सानिका कदम

Children Stories Inspirational Children

4  

सानिका कदम

Children Stories Inspirational Children

हरवले ते बालपण

हरवले ते बालपण

3 mins
349


आज ही ते दिवस आठवले की मन त्या भूतकाळात रमून जात. सारख वाटतं पुन्हा यावे ते दिवस किती ती मज्जा आणि किती त्या गमती-जमती.....कोणताही विचार नाही.कशाची भीती नाही. मनात काळजी नाही की कसलं दुःख नाही ......कधी तो काळ सरला हे कळलं सुद्धा नाही.......


  आज ही मला ती दुपार आठवते आमच्या रेडिओ वर चालू असणारा मराठी गीतांचा कार्यक्रम 12 ला सुरू व्हायचा. त्यात हे गाणं नेहमीच लागायचे "दे रे कान्हा ...कान्हा ...दे रे ...दे रे...चोळी लुगडी". आणि ह्या गाण्याच्याच वेळी आई माझ्या दोन वेण्या बांधायची किंवा मी दोन वेण्या बांधताना हे गाणं लागायचंच ती गाणी ऐकतांना मी माझी शाळेची तयारी करून साडे बारा ला घरातून निघायचे. आम्ही चाळीतल्या मैत्रिणी मिळून एकत्र शाळेत जायचो...... शाळा जवळच होती त्यामुळे चालत जायचो. शाळा तर मला पहिल्या दिवसापासूनच आवडली होती. शाळेतल्या बाई ही खूप छान असायच्या आम्हाला वेगळा क्लास लावायची कधी गरज च भासली नाही. जीवतोडुन शिकवायच्या आणि तितक्याच जोरात मारायच्या सुद्धा....लाड ही करायच्या. शाळेत साजरे होणारे सर्व कार्यक्रम, सण मला आवडायचे त्यात हळदी कुंकू खूप छान वाटायचा. आम्ही मुली साडी नेसून छान नटून थटून शाळेत यायचो त्याआधी फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढायचो आजच्या सारखे मोबाईल नव्हते नं.....म्हणून आता तेच फोटो पाहून आठवणी ताज्या होतात. शाळेची मधली सुट्टी आणि त्या सुट्टीत आम्ही सर्व एकत्र जेवायला बसायचो. प्रत्येकाच्या डब्यात बिनधास्त हात टाकून भाजी आवडीने खायचो . आज ही डोळ्यासमोर त्या मैत्रिणी आणि ते उघडलेले डबे दिसू लागले .......नंतर रामजोडी काय.... साखळी पाणी काय.... , पकडा पकडी काय..... असे किती खेळ त्या मधल्या सुट्टीत खेळायचो आणि वर्ग भरताना 50 पैशाची लाल चिंच खिशात टाकून आणायचो..... आणि वाटून खायचो मस्त! आता ही तोंडाला पाणी सुटलं... ते चिंचेन लाल लाल झालेली बोट .....आहाहा! काय दिवस होते ते किती बदलून गेलं ते सर्व......


 पेन्सिल रबर चा ही हिशोब नव्हता

 अशी निखळ होती मैत्री

 आजकाल माणूसकी ची ही

 देऊ शकत नाही खात्री


   शाळा सुटताना पण वंदे मातरम झालं की "भारत माता की जय!" म्हणून धावत सुटायचो सरळ आणि शिस्तीत एका ओळीत कारण, मध्येच ताई दादा उभे असायचे लाईन मध्ये कोण ढकला ढकली करत आहे का ते बघायला ......घरी आल्यावर ही टेंशन नसायचं हातपाय धुवून मी तर आधी जेवून घ्यायचे. आणि नंतर आरामात चहा वैगेरे असायचा. आज कालच्या मुलांना सारखं सांगावं लागत..... "अभ्यास कर" तसं आम्हाला आमचे आई पप्पा कधीच ओरडले नाही आम्ही लवकर अभ्यास करून 10 वाजायच्या आतच झोपून जायचो...... आज ही आठवत मला श्रीमान- श्रीमती , देख भाई देख, गोट्या, दामिनी, चंद्रकांता, कृष्ण मालिका,अलिफ लैला,आणि रविवारी तर सकाळीच हेमामलिनी उठवायला यायची "रंगोली" घेऊन अशा कितीतरी मालिका आहेत.ज्या आम्ही सर्वजण एकत्र बसून बघायचो. दुपारी एक वाजता लागणार "छायागीत" तर मी न चुकता बघायचे .....मला गाणी तेव्हा ही आवडत होती आणि आताही..! कधी कधी त्या काळच्या सर्व मालिकांचे टायटल सॉग मी ऐकत असते मन भरून येत ते दिवस आठवून.......


  गेले ते दिवस

  राहिल्या त्या फक्त आठवणी


    लहानाचे कधी मोठे होत गेलो हे कळलच नाही .... तेव्हा पाहुणे घरात आले की दूध आणायला आठवणीने जायचो कारण उरलेल्या चारने-आठण्यात चकली,कधी पेप्सी चॉकलेट किंवा 10 बोटातून नळ्या खात यायचो......आम्ही चाळीत असल्यामुळे फेरीवाले ही बरेच यायचे दुपार झाली की इडली वाला अण्णा, अण्णा कडून तर सर्वजण इडली, मेंदूवडा, डाळ वडा घेऊन खात बसायचे. एक वाजता चिक्कीवाला यायचा, रात्री आठ वाजता लिज्जत पापडवाला नऊ वाजता येणारा कुल्फीवाला त्या फेरीवाल्यांचे आवज आजही आठवतात..... गजरे वाला, वेणी वाला, फुलवाला बापरे! किती फेरीवाले यायचे तेव्हा नेहमी कोण घेत नसायचे पण ते आपले ठराविक वेळेत चाळीतून फेरी मारायचे. आता ते फेरीवाले ही नाहीत आणि ते आवाज ही नाहीत सर्वच बदललं ....... ते फक्त आठवणीत जमा झाल......माझ्या आठवणीतील माझं घर माझी शाळा, माझी चाळ, मला आई वडिलांकडून मिळालेलं संस्कार, माझी संस्कृती, माझे जुने सर्व मित्र मैत्रिणी आणि माझे "रम्य ते बालपण" मी कधीच विसरू शकत नाही......

  

  किती सुंदर होत ते जग

  आठवणीत आहे आजपण

  मोठं होताना पाहिलं खरं

  हरवत चाललेल बालपण


Rate this content
Log in