प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

2  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

कृतिशील व्यक्तिमत्त्व पी.बी.

कृतिशील व्यक्तिमत्त्व पी.बी.

6 mins
124


एक उतुंग अन कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून पांडुरंग बळीरामजी इंगळे यांच्या कर्तृत्वाबाबतीत महाविद्यालयीन जीवनापासूनच ऐकून होतो आणि कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तृत्वाचे पैलू उलगडत गेले.ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती ते शिक्षक आणि चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाची अनुभूती यायला लागली.शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक आणि पुरोगामी चळवळीतील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत.आपल्या कार्य कर्तुत्वाच्या भरवशावरच त्यांनी विविध क्षेत्रात स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली.तथागत भगवान गौतम बुद्ध,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले,संत कबीर,छत्रपती शाहू महाराज,प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी ठेवून ऐन उमेदीच्या काळापासूनच त्यांनी नियोजन पूर्वक कार्याची दिशा ठरविली आणि आयुष्याच्या उत्तरार्धातही तीच दिशा अविरत कायम आहे.


विचोरी (ता.मोर्शी जिल्हा अमरावती) या गावी एका सर्वसाधारण कुटुंबात सरांचा जन्म झाला.अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी प्रगतीची एक एक पायरी पादाक्रांत केली.एक शिक्षक आणि कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी म्हणून आरंभलेले कार्य अनेकांना न्याय देणारे आणि आपलेसे वाटणारे आहेत. 


१९९६ पासून अध्यापकाची नोकरी पत्करतानांच लोककल्याणाच्या सेवेचेही व्रत स्वीकारलेत.ते एक शिक्षक आणि संघटनेचा पदाधिकारी एवढ्यातच मर्यादित न रहाता काळानुसार त्यांनी त्यांच्या कार्याच्या कक्षाही अधिक रुंदावल्यात.अध्यापका बरोबरच सर्वसामान्यनाही न्याय मिळावा असा त्यांचा ध्यास आहे.विचार,अभ्यास आणि त्यातील सातत्य या त्रिसूत्रीवर त्यांच्या संघर्षाचा लढा उभा आहे.लढाऊ बाण्याच्या सरांनी नोकरीला साध्य न मानता एक साधन म्हणून त्यांनी आपल्या लोककल्याणकारी आणि सामाजिक न्यायाची जोड दिली असल्याचे त्याच्या आजवरच्या कार्यावरून सहज लक्षात येते.


सामाजिक न्याय व समतेचा लढा लढत असताना अध्यापणाकडेही कधी दुर्लक्ष झाले नाही.विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देत असताना ज्ञानदानाबरोबरच वास्तववादी विद्यार्थी घडविण्याकडे त्यांचा अधिक कल होता.आजचा तरुण विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे म्हणून एक सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून जडणघडण करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित होते.जात,धर्म, पंथ आणि वर्ण असा भेद न करता विद्यार्थ्यांतील गुणवत्ता हेरून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देण्याचा सरांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाला सामोरे जाण्याची जिद्द निर्माण करण्याचे कौशल्य सरांच्या अंगी होते.विद्यार्थ्यात नकारात्मकतेचा लवलेशही असणार नाही आणि सकारात्मक दृष्टिकोन अधिकाधिक कसा पेरता येईल यासाठी सरांची सतत धडपड राहिली आहे. त्याअनुषंगाने जे जे करता येईल ते ते सर्व प्रयत्न/उपाय त्यांनी अवलंबलेत.नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेत.त्याचीच फलश्रुती म्हणून सराचे शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या ताकतीने उभे आहेत.याचे सर्वस्वी श्रेय हे सरांच्या कर्तुत्वालाच जाते यात शंका नाही.


कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व अन्य संघटनेच्या माध्यमातून सरांनी संघटनात्मक कार्यही तितक्यात जोमाने पुढे रेटलेत.जी जबाबदारी त्यांनी अंगावर घेतली ती त्यांनी लीलया पेललीत.वारंवार आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवित संघटनेला सरांकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यास भाग पाडले.म्हणूनच संघटने द्वारा सरांकडे अमरावती तालुका अध्यक्ष शिक्षक संघटना,अमरावती जिल्हा सरचिटणीस शिक्षक संघटना, अमरावती जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अमरावती विभाग,उपाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अशी नेतृत्वाची चढती कमान त्यांच्याकडे आली.प्राप्त प्रत्येक संधीचे सरांनी नेहमीच सोने करून दाखविले.तालुका पातळीपासून नेतृत्व करणाऱ्या सरांनी राज्य पातळीपर्यंत नेतृत्वची झेप घेतली.त्यांना प्राप्त पदाचा उंच आलेख म्हणजे संघटनात्मक कार्यातील त्यांची तपश्चर्याच म्हणावी लागेल. संघटनेच्या नेतृत्वाखाली नेतृत्वानी दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही.निस्वार्थीपणे आणि पोटतिडकीने आवश्यकतेनुसार आंदोलने केलीत.मोर्चे काढलेत.उपोषणे आरंभलीत. शासनाच्या अन्यायकारक बाबीचा नेहमीच निषेध नोंदविला.धिक्कार केला.आवश्यक मागणीच्या पूर्ततेसाठी व्युहरचना कशी आखायचे आणि यश कसे पदरी पाडून घ्यायचे याचे प्रचंड कसब त्यांच्याकडे अनुभवातून आले होते.म्हणूनच सरांच्या नेतृत्वात संघटनेला अपयशाच्या जवळही जाता आले नाही.या सर्वस्व श्रेयास सरांचे नेतृत्व कारणीभूत आहे.सामूहिक हक्कासाठी/ कार्यासाठी आरंभलेल्या लढ्यामुळे शिक्षकासह अन्य कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळण्यास सरांची भूमिका साहाय्यभूत ठरली.१९९१ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुवर्णमहोत्सवी वर्षे.त्यानिमित्त पुढील वर्षी म्हणजे १९९२ मध्ये सुद्धा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेद्वारा वाढीव निधी मंजूर करण्यात आला होता.परंतु हा निधी नियोजित कार्यासाठी न वापरता अन्यत्र वळविण्यात आला होता. ही कृती संघटनेच्या पचनी पडले नाही.संघटनेचा तीव्र विरोध आणि दबावापुढे मंजूर वाढीव निधी हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुवर्णमहोत्सवी कार्यासाठी खर्च करण्यास संबंधित प्रशासनास भाग पाडले होते.


जिल्हा साक्षरता अभियाना अंतर्गत स्त्री-पुरुषांना साक्षर करण्यासाठी सरांनी अतिशय परिश्रम घेतले.अभियान म्हणून नव्हे तर एक सामाजिक कळवळा म्हणून त्यांनी आपला सहभाग नोंदविला.शिक्षण हे सर्वांगीण प्रगती/विकासाचे द्वार आहे हा डॉ.आंबेडकराचा मंत्र अंगीकारून सरांनी हे अभियान तितक्याच पोटतिडकीने राबविले. निरक्षरांना साक्षर करून त्यांचे जीवनमान उंचावणे,प्रतिष्ठा मिळवून देणे,स्वयंनिर्भर करणे आणि त्यांचा जीवन मार्ग सुखकारक करणे हा त्यामागे उदात्त हेतू होता.त्यांनी आरंभलेल्या लोकाभिमुख प्रभावी कार्याची दखल घेत जिल्हा साक्षरता अभियान समिती द्वारा पुरस्कृत करून सराचा यथोचित सन्मान व गौरव ही करण्यात आला होता.

     

वाढती लोकसंख्या ही देशासाठी चिंतेची बाब आहे. म्हणून सरकारने कुटुंब नियोजनाची संकल्पना अस्तित्वात आणली.साधारणता नव्वदच्या दशका पूर्वी सर्वसामान्य विशेषता गाव खेड्यातील लोक कुटुंब नियोजनाबाबतीत फारसे गंभीर नव्हते.त्यातच नसबंदी बाबतचा संभ्रम आणि भीतीने त्यात अधिक भर घातली.अशावेळी सरांनी कुटुंब नियोजनाची मोहीम प्रभावी करण्यासाठी इतरापेक्षा जरा हटके उपक्रम राबविण्यास सुरूवात केली होती.लोक नसबंदीसाठी कसे प्रेरित होतील यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेत.त्यात प्रामुख्याने नसबंदी केलेल्या कुटुंबांना जमिनी वाटपात कायद्याच्या कक्षेत राहून प्राधान्य देण्यासह विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविलेत. त्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे कुटुंब नियोजनाच्या बाबतीत विचोरी हे गाव त्यावर्षी मोर्शी तालुक्यात अव्वल ठरले होते.

     

अंधश्रद्धा आणि व्यसन ही समाजाला लागलेली भयानक अशी कीड आहे.ती उखडून फेकल्याशिवाय समाजाची प्रगती साधणार नाही हे सरांनी हेरले होते.तसेच व्यसनाधीन व्यक्तीचे कुटूंबे त्यांनी उध्वस्त होताना पाहिलेत.अंधश्रद्धेतून कित्येक कुटुंबाची प्रगती थांबली हे ही विसरून चालणार नाही. मातृहृदयी सरांना ही विदारक स्थिती पहावयाला जात नव्हती. म्हणूनच त्यांनी निकोप आणि समृद्ध समाज निर्मितीसाठी व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जीवाचे रान केले. त्यांना पूर्णता यश आले नसले तरी कित्येक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे हे कुणीच नाकारणार नाही.व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठीची तळमळ बघून जिल्हा दारूबंदी प्रचार कार्यालय अमरावती तसेच युवा मंच व संस्कार मंच द्वारा सरांचा यथोचित गौरव करण्यात आला तसेच याच कामासाठी दारूबंदी प्रचार कार्यालय अमरावती महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराचेही ते मानकरी ठरलेत.यावरून सरांच्या कामाची उंची सहज लक्षात येते.

      

बिघडत्या पर्यावरणाचा समतोल राखणे हे मानव जाती समोरील एक फार मोठे आव्हान आहे.आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या/विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षाची राजरोसपणे कत्तल केली जात आहे.पर्यावरणाची होणारी ही हानी मानव जातीवर नक्कीच दूरगामी परिणाम करणारी आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सरांनी वनराई मार्फत नित्यक्रमाने वृक्षारोपण मोहीम राबविली "एक विद्यार्थी एक रोपटे"या संकल्पनेतून विद्यार्थ्याच्या पालकाकडून वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करण्याची मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवीली आणि स्वतःलाही या कार्यात वाहून घेतले.यातून सरांची पर्यावरण प्रति असलेली आस्था उजागर होते.

     

शोषित,पीडित,वंचित दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटलेत/लढलेत/ त्यांच्या संघर्षातून भारतात नवी समाज रचना आकारास आली.समग्र परिवर्तन घडून आलेत. गावकुसाबाहेरील समाजाला मुख्य प्रवाहात आणलेत.डॉ. आंबेडकर यांच्या कष्टातून/ प्रेरणेतूनच त्यांच्या कर्तुत्वावर/ नेतृत्वावर विश्वास ठेवणारा नवा आंबेडकरी समाज अस्तित्वात आला.डॉ.आंबेडकर यांच्या कर्तृत्वाची ही चळवळ गतिमान आणि जिवंत ठेवण्यासाठी सर हे अविरत संघर्षरत आहेत. आंबेडकरी चळवळीचे सखोल ज्ञान,उत्कृष्ट भाषणशैली,टीम वर्क,व टीम नेतृत्व करण्यास आवश्यक असणारा अनुभव सरांच्या अंगी आहे.त्यांच्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा उपयोग आंबेडकरी चळवळीसाठी नक्कीच झाला आहे.समाज भूषण राजूजी नन्नावरे यांच्या नेतृत्वात गत दोन दशकापासून अमरावती शहरात एकता रॅलीचे आयोजन केल्या जाते.एकता रॅलीच्या संयोजनातील सहभाग व आवश्यक ते सहकार्य करण्याची वृत्ती त्यांच्यातील आंबेडकरी चळवळी प्रती असलेली प्रचंड तळमळ अधोरेखित करते.

    

कर्तृत्वाप्रति जागृकता आणि संघटनेच्या कार्यावरील निष्ठा लक्षात घेऊन कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने त्यांच्या खांद्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्यात.त्या त्यांनी अतिशय कुशलतेने पेलल्यात.नेतृत्वाने सोपविलेल्या विश्वासाला किंचीतही तडा न जाऊ देता नकारात्मक बाजूला सारून प्रचंड आत्मविश्वास,परिश्रम आणि समर्पणातून घेतलेला वसा त्यांनी नेहमीच पूर्णत्वास नेला.शैक्षणिक कार्यातील तळमळही तितकीच वाखाणण्याजोगी आहे.परिश्रम आणि कष्टाचे फलित म्हणून त्यांच्या जीवन प्रवासात ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेत. विविध संस्था कडून गौरवन्वित झाले.जिल्हा परिषद अमरावती (शिक्षण विभाग) भारतीय मानव विकास संघ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज विशेष गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्काराची प्राप्ती त्यांच्या कार्याची व्याप्ती दर्शविते.

    

एक प्रामाणिक,परखड, अभ्यासू व कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे धनी आणि जनमनातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या पांडुरंग बळीरामजी इंगळे अर्थात पी.बी. इंगळे यांचे हे अमृत महोत्सवी वर्षे.त्यांची ही दैदिप्यमान वाटचाल निरामय स्वास्थासह सुखी,समृद्ध,ऐश्वर्यसंपन्न होवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा-----!


Rate this content
Log in