांगेत उभे केले तिच्याच देशात तिचे अशाप्रकारे स्वागत करण्यात आले आहे.


    मलालाचे कर्तुत्व आणि धैर्याचे सर्व जगाने गोडवे गायिले. २०१२ मध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्तीच्या यादीमध्ये तिला स्थान प्राप्त झाले.शौर्य आणि साहसासाठी २०१४ मध्ये जगातील सर्वोच्च सन्मानाचा असा "नोबेल शांती पुरस्कार" प्राप्त झाला.सर्वात कमी वयात हा पुरस्कार मिळविणारी ती पहिलीच मुलगी ठरली.ओस्लो येथे डिसेंबर,२०१४ ला हा पुरस्कार स्वीकारताना ती म्हणाली की,हे मुलाचे नोबेल पारितोषिक आहे.मुलांनीच माझी यासाठी निवड केली.याचा मला सार्थ अभिमान वाटतो.हा फक्त मलाला नावाच्या एका मुलीसाठी नाहीतर,तर तो त्या सर्व मुलांच्या नावे आहे जे,काही ना काही कारणामुळे शाळेत जाऊ शकले नाही.पुढे मलाला म्हणाली की, मला सर्वत्र शांती हवी आहे. आणि त्यासाठी माझे बंधू आणि अद्यापही मी अविरत लढा देत आहोत.प्रदीर्घ काळापासून मुलाच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या कैलास सत्यार्थी यांच्यासोबत हा पुरस्कार मिळाल्याचा मला सार्थ अभिमान आहे.माझ्या वयाच्याही दुप्पट इतकी वर्षे त्यांनी हा लढा दिला आहे.आम्ही एकत्र लढा देऊ शकतो याचा मला अभिमान आहे.आम्ही जगाला दर्शवू शकतो की,एक भारतीय व एक पाकिस्तानी व्यक्ती एकत्रितपणे लढा देऊन मुलाचे हक्क मिळवून देण्याचे ध्येय साध्य करू शकतो. 

     

मलाला शालेय शिक्षण घेत असतानाही तिने तिची मोहीमही सुरू ठेवली होती.तिच्या विचाराचे एकच केंद्र होते."मुलींना शिकू द्या"मलालाचे संयुक्त राष्ट्रातील आमसभेत तिचे भाषण ऐकून सर्वांनी उभे राहून तिचे अभिनंदन केले होते.ती म्हणाली,एक मूल, एक शिक्षक,एक पेन आणि एक पुस्तक हे जग बदलू शकते. जगात मुलीच्या शिक्षणाची स्थिती अतिशय गंभीर आहे.त्यात पाकिस्तानची स्थिती अधिक गंभीर आहे.युनेस्कोने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, "दहा देशांच्या यादीत पाकिस्तान सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानात पंधरा वर्षे वयाच्या ६२ प्रतिशत मुली अशा आहेत ज्या कधीच शाळेत गेल्या नाही.दरम्यानचे काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटी दरम्यान ती म्हणाली की,युनाईटेड स्टेट मध्ये शस्त्रास्त्रावर जितका खर्च केला जातो तितका खर्च त्यांनी जागतिक शिक्षणावर केला तर खरोखरच हे जग बदलू शकते. शिक्षण हेच दाहशतवाद्याशी लढण्याचे मुख्य शस्त्र असल्याचे ही तिने आत्मविश्वासाने सांगितले.

    

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव इंटोनियो गुटेरेस यांनी जगातील सर्वात तरुण शांतीदूत या सन्मानासाठी मलालाच्या नावाची घोषणा केली होती.शिक्षणाचे काम व प्रसार मलालाच्या हातून जोमाने वाढावे या हेतूने हा पुरस्कार जाहीर केला होता.या व्यतिरिक्त ऑक्टोंबर २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एक कार्यकर्ता आर्कबिशप डेस्मंड टुटू यांनी आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कारासाठी नामांकन केले (पहिली पाकिस्तानी) होते.अन्य पुरस्कारांमध्ये १९ डिसेंबर २०११ ला पाकिस्तानचा राष्ट्रीय युवा शांती पुरस्कार,ऑक्टोबर २०१२ ला पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार सितारा ए शुजात पुरस्कार,सामाजिक न्यायासाठी ब्रिटनचा मदर तेरेसा मेमोरियल पुरस्कार (नोव्हेंबर २०१२),शांती आणि मानवतावादी कामासाठी रोम पुरस्कार (डिसेंबर,२०१२), महिलांच्या हक्कासाठी/संघर्षासाठी लॅटिन अमेरिकेचा सिमोन द बिवोर पुरस्कार (जानेवारी २०१३),ब्रिटनच्या आक्सफोर्ड मॅमिजर फ्रीहिट्स प्रिज १५२५( मार्च,२०१३),डॉटी स्ट्रीट ऍडव्होकेसी अवार्ड ऑफ इंडेक्स ऑन सेंसारशिप(मार्च ,२०१३),फ्रेंड एड एनी जार्विस अवॉर्ड ऑफ युनायटेड किंग्डम नॅशनल युनियन ऑफ रिसर्च (मार्च,२०१३) व्हायटल व्हायसेस ग्लोबल लीडरशिप अवार्ड ग्लोबल ट्रेकब्लेसर (एप्रिल,३०१३),परेमी इंटरनेट किंओनाल केटालुनया अवार्ड ऑफ केटालूनया (मे,,२०१३),ओ.पी.ई.सी फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचा वार्षिक पुरस्कार,(जून २०१३), इंटरनॅशनल कॅम्पेनअर ऑफ द इयर,(२०१३),ऑब्झर्वर ईसिकल पुरस्कार,टिप्पेटरीआंतरराष्ट्रीय पुरस्कार,इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस प्राइज किड्स राईट्स (२०१३),अंबेसिडर ऑफ कंसाईट अवार्ड,हार्वड फाउंडेशन पीटर गिट्स मानवतावादी पुरस्कार (२०१३),एना पोलीत कोवसकाया अवार्ड (२०१३), रिफ्लेक्शन ऑफ होम अवार्ड,ओकलाहामा सिटी नॅशनल मेमोरिअल आणि संग्रहालय प्राइड ऑफ ब्रिटन (२०१३),वूमन ऑफ द इयर(२०१३),(ग्लॅमर नियतकालिक),शांतता पुरस्कार (मेक्सिको,२०१३) यासह जगातील प्रतिष्ठित असे शेकडो पुरस्कार तिला प्राप्त झाले आहे.


    मलालाच्या नावाने एक निधी स्थापन करण्यात आला. शिक्षणाच्या अधिकारापासून अद्यापही वंचित असलेल्या मुलांना अधिकार मिळवून देण्यासाठी आणि महिला व मुलींच्या शिक्षणासाठी या निधीचा वापर केला जातो.मुली शिकल्या तर पूर्ण जगात बदल घडून येईल असा तिचा विश्वास आहे.त्याच अनुषंगाने या निधीतून स्वात घाटीतील ४० मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान देण्यात आले.ऑक्टोबर,२०१४ मध्ये गाजा येथील ६५ शाळांच्या पुनर्बांधणीसाठी यु एन आर डब्ल्यू ए च्या माध्यमातून दान केले.तिच्या अठराव्या जन्म दिवसाच्या पर्वावर (१२ जुलै २०१५) सिरियाई शरणार्थी साठी लेबनच्या बेका घाटीमध्ये शाळा सुरू केली.अशा कित्येक शाळा/महाविद्यालयासाठी मलाला निधी मधून अर्थसाहाय्य देऊन शैक्षणिक कार्याला उभारी दिली.मलाला नायजेरियामध्ये गेली तेथील प्रेसिडेंट गुडलक जॉन यांना भेटली.बोहो हरम या इस्लामिक दहशतवाद्यांनी बंदी केलेल्या २०० मुलीच्या सुटकेसाठी आवाज उठविला. अर्थातच यामागे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हाच उदात्त हेतू आहे.

    

मलालाचे २०१४ मध्ये युनायटेड किंगडम मधील शिक्षण आटोपल्यावर मायदेशी परतली. तिला राजकारणात येऊन देशसेवा करायची होती. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या नेतृत्वाने ती अधिक प्रेरित होती.पंतप्रधान किंवा सरकारमध्ये समावेश झाल्यास देशाची सेवा करण्याचा मनोदय तिने व्यक्त केला होता.परंतु वेगवेगळ्या देशातील पंतप्रधान/राष्ट्राध्यक्ष यांना भेटल्यानंतर हा मार्ग वाटतो तितका सोपा आणि सरळ मार्ग नाही असे तिला कालांतराने कळून चुकले म्हणून तिने अन्य मार्गानेही देशाची सेवा करणे शक्य असल्याचा विश्वास पटला म्हणून तिने ध्येय बदलविले.

   

मलालाने आरंभलेले महिला विषयक कार्य हे अद्वितीय असेच आहे.तिच्या मते संपूर्ण जगभरात ६० दशलक्ष मुली ह्या अध्यापही शिक्षण घेण्याच्या अधिकारापासून वंचित आहे. स्त्रियांच्या स्थितीत सर्वसमावेशक सुधारणा झाल्यास मानवजातीच्या इतिहासात आमूलाग्र असे परिवर्तन घडून येईल असा तिचा ठाम विश्वास आहे.मुलींचे शिक्षण घेण्याच्या बंधना विरुद्ध आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वात घाटीतून निघालेला तिचा हा दुबळा स्वर आता सर्व जगभर गुंजत आहे.एक शूरविर,बहादर जिगरबाज, कर्तृत्ववान अदभूत आणि चिवट स्वभावाची, स्त्रियांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या निर्भीड वीरांगना मलाला युसुफजाई हिच्या कर्तृत्वास व कार्यास शतशः नमन !

----------------------------------------

 *स्त्रोत:-*

१)भारद्वाज कृतिका,शर्मा अशोक कुमार,नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला,२०१५,डायमंड पॉकेट बुक्स लिमिटेड (प्रा.)लिमिटेड,नई दिल्ली.

पृ.क्र.२५,२९,३३,३५,३६,४६,९४,९७,१०३

२)पाटील कृष्णकुमार भा. (संपादक),शिक्षण संक्रमण मासिक,फेब्रुवारी २०१५, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे,महाराष्ट्र.पृ.क्र.३३ ते ३६.

 ३)महाराष्ट्र टाइम्स, ८ एप्रिल २०१७.

 ४)श्रीवास्तवअभिजीत,

आजतक,९ ऑक्टोबर २०१६, नवी दिल्ली.

५) दैनिक लोकमत,

१५ एप्रिल २०१८.

६)http:hi.m.wikipedia.org

७)http:/www.studyin.com


Rate this content
Log in