STORYMIRROR

Bharati Raibagkar

Others

3  

Bharati Raibagkar

Others

को जागरति

को जागरति

2 mins
316

को जागरति?


शरद पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडलंय…हलकीशी गुलाबी अशा थंडीचा किंचितसा शिरशिरी आणणारा गारवा...सुखावह वाटतोय तनामनाला...घराजवळचं देवीचं मंदिर...दर्शनाला येणारे भक्त...आणि मंदिरासमोर काहीतरी मिळेल या आशेने बसलेली गरीब माणसं…आधी त्या गरिबांना वाटुन झालं मसाल्याचं आटीव  दूध दरवर्षीप्रमाणे...नंतर प्रशस्त गच्चीवर मित्र-मैत्रिणींसोबत हास्यविनोदात रंगलेली बहारदार काव्य मैफिल…


*लखलखत्या चंदेरी*

*चांदण्यांच्या झिरमिळ्या*

*आकाशदीप चंद्राचा*

*साजे अंबरी निळ्या*


मधुर दुग्धप्राशन झालं पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने...आणि घरी गेलेत एकेक करत सगळेजण...आता गच्चीवरच्या या झोपाळ्यावर फक्त तू आणि मी…? छे, छे…ते आहे ना...आपले प्रीतसाक्षी... कोण म्हणुन काय विचारतोस...गच्चीवर तर कोणीच नाही…? सगळेच गेले घरी...? हो, हो ठाऊकाय मला…पण जरा वर तर बघ...हं...त्या नीलांगणी…ते लखलखतं पूर्णबिंब...त्याच्याच सान्निध्यात राहायचं असतं नं आज…

बस्स्...आता नको काहीच बोलणं…ऐकुया फक्त आपल्याच हृदयाची स्पंदनं…

एकांती मज समीप

तू असा जवळी रहा

मग खूप काही अर्थ असेल या मौनाच्या भाषेलाच...जो फक्त समजेल तुला आणि मलाच...हं...असाच...अस्साच...असं वाटतंय...मीही एक चांदणी झालेय... रोहिणी...आणि तू माझा...शुक्लेंदू...खूप शांत शांत...तृप्त वाटतंय…हं...असंच...अ...सं...च...


अं...काय बरं किनकिनलंय...लक्ष्मी देवीच्या पावलातील रूणझुणती नुपुरं तर नव्हेत…? हो...आज लक्ष्मी देवी येत असते ना 'को जागर्ती' विचारत...अरे, अरे, अरे...कोण मला दूर करतंय तुझ्यापासुन...नको ना रे...नको ना जाऊ कुठेच...कोण बरं बोललंय…? "आलोच मी…" अं…………...अं……….


अरे…! असं उबदार का बरं लागतंय हे चांदणं...कुठे गेली ती शीतलता…? आणि तो पुनवेचा, आकाशाच्या मध्यावरचा सुवर्णचांदवा…? हा…?हा…? हा तर गर्दकेशरी रविगोल...क्षितीजाआडुन डोकावणारा…

म्हणजे…

केव्हातरी पहाटे, उलटुन रात्र गेली…?

आणि हे काय…! मी एकटीच…? तू...तू कुठे आहेस…? कुठे आहेस तू…? आणि माझ्या अंगावर ही शाल…? मला ही पांघरून तू मात्र कुठे गेलास….........‌?

अरे व्वा…! आलास…? कुठे गेला होतास मला सोडुन... मी इथं एकटीच...पण...तू असा...असा का दिसतोयस…? थकल्यासारखा…? क्का...य…? रक्तदान करून आलास कोणातरी अत्यवस्थ रुग्णाला…? एका तरूण मुलाला…? म्हणजे तो किणकिणणारा आवाज…? तुझ्या डाॅक्टर मित्राचा फोन…? हो...मला माहीत आहे तुझा रक्तगट दूर्मिळ आहे ते...जीवनदान मिळालं त्याला…?

साॅरी…? विरस झाला माझा…? हं...तू येण्यापूर्वी...जरासा...पण आता...मी नाही रूसलेली...आपण दोघं तर नेहमीच आहोत एकमेकांसाठी...पण…को जागर्ति...समाजाप्रती असंही सजग रहायला हवंच...खूप अभिमान वाटतो मला तुझा...असाच आवडतोस मला तू…

आणि हो...तू काहीच नको सांगुस...मी कल्पनेनेच पाहु शकतेय…

त्या तरूणाच्या आई-वडिलांच्या एका डोळ्यातील कृतज्ञतेचे आंसु आणि दुसऱ्या *डोळ्यातील सांडलेलं समाधानाचं हसू…*


Rate this content
Log in