म. फुलेंचे कृषी विषयी विचार
म. फुलेंचे कृषी विषयी विचार
१९ व्या शतकात भारतातील सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या विविध समाज सुधारकांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले अर्थातच ज्योतीराव गोविंदराव फुले यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.बहुजन समाजाची उन्नती आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. प्रस्थापितांच्या दडपणाखाली/वर्चस्वाखाली पिचत असलेला शेतकरी व बहुजन समाजाची होणारी पिळवणूक याबाबतीत त्यांनी परखडपणे विचार मांडले आहे.वास्तवतेची समीक्षा केली. बहुजनाची तसेच शेतकऱ्यांची केविलवाणी स्थिती तत्कालीन सरकारच्या निदर्शनास आणून दिली.
महात्मा फुलेनी घेतलेल्या व्यापक भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या "गुलामगिरी" "शेतकऱ्याचा आसूड"या ग्रंथात उमटलेले दिसते."गुलामगिरी", "शेतकऱ्याचा आसूड", "सार्वजनिक सत्यधर्म"(मरणोपरांत) हे त्यांचे प्रचंड गाजलेले ग्रंथ तर "तृतीयरत्न" हे नाटक प्रसिद्ध आहे.या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची अनाकलनीय व वास्तवतेची परखडपणे मांडणी केली.भारतीय समाजिक व्यवस्थेचे वास्तव खऱ्या अर्थाने त्यांनी जगासमोर आणले.स्पृश्य-अस्पृश्य भेद,गुलामगिरी,ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व,स्त्रियांचे शोषण, वर्णव्यवस्था,दैववाद,कर्मठ धर्माच्या चालीरीती,सामाजिक विषमता तसेच शोषित-पीडित आणि अक्षरशुन्य शेतकरी/कष्टकऱ्यांच्या व्यथा इत्यादी प्रश्न आणि समस्या निवारण्यासाठी त्यांनी बंड पुकारले होते. सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले होते.
आद्य समाज क्रांतिकारक, बंडखोर युगपुरुष आणि द्रष्टे विचारवंत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.(मृत्यू दिनांक-२८ नोव्हेंबर १८९१) समाज परिवर्तनाचा ध्यास आणि बहुजनांचा उद्धार व न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या महात्मा फुलेचे शेतकरी व कृषी क्षेत्रातील योगदान सुद्धा तितकेच महत्त्वपूर्ण आहे.शेतीविषयक त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच उपयुक्त आहे.कृषी आणि कृषक हा त्याच्या लिखाणातील अविभाज्य घटक होता."पाणी अडवा-पाणी जिरवा"ही सांगितलेली संकल्पना सुध्दा आजही महत्त्वपूर्ण आणि उपयोगी आहे.मानवाधिकार या विषयावर थॉमस पेन यांनी लिहिलेल्या "राईट ऑफ मॅन" या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.शेतकरी आणि शेती बाबतीत त्यांनी तब्बल एक शतकापूर्वी केलेले भाष्य तितकेच उपयुक्त आणि आवश्यक असल्याचे विद्यमान स्थितीवरून सहज लक्षात येते.
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे.शेतकरी आणि कृषी क्षेत्राची उन्नती झाल्याशिवाय देशाचा विकास साधता येणार नाही याची जाणीव महात्मा फुलेंना नक्कीच होती.भारतीय शेती आजही अधिकांश भारतीयांचा उत्पन्न व उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे.शेतीमध्ये पुरेशा सुधारणे अभावी शेती ही मागासलेली आहेच शिवाय राबराब राबणारा शेतकरी सुद्धा तितकाच शोषित-पीडित आणि मागासलेला आहे.दारिद्र्य आणि अज्ञानामुळे शेतकऱ्यांचे सर्वचस्तरातून शोषण आणि पिळवणूक केली जाते.शेतकरी कष्ट करतो.राबराब राबतो पण त्याला त्याच्या कष्टाचे फळ मात्र मिळत नाही.याउलट त्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूकच केली जाते.म्हणून देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे प्रश्न तडीस नेण्यासाठी महात्मा फुलेनी प्रखर लढा उभारला होता. शेतकऱ्याच्या शोषणाचे रहस्य हे त्याच्या दारिद्र्य व अज्ञानात आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. म्हणून महात्मा फुले "शेतकऱ्याच्या आसूड"या ग्रंथात म्हणतात की,
विद्येविना मती गेली-मती विना निती गेली
नितीविना गती गेली-गतिविना वित्त गेले
वित्तविना शुद्र खचले-इतके अनर्थ एका अविद्येने केले.
दारिद्र्य व अज्ञानामुळे होणारे शोषण व पिळवणूक थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना शिक्षित केले पाहिजे.ज्ञानाधारित शिक्षणाबरोबरच कृषी व व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे.सोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने आवर्जून पुढाकार घेतला पाहिजे. त्यांच्यासाठी वस्तीगृह काढली पाहिजेत.रोजगारभिमुख व व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे.इतकेच नव्हेतर प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचे देण्याची मागणी सन १८८२ साली विल्यम हंटर शिक्षण आयोगापुढे केली होती.
भारतीय शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचा असमतोल आणि लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यातच त्याचा कर्जबाजारीपणा चिंतेत भर घालणारा आहे.अशा या आर्थिक विवंचनेत त्यांना आत्महत्येसारखा मार्ग पत्करावा लागतो.त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शेतीचे आधुनिकीकारण केले पाहिजे.वीज,पाणी, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करणे आवश्यक आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांचा अधिक भर दिला होता. त्यासाठी धरणे,कालवे बांधावीत, विहिरी द्वारे पाणी पुरवठा करणे आवश्यक मानले.सोबतच प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पिकासाठी पाणी मिळावे यासाठी प्रत्येकास नळाद्वारे अर्थातच एकेक तोटी उपलब्ध करुन पाणी पुरवठा करावा जेणेकरून शेतकऱ्या कडून वाजवी पेक्षा जास्त पाणी वापरले जाणार नाही असे त्यांनी सुचविले होते.परंतु सरकारचे याकडे विशेष लक्ष असल्याचे म्हणता येणार नाही असे त्यांनी शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथात प्रामुख्याने उल्लेख केला आहे.महात्मा फुले म्हणतात की,शेतकऱ्यांना पोटभर भाकर व अंगावर वस्त्र मिळावे असा सरकार फक्त आव आणतात.
लक्षावधी रुपये खर्च करून जागोजागी कालवे बांधलीत. त्याबदल्यात अज्ञानी शेतकऱ्याकडून मनमानी पैसा वसूल केला जातो.परंतु शेतकऱ्यांना आवश्यक त्यावेळी शेतीसाठी पुरेसे पाणी मिळते की नाही याबाबत सरकारी कर्मचारी/अधिकारी कडून बरोबर तजवीज ठेवली जाते का?असा प्रश्न ते उपस्थित करतात.कालव्यातील पाणी सरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सिंचन खात्यावर न ढकलता थेट शेतकऱ्यावर ढकलली जाते. त्याविरोधात शेतकऱ्यांनी दाद मागितल्यास मग्रूर सरकारी अधिकारी/कर्मचारी उलट शेतकऱ्यावरच उलटतात.एक शतकापूर्वीचे मत आजही तंतोतंत लागू पडते.आजही शेतकऱ्याची स्थिती वेगळी नाही."परके गेले आणि आपले आलेत" इतकाच काय तो फरक आहे.
शेतकरी राबराब राबतो. कष्ट उपसतो.पण दुर्दैवाने त्याने कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला मात्र योग्य असा भाव मिळत नाही.सर्वतोपरी तो नाडीला जातो.बाजारात आणलेल्या मालावर नानाविध समस्येने तो हैराण होतो.दलालाकडूनही मोठी गळचेपी केली जाते.म्हणून महात्मा ज्योतीबा फुले म्हणतात "शेतकऱ्यांनी लागवडीकडे केलेला खर्च सुद्धा उभा राहण्यासाठी मारामार पडते.गाडी भाड्याचाही खर्च निघत नाही. या संदर्भात उदाहरण देताना महात्मा फुले पुढे म्हणतात की,कधीकधी शेतकऱ्याचे गाडीवर माळवे शहरात विकण्याकरिता आणिल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारात जास्त-कमती वजनाने होणारे देणारे दगाबाज दलालाचे व म्युनिसिपालिटीचे जकातीचे भरीस घालून गाडीभाडे अंगावर भरून त्यास घरी जाऊन मुलाबाळा पुढे सिमगा करावा लागतो."पुढे ज्योतीबा म्हणतात "सुबत्तेच्या काळात चार कोट रयतेस दिवसातून दोन वेळा पोटभर अन्न मिळन व ज्यास भुकेची व्यथा अनुभवल्यावाचून एक दिवस सुद्धा जात नाही.आजही अधिकांश विशेषतः सीमांत शेतकऱ्याची स्थिती यापेक्षा वेगळी आहे असे म्हणता येणार नाही.
कर्जबाजारी शेतकरी
पूर्वीप्रमाणेच आजचाही शेतकरी हा कर्जबाजारीच आहे."शेतक-याचा आसूड" या ग्रंथात ज्योतिबा म्हणतात,शूद्र शेतकऱ्याची मूळ पिटीका व हल्लीचे आमचे सरकार एकंदर सर्व आपले कामगारास मन मानेल तसे पगार व पेन्शने देण्याच्या इराद्याने नानाप्रकारचे नित्य नवे कर शेतकऱ्याच्या बोडक्यावर बसवून त्याचे द्रव्य मोठ्या हिकमतीने गोळा करू लागल्यामुळे शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाले आहेत. शेतकरी हा सावकाराकडून कर्ज काढतो पण त्याची सावकाराकडून फसवणूकच केली जाते.आजचा शेतकरी सुद्धा आपल्या गरजा भागविण्यासाठी शेतीला गहाण ठेवून कर्ज काढतो. आपल्या देशात शेतीला "माय" म्हटल्या जाते."माय"ला गहाण ठेवूण कर्ज घेणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण होय.कुणी आपल्या आईला गहाण ठेवतो का ?असा प्रश्न उपस्थित करतात. आपल्या मुला-मुलीचे लग्न करण्यासाठी अतिरिक्त पैसा खर्च केला जातो.त्यानंतर व्हायचे तेच होते.शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे दुसरे कारण म्हणजे भाऊबंदकी होय.कुटुंबातील एखादा सदस्य किंवा कुण्या नातेवाईकाना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आणि नोकरी मिळाली तर अशांनी शेतकरी वर्गाकडे कधी मागे वळून पाहिलेच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आहे तशीच कायम आहे.तसेच अधिक उत्पादनासाठी शेतीला वेळेवर वीज,पाणी बी-बियाणे मिळणे अवघड झाले आहे.परिणामतः पुरेसे उत्पादन होत नाही.अशाही स्थितीत अधिक उत्पादन झाल्यास शेतमालाला बाजारात योग्य व रास्त भाव मिळत नाही आणि कमी उत्पादन झाल्यास उत्पादन खर्च भरून निघत नाही."इकडे आड,तिकडे विहीर,"अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे.म्हणून शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा भरणा करणे अवघड जाते.अशा स्थितीत कर्जबाजारी पणाचा भार डोक्यावर वाढतो. आणि आर्थिक विवंचना आणि निराशेतून आत्महत्या केल्या शिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो.अशी शेतकर्यांची दैनावस्था आहे.दुसरीकडे सरकारचे हवे तितके शेतकऱ्यांनाच्या स्थिती कडे लक्ष केंद्रित केले जात नाही. नोकर-चाकराचे पगार/वेतन/भत्ते वाढविण्यास कसलीही कसूर केली जात नाही.सरकारकडे शेतकऱ्याच्या मदतीच्या वेळी तिजोरी रिकामी असते तर वेतन भत्ते वाढविण्यासाठी कधी तिजोरीचा विचार केला जात नाही.हे वास्तव महात्मा फुलेनी तत्कालीन वेळेसही मांडले होते. ज्योतीबा म्हणतात,"अहो सरकारचे जर आम्हा कंगाल शेतकऱ्याविषयी खरोखर कळवळा आहे,तरी ते आपले विलायती सावकाराचे एक रकमेचे व्याज अजीबाद बंद का करीत नाही?आणि तसे केल्याबरोबर शेतकऱ्याचे पाय कसे थारी लागत नाहीत,हे पाहू बरे!महात्मा फुलेचा हा अंगुलीनिर्देश आजच्या स्थितीतील सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
महात्मा फुलेचे विचार हे आजही प्रासंगिक आहे.अधिकांश भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचा मुख्य उत्पन्न स्त्रोत हे प्रामुख्याने कृषी क्षेत्र आहे.वाढत्या लोकसंख्येचा भार आणि विभक्त कुटुंब पद्धतीने कृषीचे धारणक्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणून वाढीव उत्पन्न तर सोडाच निर्वाहासाठी सुध्दा कृषीक्षेत्र अपुरे पडू लागले आहेत.म्हणून शेतकरी हा पर्यायी रोजगारासाठी जंगलातील डोंगर,दर्याखोर्यातील वनस्पती,फळे,झाडाची पाने-फुले आणि जंगलातून तोंडून आणलेल्या लाकूड-फाट्याची विक्री करून उदरनिर्वाहासाठी पैसा मिळवित असे.गायरानाच्या भरवशावर पशुपालन करित असे.प्राप्त उत्पन्नतुन कुटुंबाचा गाडा हाकीत गावाकडेच राहत असे.परंतु सरकारने वनखात्याला आवश्यकतेपेक्षाअधिक प्रमाणात महत्त्व दिल्याने पोट भराच्या साधनावर बऱ्याच मर्यादा आल्या आहेतच शिवाय दुबळ्या पंगू शेतकऱ्यांचे शेरडा करडास या पृथ्वीवरचे पाठीवर रानाचा वारासुध्दा खाण्यापुरती जागा उरली नाही.इंग्रज सरकारने यंत्राद्वारे तयार झालेला पक्का माल भारतात स्वस्त दरात विकत असल्याने येथील छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडलेत. परिणामतः येथील विणकर,लोहार, सुतार, यांच्यापेक्षा स्वस्तात विकू लागल्याने भारतातील कच्चा मालाचा ( विशेषतःशेतमाल)खप हा इकडे न झाल्याने तो माल इंग्लंडातील माल व्यापारी पाहिजे त्या दराने स्वस्तात खरेदी करून विलायतेतील कसबी लोकास विकून त्यांच्या नफ्यावर कोठ्याधिश झाले आहे.भारतीय मालाला पुरेशी बाजारपेठच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च सुद्धा भरून निघणे कठीण झाले होते.परिणामतः शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या शिवाय गत्यंतर नव्हते.सोबतच गावाकडील छोटे मोठे उद्योग-लघुउद्योग,कुटिरोद्योग, अवसायनात निघाल्याने (बारा बलुतेदार)साळी, कोष्टी, धनगर, लोहार,सुतार इत्यादीना कसबी लोकांच्या कारखान्यात त्याचे हाताखाली काम करणे अवघड होऊन बसले होते.इतकी गंभीर स्थिती शेतकऱ्यांची पाठी आली, ती आजतागायत कायम आहे. महात्मा फुलेची दूरदृष्टी आजच्या शासकासाठी ही अंतर्मुख करणारी/चिंतनास भाग पाडणारी आहे.कारण शेतकऱ्यांची स्थिती फारशी बदलली नाही.स्वतंत्र भारतात आजही शेतकऱ्यांच्या विविध संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढताना दिसते आहे. पण शेतकऱ्यांना न्याय न मिळता प्रत्येक राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांचे हक्क/न्याय मिळवून देण्याचे राजकीय भांडवल करून राजकीय पोळी शेकताना दिसते आहे हे सत्य कुणीच नाकारणार नाही!!
शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची कारणे विषद करताना महात्मा फुले म्हणतात,"आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून?बागायतात नवीन तोटा विकत घेण्याचाकरिता जवळ पैसा नाही.जुन्या तर अगदी फाटून त्याची चाळण झाली. उसाचे बाळगे मोडून हुंडीची तीच अवस्था झाली.मकाही खुरपणी वाचून गेला.भूस सरून बरेच दिवस झाले आणि सरभड गवत कडव्याच्या गंजी संपत आल्या आहेत.कन्हेरीच्या मुळ्या मी वाटून प्याल्यास (विष पिऊन) कर्ति धर्ती मुले आपली कशी तरी, कसे तरी पोटे भरतील.परंतु माझ्या जन्म देणाऱ्या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या लहान-सहान चिटकुल्या लेकरास अशावेळी कोण सांभाळील. त्यांनी कोणाच्या दारात उभे राहावे?त्यांनी कोणा पासी आपले तोंड पसरावे.अशी हताश शेतकऱ्यांची विदारक स्थिती सांगतात.आजही शेतकऱ्यांची अशीच स्थिती आहे.दुःख दारिद्र्य विवंचना त्याच्या पाचवीला पुजल्या आहेत.मायबाप सरकार आपल्या पाठीशी नाही.दुःख दारिद्र्य चिंता पाठ सोडत नाही.अशा वेळी शेतकऱ्यांना मृत्यू अधिक जवळचा वाटतो. म्हणूनच कदाचित विविध विवंचनेतुन आत्महत्या सारखा मार्ग पत्करतो.
समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले केवळ शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून थांबले नाही;तर कृषक व कृषी विकासासाठी त्यांनी उपाययोजना सुद्धा सुचविल्या आहेत.कृषीच्या उत्पादकतेत वाढ पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ (आर्थिक दृष्ट्या सक्षमतेसाठी) करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविलेल्या आहेत.त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान दूर करणे,शेतीचे आधुनिकीकरण करणे,नवे तंत्रज्ञान अवगत करणे, शेतमालाला योग्य भाव व पुरेशी बाजारपेठ उपलब्ध करणे,शेतीवर वाजवी कर आकारणे,शेतीची पद्धत व अवजारे यात सुधारणा करणे,कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणे,जोडधंदा म्हणून पशुपालनास चालना देणे, शेतीची माहिती देणारी पुस्तिका छापणे,वृक्षतोड थांबविणे,सिंचन सुविधा अर्थात कालवे/धरणे बांधणे,आर्थिक संकट व नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आर्थिक साहाय्य देणे,दुष्काळी स्थितीत वित्त पुरवठा करणे,रानडुकरे व वन्यप्राण्यापासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावठी बंदुका जवळ बाळगण्याची परवानगी देणे अशा विविध उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत त्या आजच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा तितक्याच उपयोगी आहे.म्हणून महात्मा फुलेंनी प्रगल्भ दूरदृष्टीने शेतकरी व शेतीविषयक केलेले भाष्य/चिकित्सा/समीक्षा विद्यमान शासकासाठी सुद्धा तितक्याच पथदर्शक आहेत म्हणून त्यांच्या या अमूल्य अशा योगदानाबद्दल त्यांना खर्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी म्हणावे लागेल.