Vasudev Patil

Others

3  

Vasudev Patil

Others

महावस्त्र - भाग पहिला

महावस्त्र - भाग पहिला

8 mins
399


(कथा ही काल्पनिक असुन स्थळे, पात्रे व्यक्ती ही पूर्णतः काल्पनिक आहेत)


    भिखूशेठ घरात पाय की दारात पाय आज पूर्ण संतापात होते. आल्या आल्या गोपालवर त्यांनी हल्ला चढवला.कारण गेल्या चार महिन्यांपासून गोपालचं धंद्यावर अजिबात लक्ष नव्हते. हरहुन्नरी गोपालचं चार महिन्यांपासून एकाएकी काय बिनसले ठाऊक नाही पण तो दुकानावर जायला टाळाटाळ करू लागला होता.

" गोपाल्या तुला हवं ते कर ,वाटल्यास एजंसी बंद कर पण तुला जर असेच वागायचे असेल तर मी ही आता जाणार नाही." भिखू शेठ निर्वाणीचं म्हणाले. आधीच हवा झालेला गोपालने आता घरात दाती पेक्षा बाहेर पडणंच बरं म्हणून गाडीची चाॅबी घेत संतापात निघाला. व शूज चढवता चढवताच तिरमिरला.

" तुम्ही गेला नाहीत तरी माझा धंदा बरोबर सांभाळताहेत माझे लोकं! मग का उगीच पीरपीर लावून माथेफोड करता आहात पापा?"

" गोपाल्या मला धंदा शिकवू नकोस.सफेदी झालीय माझी धंद्यात!मुनीम लोकांवर धंदा चालत नाही.नी तुला जर धंद्यावर थांबायचं नव्हतं तर माझं माझं इथलं बरं चाललेलं दुकान त्या नदीच्या काठी का नवीन थाटायला लावलं?" भिखू शेठचा पारा ही आता तापला.

" मत मारी गयी थी मेरी! एवढी हौस आहे ना इथल्या धंद्याची तर आताच जातो नी बंद करतो एजंसी.उघडा मग इथंच दुकान! " म्हणत गोपाल तणतणतच निघून गेला.

 

गाडी काढून त्यानं संतापात नदीचा रस्ता लावला.तीस किमी अंतर जायचं होतं त्याला.हल्ली त्याला एजंसी, धंदा कशा कशातच रस वाटेना. तालुक्याच्या ठिकाणी बापाची 

'गोपाल केला एजंसी' होती.जवळच्या सिमेवरील केळी उत्पादक जळगावमधुन केळी खरेदी करून ते उत्तरेकडे पाठवत.गोपाल धंद्यात पडला.त्यावेळीच पारणीवर दोन्ही जिल्ह्याला जोडणारा पूल मंजूर झाल्याचं त्याला कळताच फिरून साठ सत्तर किमीचा केळी उत्पादक बेल्ट तीस-पस्तीस किमीवर येणार होता.व जळगावकडील व्यापाऱ्यापेक्षा आपण लवकर पोहचत केळी उचलू शकतो म्हणून त्यानं पारणी व तापी या दोन्ही नदीच्या बेच्यातील दहा बारा केळी उत्पादक गावांना टारगेट करत आपली एजंसी पारणी काठावरच जळगाव जिल्ह्यात वाटवीला थाटली मागच्या वर्षी.पारणीच्या या काठाला आपल्या तालुक्यातील ताम्हणपेठ हे बाजारपेठेचं मोठं गाव. आजुबाजुच्या पंधरा वीस गावाची बाजारपेठ व तालुक्याच्या तोडीस तोड गाव.मध्ये सातपुड्याच्या रांगेतून उगम पावणारी व तापीला मिळणारी पारणी नदी.व नदी चढताच जळगावच्या हद्दीतलं वाटवी गाव.या गावच्या आजुबाजुस शिवणी, खिरणी, दगडी, ..अशी सर्व केळी उत्पादक गावं. म्हणून वाटवीला नदीकाठावरच जमीन घेत लेव्हल करत गोपालनं मोठी इमारत बांधली.आॅफिसेस काढले, भुईकाटा तयार केला.

पंधरा वीस ट्रक उभ्या राहतील एवढी भव्य जागा सपाट केली. त्याचं नशीब एवढं चांगलं की हे सारं होत नाही तोच पारणीवर पूल ही पूर्ण झाला. त्यानं वडिलांच्या थोड्याफार ओळखीचा वापर करत स्वत:च्या बोलघेवडा व लाघवी स्वभावानं शेतकऱ्यांना आपलंस करत ,मदत करत, तत्पर सेवा देत आपले गिऱ्हाईक तयार करत धंद्यात जम बसवला. त्यासाठी त्यानं पैसा ही ओतला.एजंसी समोरच भव्य शिवालयाचं पुरातन मंदीर.त्यास रंगकाम व बाग करत वाटवी गाव आपल्या कह्यात घेतलं. इतर व्यापाऱ्यापेक्षा दहा रू.तो भाव जास्तच देऊ लागल्यानं इतर व्यापाऱ्यांनी या गावातून हळूहळू काढता पाय घेतला.गोपालनं अंतर कमी व या भागातल्या केळीची उच्च प्रत म्हणून त्यालाही भाव मिळे म्हणूनच तो जास्त भाव देऊ लागला.सारी घडी व्यवस्थीत बसत असतांनाच अचानक गोपालच्या जिवनात ती घटना घडली.

  

चार महिन्यांपूर्वी मुंबई वरून कार नं येत असतांना रात्री दहाच्या आसपास त्यानं घोटीजवळ ढाब्यावर जेवनासाठी गाडी उभी केली.जेवण करून तो व ड्रायव्हर गाडीजवळ येतांना जवळच एक कार फेल झाल्यानं त्या गाडीच्या चालकानं यांच्या गाडीची पासींग पाहत 

" धुळ्याला जाताहेत का? जाणार असाल तर एक सीट नेता का? आमची कार खराब झालीय!"

ड्रायव्हरनं गोपालकडं पाहत नकार दिला .पण ' रात्रीची वेळ आहे ,घेऊन घे' सांगत गोपालनं होकार दिला.चालकानं दरवाजा उघडत एका तरूणीस आणलं व बसवलं.तो पावेतो गोपालला तरूणी असल्याचं माहित नव्हतं.पण होकार दिल्यावर आता नाईलाज होता.कार सुरू होताच गोपालनं झोपेचं सोंग घेतलं.ती तरुणी ही घाबरत असावी.तरी ही ती ही काही वेळानं झोपली.पण गोपाल अंधुक प्रकाशात तिचं सौंदर्य पाहतच अवाक झाला.त्याची झोप, झोपेचं सोंग उडालं.ते नितांत स्वर्गीय सौंदर्य पाहून गोपाल साररे शिष्टाचार विसरत एकटक पाहतच होता.नाशिक टाकलं, चांदवड टाकलं.नी दिवसभराच्या धावपळीनं त्याला झोप घेरू लागली.उतरतांनाओळख वा पत्ता पाहू म्हणत इच्छा नसतांनाही त्याला झोपेनं कवेत घेतलं.इथंच घोळ झाला.


धुळं येताच त्या तरुणीनं चालकाचे आभार मानत लक्झरीकडं निघून गेली.चालकानं तोंड धूत चहा मारला नी आला. तो पावेतो गोपाल उठला.जवळ ती तरुणी न दिसताच त्यानं चालकास विचारलं.चालकानं गेल्याच सांगताच कोणत्या गावाची होती?, कोणत्या गाडीवर गेली ? त्यानं अधाशासारखं विचारलं.पण चालकानंही विचारलं नसल्यानं व ती उतरून कोणत्या लक्झरीवर बसली हे त्यानंही पाहिलं नसल्यानं गोपालचा हिरमोड झाला.त्याला जिवनात पहिल्यांदाच आपण मूर्ख असल्याची जाणीव झाली.रात्रीच आपण विचारलं का नाही ? याचा त्याला पश्चात्ताप झाला.शिरपूरपर्यंत तो कारमधून मागे पडणाऱ्या प्रत्येक लक्झरीकडं डोकावून ती कुठं दिसते का पाहू लागला.पण व्यर्थ.चांदवड टाकल्यानंतर आपण झोपलो हा मूर्खपणा केला याचं त्याला दु:ख राहून राहून वाटू लागलं.त्या दिवसानंतर त्याला उठता बसता जेवता झोपता तोच चेहरा दिसू लागला.त्या नंतर आठ दिवस तो एजंसीकडं फिरकलाच नाही.त्याला वेड लागण्याची पाळी आली.त्यानं एकट्यानं गाडी काढत घोटी गाठलं.त्या ढाब्यावर भरपूर तपास केला पण काहीच मागमूस लागेना.तो हिरमुसला व माघारी फिरला.आपणास असलाच साथीदार हवा अन्यथा हा धंदा, एजंसी, हे जीवन सारं व्यर्थ असाच विचार करत तो चार महिन्यांपासून तगतगत होता.त्यात आज पापांनी जास्तच डोक उठवलं म्हणून तो वाटवीला निघून आला.त्याची विचार तंद्री भंगली.बाहेर श्रावणाचा धुवांधार पाऊस पडत होता.पारणीचं भरलेलं पात्र त्यानं पुलावरून पार करत आॅफीसात आला.मुनीमाला आनंद झाला.गोपालनं त्याला ही देत भरपूर घेतली.त्या शिवाय त्याला झोप आलीच नसती.


पहाटे शिवालयातील घंटेच्या नादानं तो उठला.आज श्रावण सोमवार असल्यानं शिवालयात भुर भुर झरणाऱ्या झडीत ही गर्दी होती.गोपालनं उठत छत्री घेत नदीकडं व्यायामासाठी चक्कर मारावयाचं ठरवलं. आज पहिल्यांदाच तो मुक्कामाला होता.अन्यथा रात्री कितीही उशीर झाला तरी तालुक्याला परतेच.मंदिरात येणारे जाणारे भाविक समोरच्या आडातून बादलीनं पाणी काढून अभिषेक करण्यासाठी मंदिरात घेऊन जात होते.गोपाल नदीकडून फिरून परत आला.त्याचं सहज समोर लक्ष गेलं तर तो जागेवरच स्तब्ध झाला.तीच...तीच...तीच तरूणी! जी त्याला घोटीच्या ढाब्यावरून धुळ्यापर्यंत सोबत गाडीत आली होती. हातात पुजेचं ताट व बादली धरून मंदिराकडं येत होती तर सोबतची छत्री धरलेली मुलगी तिला जोरजोरात बजावत होती " चिमाताई छत्रीत ताट धर. पुजेचं सामान ओलं होतंय!"

पण ती एकसारखी गोपालकडं पाहत होती व गोपाल तर स्थितप्रज्ञासारखाच गारठला होता.एकमेकांच्या नजरेत नजर...

"हे देवा ज्या साठी मी तीळतीळ तुटत होतो चार महिन्यांपासून,ते जवळच असतांना..."

"चिमा ताई चल, काय पाहतेय!"

पण चिमा वळून वळून पाहत होती व मंदिराकडं जात होती..

चिमा..! चिमा...! मोरपिस अंगावर फिरल्यागतच तो आॅफिसात आला व नंतर परत जाणाऱ्या चिमाकडं पाहू लागला.म्हणजे एकुणात आपला स्वर्ग वाटवीतच आहे हे कळताच त्यानं वाटवीतच तळ ठोकला.व दुसऱ्या दिवशी सकाळीच अंघोळ करून चिमा येण्याची वाट पाहू लागला.ती आली.हा पाठोपाठ‌ मंदिरात दर्शनासाठी..मग तर रोजचाच क्रम झाला.यथावकाश माधवराव सानपाची मुलगी ही माहिती मिळवत त्यानं घरापर्यंत मजल मारली.माधवराव व नारायणराव दोन भाऊ. दरवर्षी आठ- आठ , दहा- दहा गाडी केळी पिकवणारी टंच असामी व त्याच्याच एजंसीत या वर्षी माल लावलेला.माधवराव स्वभावाने जमदग्नीच.पण मागच्या चारेक वर्षांपासून कौटुंबिक कारणास्तव एकदम विमनस्क झालेले.

 

 गोपाल दहा वाजेपर्यंत पाडा पाडणाऱ्या साऱ्या टोळ्या ट्रकावर काढी मग तीन पर्यंत त्याला काहीच काम नसे.तीन नंतर गाड्या येत त्यांचं वजन करून हिशोब करण, त्यांना दिल्लीकडं पाठवणं, शेतकऱ्यांचं व मजूर मुकादमांचं पेमेंट करणं यात रात्रीचे दहा वाजत.पण दुपारी मग निवांत असे.त्या वेळेत चिमाकडे घरी जाणं शक्य नव्हतं.मग त्यानं सकाळचीच वेळ योग्य ठरवत मंदिरातच बोलायचं ठरवलं.पण मंदिरात तर दर्शनासाठी गर्दीच .कधी कधी तर माधवराव ही असत.त्याही स्थितीत तो जवळ जात ओळखीसाठी सलगी करू लागला.पण चिमा थांबायला तयार नाही.पण तिच्या विषयी जे आपणास होतंय तेच तिलाही आपल्या विषयी वाटत असावं हे त्यानं तिच्या नजरेतील ओढीनं जाणलंच होतं.फक्त भिती आड येत असावी. अकरापर्यंत ट्रक गेल्यावर तो आज दुपारी घरी जाणार म्हणून त्यानं गाडी समोर रस्त्यावर उभी केलेली.तोच समोरून माधवराव व चिमा येतांना दिसली.त्याची छाती भात्याप्रमाणं धडधडू लागली.

"गोपालशेठ तालुक्याला निघाले का?"

"हो. का यायचंय का?"

"मला नाही. पण ही माझी मुलगी चिमा, हिला जायचंय. नेमकी आमची गाडी बाहेर गेलीय.आता ताम्हनपेठलाच जात होतो .तेथुनच बस मिळेल म्हणून.पण अनायासे तुमचीच गाडी दिसली."

" चालेल सोडतो ना .बसा." गोपालला तर स्वर्ग चालत आपल्या पुढ्यात आला असच मनात चुरचुरलं.माधवरावानं चिमास बसवलं .

" तिकडनं बस पकड.जवळ आली का काॅल कर तितक्यात गाडी येईनच मग पाठवतो ताम्हनगावला."

गोपालनं गाडी सुरू केली. ताम्हन पेठ टाकताच त्यानं गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.

 " चिमे! चिमा...! काय अंदाज आहे तुमचा.निदान उतरतांना एका शब्दानं तरी सांगावं की‌ नाही.खुशाल निघून गेलात! गोपाल इतक्या आवेगानं बोलला की जणू साता जन्माची ओळख असलेल्या आपल्या माणसागत.

 " गाढ झोपलेल्या माणसाला उठवणं पाप असतं...!" चिमानंही धुळ्याचा प्रसंग ओळखला.तिच्या मधुरवाणीत त्याला झड..श्रावणझडच दिसू लागली.

" अरे ,काय सांगावं तुला?.चार महिने काय अवस्था झाली माझी!"

" इतका ठाम विश्वास !" चिमा मिश्कील हसली.

" मंदिरातल्या चार पाच भेटीतल्या नजरेतल्या ओढीनं कमावलाय तो मी"

" नी जर या घडीला मी आरडा ओरडा केला तर..." चिमा फिरकी ओढू लागली

" चिमे ..." 

नंतर दोघांना काही सांगायची गरजच भासली‌ नाही.

त्यानं गाडी सुरू केली.

"त्या दिवशी मी तीन वर्षानंतर प्रथमच गावाला येत होते. घरच्या कौटुंबिक स्थितीनं भांबावलेली.मला ही जाणवलं तुझं पाहणं पण नंतर तू झोपला नी मग मी पण मनातले विचार झटकले.तदनंतर आठ दिवस राहून परतले. नंतर विसरलेच.पण मंदिरात पुन्हा भेट नी मग..,"

 

त्यानं तालुक्यातील तिचं सारं काम आटोपत तिला घरीच नेलं.माधवरावांना भिखू शेठ ओळखायचे.त्यांची मुलगी म्हटल्यावर चहा नाश्ता झाला.गोपाल मात्र चार पाच दिवस वाटवीत थांबल्याचं व त्याचं आज मोकळं वागणं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.नंतर गोपालच्याच गाडीत ती परतली.पारणीतलं गढूल पाणी  नितळ होत स्वच्छ तळ दिसायला लागला.


 संगणक इंजिनिअर असलेली चिमा आता माधवरावांची एकुलती एक मुलगी असल्यानं तिच्या पसंतीबाबत त्यांनी तिलाच पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं.त्यामागं कारण ही तसचं होतं.एकदा दूधानं तोंड पोळल्यावर पिणाऱ्यानं ताक ही फुंकून प्यावं तसच काहीसं माधवरावाबाबत झालं होतं.

 एका वर्षापासून मंदिरात सकाळी सहसा न दिसणारा गोपालशेठ सकाळीच आरतीला उपस्थीत राहतोय ,ते ही नियमीत? यामागची गोम गावापेक्षा ही आधी माधवरावालाच आधी कळाली. त्यांनी निरीक्षण केलं व त्याबाबत अंदाज येताच तडक चिमेसोबत असणाऱ्या पोरीला विचारलं. पोर ततफफ करत सारं बरडली.माधवरावांनी चिमेला विश्वासात घेताच चिमाच्या डोळ्यात त्यांना सारं चित्र स्पष्ट झालं.चार वर्षांपूर्वी जर असं घडलं असतं तर त्यांनी चिमाला उभी फाडली असती.पण वसंता,पुतण्या घनशा ....यांच्यानंतर त्यांना चिमाबाबतही तिच भिती वाटत होती. जे त्यांना नको होतं. व गोपाल हा जातीचा, हरहुन्नरी व त्यांनाही मनोमन आवडणारा असल्यानं त्यांनी चिमास मिठी मारत " पोरी तुला तो पसंत असेल तर त्या गोपालरावांना यू पकडतो.निसटूच‌ देणार नाही."

या सरशी मात्र धाकधूक वाटणारी चिमा खुदकन हसली.

" आता बघ त्या गोपालशेठची कशी फिरकी घेतो!"

  दुसऱ्या दिवशीच त्यांनी गोपालरावास घरी बोलावणं पाठवलं.नेमकी सकाळी आज चिमा मंदिरात न आल्यानं , काही तरी बिनसलं हे ओळखत तो माधवरावाकडं निघाला.

 " या शेठ! बसा!"

गोपाल अंग आकसून बसला.

" गोपालशेठ हे काय चालवलंय तुम्ही?"

गोपालला दरदरून घाम फुटला.पण जे होईल ते.आता लपवण्यापेक्षा एकदाची वासलात लावून मोकळं केलेलंच बरं.

" काय लावलं म्हणजे नेमकं काय आबासाहेब?" त्यानं अंदाजानं चाचपडत विचारलं.

" मी ऐकतोय ते खरं का?"

" होय !" गोपाल श्वास रोखून ठामपणे बोलला.

" काय होय?"

" हेच मी आणि चिमा..."

" मग मी भिखू शेठला भेटू का मग?" माधवराव हसतच बोलले.

नी‌ मग गोपालने श्वास सोडत मान खाली टाकली.

  माधवरावांनी भिखू शेठची भेट घेत मागणी घालताच भिखू शेठला चक्करच यायची बाकी राहिली.त्यांच्याकडं पैसा भरपूर होता‌ पण त्यांना माधवरावासारखी बडी असामी, बडं प्रस्थ आपले व्याही होणार यातच आनंद होता.व त्यांनी चिमाला पाहिलंही होतं पण आता एकदा पुन्हा डोळे भरून नविन आपली सून म्हणून त्यांना पाहणं गरजेचं वाटलं.

 सारं ठरलं.नारळ गोटा झाला.आनंदी आनंद.साऱ्या गावाला आनंद झाला.पण त्याच बरोवर माधवराव, नारायणराव नायजाताई, व बनू सारे आतून धास्तावले.त्यांची भाऊबंदकी व नुकतच सुतक तोडलेली जुनी भावबंदकीही घाबरली.काय होणार?

चिमा नेसेल का महावस्त्र? सजेल का? की वसंता, घनशा सारखंच घडणार?

पण माधवरावांना एक अंधुक आशा होती की चिमा महावस्त्र नेसुन परक्या घरी जात असल्यानं नलू तिला तोशीश लावणार नाही. पण नारळ गोटा झाला नी खऱ्या नाट्याला सुरूवात झालीच...


(क्रमशः)


Rate this content
Log in