प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

2  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

कौटुंबिक हिंसाचार

कौटुंबिक हिंसाचार

7 mins
2.0K


    भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती पैकी एक आहे.भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीयाला मानाचे व गौरवाचे स्थान दिले आहे."यत्र नार्यस्तु पूजते, रमते तंत्र देयता" अर्थात जिथे स्त्रीचा मान-सन्मान केला जातो तिथे देवता वास करते.असे स्त्रीच्या गौरवाबाबतीत आपल्याकडे सुभाषित आहे. प्रत्यक्षात मात्र विषमतावादी समाजरचनेत तिला दुय्यमच दर्जा दिला जातो.पारंपारिक अनिष्ठ प्रथा-परंपरा,विविध बंधने स्त्रीवर लादलेली आहेत.समाजात महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांची मालिका अजूनही थांबलेली नाही. मानसिक-शारीरिक छळ,हुंडाबळी,भेदभाव इत्यादीचे माध्यमातून स्त्रियाची कोंडी ही अद्यापही कायम आहे.स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण,पतीचा मनमानी व्यवहार,सासू नंनदेचा जाच तसेच स्त्रियांना दिले जाणारे दुय्यम स्थान अशा एक ना अनेक कारणामुळे स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार परिस्थितीला मूक बनविणारे आहेत.अन्याय अत्याचाराचे केंद्र हे सासरच आहे असे नाही तर मुलीच्या जन्मापासूनच "नकोश्री"या चष्म्यातूनच तिला बघितले जाते.अशाप्रकारे स्त्रियांना दुय्यम दर्जा प्रदान करण्यास विविध घटक कारणीभूत आहे.त्यातूनच तिला विविध प्रकारच्या अन्याय अत्याचाराला बळी पडावे लागते. कौटुंबिक हिंसाचार तर ही नित्याची बाब बनलेली आहे. 

   ग्रामीण वा शहरी,गरीब वा श्रीमंत स्त्रियाच्या बाबतीत कौटुंबिक हिंसाचार ही सार्वत्रिक अशी बाब आहे.शोषित/पीडित अशा स्त्रियाकडून कौटुंबिक हिंसाचाराबाबत अधिकांशपणे कायदेशीर तक्रार केली जात नाही/होत नाही किंवा सामाजिक क्षेत्रात या बाबीचा फारसा उल्लेखही होताना दिसत नाही.म्हणून कुटुंबामध्ये कायदाही स्त्रीचे रक्षण करण्यास असमर्थ ठरत आहे.कारण कायदा ही बाह्य नियंत्रण व्यवस्था असल्याचे काही संशोधकांनी सुद्धा स्पष्ट केले आहे.जोपर्यंत स्त्रीयावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबतीतील आवाज हा चार भिंतीच्या बाहेर जात नाही तोपर्यंत कायदा सुध्दा उपयोगी पडत नाही.दुर्दैवाची बाब अशी आहे की,कौटुंबिक हिंसाचाराबाबतीत अधिकांश स्त्रियाकडून कुटुंबाबाहेर वाच्यता सुद्धा केली जात नाही किंवा अशी वाच्यता होऊ नये अशी तिच्याकडून अपेक्षा केली जाते.जगातील वेगवेगळ्या ९० संस्कृतीमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.भारतातही स्त्रियांच्या बाबतीत फारशी वेगळी स्थिती नाही.भारतीय स्त्रिया पुरातन काळापासून अपमान,अवहेलना, यातना व शोषणाच्या बळीच ठरल्या आहेत.स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वपूर्ण बदल झाले असले तरी संपूर्ण भारतीय स्त्रियाविरुद्धच्या हिंसाचाराच्या प्रमाणात फारशी घट झालेली आहे असे दिसून येत नाही.


 हिंसाचाराचा अर्थ

हिंसा ही शारीरिक व मानसिक अशा दोन्ही ही प्रकारची असू शकते.म्हणून हिंसाचाराबाबतीत निश्चित अशी व्याख्या करणे कठीण आहे.असे असले तरी हिंसाचाराच्या बाबतीत विविध अभ्यासकांची मते लक्षात घेता व्यवहारोपयोगी अशी व्याख्या पुढीलप्रमाणे सांगता येईल.

 

उघड किंवा अप्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करून सत्ता,संपत्ती बळ, यासारख्या सामर्थ्याच्या आधारे आपणास हवी असणारी गोष्ट दुसऱ्याची इच्छा नसतानाही तिच्याकडून बळजबरीने हिसकावून घेण्यासाठी केलेले कृत्ये म्हणजे हिंसाचार होय.या बळजबरीमुळे दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक इजा होते किंवा मानसिक धक्का बसतो अथवा शारीरिक इजा व मानसिक आघात दोन्ही सहन करावे लागतात


   उपरोक्त व्याख्येच्या आधारे अपहरण,बलात्कार, हत्या,लैंगिक शोषण,मारहाण,छेडखानी ही सर्व हिंसाचाराची कृत्ये ठरतात.अशा प्रकारातील दृश्य कृत्यांस स्त्रियांना नेहमीच बळी पडावे लागते.सोबतच अदृश्य कौटुंबिक हिंसाचाराला सुद्धा त्याहीपेक्षा अधिक बळी पडावे लागते.विशेष म्हणजे काळानुसार कौटुंबिक हिंसाचारात अधिकाधिक भर पडत असल्याचे विविध संशोधने व अभ्यासावरुन निदर्शनात आले आहे.कौटुंबिक हिंसाचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता भारत सरकारने २००५ मध्ये "कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५"अस्तित्वात आणला. महाराष्ट्र राज्यात या कायद्याची अंमलबजावणी ही २६ सप्टेंबर २००६ पासून सुरू करण्यात आली आहे. महिला सुरक्षितता/संरक्षण व अन्याय-अत्याचार निवारणासाठी या कायद्याअंतर्गत १७ नियम निश्चित करण्यात आले आहेत.त्यात प्रामुख्याने स्त्रियांना घरगुती छळापासून संरक्षण देणे,स्त्रियाचा घरात राहण्याचा हक्क अबाधित राखणे.स्त्रियांना घरात सन्मानाची/न्यायाची वागणूक मिळणे,यासाठी कायदेशीर उपाययोजना इत्यादी तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे.

    कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा हा कायदा पुरुषांच्या विरोधात नसून स्त्रियांचे हिंसाचारापासून संरक्षण करणे आणि मानवतावाद,कायदा,नैतिकता आणि न्याय यांच्याशी विसंगत वर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात हा कायदा आहे.

    २००५ चे कायद्यान्वये कौटुंबिक छळ संकल्पनेची व्याख्या ही पुढीलप्रमाणे आहे.

 अशी कोणतीही कृती जी स्त्रियांच्या मानसिक,शारीरिक, आरोग्यास सुरक्षिततेस,जीवितास, अवयास आणि कल्याणास धोकादायक आहे तिची मानसिक,आर्थिक आणि शारीरिक कुचंबणा करणारी आहे,तिच्या प्रतिष्ठेस धोका पोहोचविणारी आहे त्यास कौटुंबिक छळ समजण्यात आले आहे.

    कोणताही पुरुष अथवा त्याचे नातेवाइकाकडून शारीरिक, मानसिक यौनिक,भावनात्मक आणि आर्थिक नुकसान अथवा दुःख पोहोचविणे किंवा चेष्टा करणे इत्यादी बाबीचा कौटुंबिक हिंसाचारात समावेश करण्यात आला आहे.कौटुंबिक हिंसाचारांतून तिच्याकडे किंवा तिच्या नातेवाईकाकडे हुंडा मागणे,मौल्यवान वस्तूची मागणी किंवा अन्य स्वरूपातील संपत्तीची मागणी करणे किंवा संबंधित महिलांच्या निगडित अन्य व्यक्ती किंवा नातेवाईक याना त्रास देणे किंवा त्याची प्रतारणा करणे तसेच संबंधित स्त्रीला उपहासात्मक आणि अपमानास्पद वागणूक विशेषतः मुल किंवा मुलगा नसताना करण्यात येणारे मौखिक आरोप हे या कायद्याच्या कक्षेत आणले आहे.

   कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ चे नुसार कौटुंबिक हिंसाचारामध्ये पुढील बाबीचा समावेश केला आहे.

१) शारीरिक छळ:-

    मारणे,चावणे लाथाडणे, ठोसे मारणे, ढकलणे,शारीरिक अत्याचार इत्यादी.

२)शाब्दिक किंवा मानसिक छळ:-

 अपमानास्पद,उपहासात्मक बोलणे,नावे ठेवणे,नोकरीस प्रतिबंध घालणे इत्यादी.

३) आर्थिक छळ:-

 घरगुती गरजासाठी पैसे,भाडे हातखर्च इत्यादी न देणे,पगार, उत्पन्न जबरदस्तीने घेणे इत्यादी. ४)लैंगिक छळ:-

    जबरदस्ती करणे,अश्लील चित्रफित दाखविने,बाल लैंगिक शोषण इत्यादी.

    उपरोक्त वर्गीकरणानुसार स्त्रियांना एक किंवा सर्वच प्रकारातील छळाला बळी पडणे महिलांसाठी ही एक सार्वत्रिक बाब बनलेली आहे.


हिंसाचाराची विविध रूपे

    स्त्रियांचा क्षणोक्षणी होणारा अपमान,त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा न मिळणे,स्त्रियांचे अस्तित्व व त्यांना विकासाची संधी नाकारणे इत्यादी मानसिक हिंसाचाराचे पैलू आहेत.मानसिक हिंसाचाराबरोबरच शारीरिक हिंसेला सुद्धा तिला बळी पडावे लागणार नाही अशी स्थिती नाही.भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आढळणारी शारीरिक हिंसाचाराची विविध रुपये पुढील प्रमाणे आहेत.


 कुटुंबा अंतर्गत हिंसाचाराची विविध रूपे:-

    हुंडाबळी,मारहाण, आत्महत्येस प्रवृत्त करणे, लैंगिक शोषण,लैंगिक समस्या,मुलींचे लग्नाचे वेळी वय कमी असणे, जुळवून केलेली लग्ने,लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार,अत्याचार,स्त्रीगर्भ हत्या,स्त्रीभ्रूणहत्या,इत्यादीचा समावेश करता येईल.


कुटुंबबाह्य हिंसाचाराची विविध रूपे:-

   लैंगिक असमाधान/समस्या पुरुषांच्या लैंगिक मागणीस प्रतिसाद न देणे,व चेटकीण म्हणून होणारे खून,वेश्यावृत्ती, सती,लैंगिक असमाधान आणि छेडखणी इत्यादीचा समावेश करता येईल.


कौटुंबिक हिंसाचाराची आर्थिक कारणे:-

    कुटुंब गरीब वा श्रीमंत तसेच धार्मिक,शेतकरी,कामगार,व्यापार,नोकरदार असो त्यांच्या कुटुंबात स्त्रियावर कौटुंबिक अत्याचार/हिंसाचार होणार नाही असे ठामपणे कुणी सांगू शकत नाही. 

   उपरोक्त सर्व अत्याचार/हिंसाचारासाठी सामाजिक दृष्टिकोनाबरोबरच महिलांचे पुरुषावरील अवलंबित्व अधिक कारणीभूत आहे.आर्थिक घटकांशी निगडित कार्य पुढील प्रमाणे आहेत.

१)दारिद्र्य:-

   अधिकांश कुटुंबातील वाद विवाद वा कलहाचे कारण त्या कुटुंबातील दारिद्र्य आहे. कुटुंबातील वाढती गरिबी कौटुंबिक हिंसाचारात दिवसेंदिवस अधिक भर घालणारी आहे.गरिबीने संपूर्ण कुटुंब प्रभावित होत असले तरी सर्वाधिक फटका हा कमावत्या नसलेल्या पण कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी उचलणाऱ्या महिलांनाच अधिक बसतो.

२) बेरोजगारी:-

    समाजातील वाढती बेरोजगारी व वाढते प्रमाण महिलांची कुचंबना करण्यास कारणीभूत ठरत आहे.आवश्यक शिक्षण व कौशल्य अवगत असताना सुद्धा पुरेशा प्रमाणात हाताला काम मिळत नाही.त्यात मर्यादित उत्पन्न कौटुंबिक व अन्य गरजा भागविन्यास पुरेसे असेलच असे नाही.त्याचा परिणाम कुटुंबावर विशेषता महिलावर होऊन कौटुंबिक अत्याचार व हिंसाचारात परिवर्तीत होत असते.

३)आर्थिक विषमता:-

   विकासाच्या प्रक्रियेत देश सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. विकास प्रक्रियेचा लाभ मात्र सर्वव्यापक नाही.त्यामुळे गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याने आर्थिक विषमतेची दरी ही सतत वाढणारी आहे.त्यातच कुटूंबाच्या वाढत्या गरजा पूर्ण करणे अशक्य होऊन बसते त्यातून गुन्हेगारी सारखे प्रकार कुटुंबात वाढते.त्यास कुटुंबातील स्त्रिया अधिक प्रभावीत होत असते. ४)भौतिक सुखाची लालसा:-

    अधिकांश व्यक्ती वा कुटुंबांना भौतिक सुखाची लालसा अधिक असते.मर्यादित उत्पन्नात कुटुंबातील प्रत्येकाची इच्छापूर्ती होईलच असे नाही.अशा वेळी कौटुंबिक कलह वाढतो.त्यात महिला अधिक बळी ठरतात.

५)शिक्षण:-

     एखाद्या कुटुंबातील पुरुष स्त्रिपेक्षा कमी शिकलेला असल्यास त्याला कमीपणा वाटतो त्यांच्यात न्यूनगंड तयार होत असतो.याउलट पुरुष अधिक शिकलेला असल्यास पुरुषी अहंकार जागृत होतो.पुरुष कमी किंवा अधिक शिकलेला असल्यास त्याचा फटका मात्र हा स्त्रियांनाच बसतो.

६) उत्पन्न:-

    कुटुंबातील महिलेचे उत्पन्न हे पुरुषांपेक्षा अधिक असल्यास त्याचा त्यांना आनंद वाटण्याऐवजी कमीपणा वाटतो. स्वतःला तो असुरक्षित समजतो.याउलट कमी उत्पन्न असल्यास महिलेवर वरचढ पणा गाजविला जातो.कमी किंवा अधिक उत्पन्नाचा फटका हा नेहमी स्त्रियांनाच बसतो.

७)अर्थार्जनाची संधी नसणे:-  

   पुरूषांप्रमाणेच स्त्रियाकडे आवश्यक पात्रता आणि व्यावसायिक कौशल्य असतानाही कुटुंबाकडून तिला घराबाहेर अर्थार्जनासाठी मुभा दिली जात नाही.याउलट काही स्त्रियां विशेषतः गृहिणी या कुटुंबावर आश्रित असल्याने आर्थिक स्वातंत्र्य अभावी स्त्रियाची गळचेपी होत असते.

 ८)लिंगाधारित श्रमविभागणी:-  

    महिला व पुरुष यांच्यातील लिंगाधारित श्रमविभागणीने महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो.पुरुषा द्वारे केलेल्या कामाच्या मूल्यमापनाप्रमाणेच महिलांनी केलेल्या कामाचे तितके मूल्यमापन होत नाही.स्त्रियांच्या घरातील तसेच घराबाहेरील स्थानावर विपरित परिणाम होत असतो.भांडवली उत्पादन पद्धतीमध्ये स्त्रीयांना उत्पादक आणि पुनरुत्पादक भूमिका एकत्रित पार पाडणे कठीण जात असल्याने स्त्रियांना कौटुंबिक क्षेत्रातमध्ये सीमित करण्यात आले आहे.

९)पुरुषी अहंकार:-

    एखाद्या कुटुंबातील महिलांच्या माहेरकडील आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यास तिला वारंवार हिणवले जाते. कमी लेखले जाते.अधिकांश कुटुंबात तर आर्थिक निकषाच्या आधारावर मान सन्मान तोलला जातो.सासर बरोबर माहेर सुद्धा यास अपवाद ठरत नाही.


 उपाययोजना

    स्त्रियांना स्वयंनिर्भर व आर्थिक सक्षम करण्यासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.

 १) रोजगार संधी उपलब्ध करणे:-

    स्त्रियांना त्यांची आवश्यक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे तितकेच गरजेचे आहे.अधिकांश कुटुंबातील स्त्रिया या आर्थिक दृष्ट्या पुरुषावर अवलंबून असते.अशा महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्यास त्या स्वयंनिर्भर होऊन त्यांचे परावलंबित्व कमी करण्यास मदत होईल.पर्यायाने त्यांची आर्थिक कुचंबणा थांबण्यास मदत होईल.

२)दारिद्र्य निर्मूलन:-

    कौटुंबिक वाद विवाद व कलहासाठी कारणीभूत ठरत असलेल्या गरिबी/दारिद्र्य निर्मुलनासाठी प्रभावी अशा योजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे.सदरहू योजनेचा लाभ हा खऱ्या अर्थाने गरीब असलेल्या कुटुंबांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे तितकेच आवश्यक आहे.दारिद्र्य निर्मुलन योजनेच्या लाभासाठी महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात यावे.

३)स्त्रियांना स्वालंबी करावे:-

    परावलंबी व दुर्बल असलेल्या स्त्रियांना स्वावलंबी करणे आवश्यक आहे.त्यासाठी कुटुंबाकडूनही त्यांना पाठबळ/प्रोत्साहन मिळणे तितकेच आवश्यक आहे.

४)स्त्रियांना आर्थिक सक्षमीकरण करणे:-

  महिलांवरील अन्याय अत्याचारासाठी महिलांचा आर्थिक कमकुवतपणा हे एक कारण आहे.वेगवेगळ्या माध्यमातून स्त्रियांचा आर्थिक स्तर उंचावणे अत्यंत आवश्यक आहे.आर्थिक दृष्ट्या त्या परावलंबी असल्यामुळे पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत अनेकांगी भेद-भाव आणि अन्याय-अत्याचारास कळत-नकळत त्या बळी ठरतात.म्हणूनच स्त्रियांना स्वावलंबी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे.

५) बचत गटांना बळ देणे:-

    महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंनिर्भर करण्यासाठी आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी बचत गटाची संकल्पना अस्तित्वात आली आहे.बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या संधी प्राप्त झाली आहे.अनेकांच्या कुटुंबासाठी बचत गट हे आधारवड ठरले आहे.म्हणून विविध स्तरावरून बचत गटांना बळ मिळणे आवश्यक आहे.

६)लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन:-

   स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराची मालिका थांबविण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वयंनिर्भर करण्यासाठी मोठ्या उद्योगासह लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि त्यात महिलांना प्राधान्य देणें आवश्यक आहे.असे झाल्यास महिला सक्षम होईलच पर्यायाने त्यांची आर्थिक पिळवणूक सुद्धा थांबेल.शिवाय त्या आर्थिक सक्षम सुद्धा होतील.

७) आर्थिक प्रतारणा थांबवावी:-

   महिला विशेषता गृहिणी ही कुटुंब प्रमुख/पतीवर आश्रित असते.कौटुंबिक वा अन्य खर्चासाठी आवश्यक पैसा हा कुटुंब प्रमुखाकडूनच तिला घ्यावा लागतो.कुटुंब प्रमुखाकडून हात खर्च व अन्य खर्चासाठी अनेकदा पैसे दिला जात नाही.गृहिणीची अशी प्रतारणा होणार नाही अशी दक्षता घेणे आवश्यक आहे.


Rate this content
Log in