सानिका कदम

Children Stories Inspirational

2  

सानिका कदम

Children Stories Inspirational

माझ्या आठवणीतील दिवाळी...

माझ्या आठवणीतील दिवाळी...

5 mins
97


आजचा विषय पाहिला आणि पूर्वीचे सर्व दिवस आठवले. फक्त कधी कामातून वेळ मिळतो आणि लिहायला घेते असं झालं होत....


   माझ्या आयुष्यातील दिवाळी हा अतिशय आवडीचा सण आहे.....आज ही आठवते मला आमच्या चाळीतली दिवाळी. आम्ही खूप मुलं मुली होतो. शाळेत एकत्र जायचो एकत्र यायचो सर्व काम ही एकत्रच करायचो...


  सहामाही परीक्षा कधी संपते अस व्हायचं .....शेवटच्या पेपरच्या दिवशी दिवाळीच्या सुट्टीतल्या अभ्यासाचाही एक पेपर आमचे वर्ग शिक्षक आमच्या हातात देत असत....

आजही तो पेपर आठवतो. त्यापेपर वर मिळालेल्या प्रत्येक दिवशीचा अभ्यास तारीख टाकून लिहिलेला असायचा .....


  त्याच संध्याकाळी आम्ही दुकानातून एक चांगली वही आणून बाहेर एका चटई वर एकत्र बसून अभ्यास करायला घ्यायचो .....कोणाचा अभ्यास पहिला होतो याची ही तेव्हा शर्यत असायची ....आणि हो फक्त अभ्यास च करत होतो अस नाही, आम्ही सर्व मूल मुली घरात जेव्हा आई पप्पा साफसफाई करायला घ्यायचे तेव्हा त्यांना मदत ही करत होतो....खेळत ही होतो .प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ ठरलेली होती . सर्व कसं सुरळीत चालायचं ... वेळेवर नाश्ता, जेवण, अभ्यास करणे, कामात मदत ,खेळणे, टीव्ही बघणे गप्पा गोष्टी करणे .... आणि वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे .....आता सर्वच खूप बदललं आहे ....


   साफसफाई म्हटलं की आठवत आमच्या चाळीत सर्वांच्या घराबाहेर तांब्या,पितळ स्टील तसेच काचेची सर्व भांडी घासून ठेवायचे. आम्ही ती भांडी कधी धुवायला तर कधी पुसायला मदत करायचो ....घराला कलर काढणे , कंदील बनवणे, लायटिंग करणे, सर्व कसं पटपट होऊन जायचे . शोकेस सर्वांच्याच घरी होत तेव्हा छान शोपीस आणि काचेच्या भांड्यानी ते नीटनिटक ठेवायचो... 

प्रत्येकाच्या घरी रेडिओ असायचा त्यामुळे मोठ्या आवजात गाणी वाजायची काही जण (टेप) वर आवडीची गाणी लावायचे....तेव्हा त्या गाण्यांमुळे कामात ही लक्ष चांगलं लागायचं गाण्यातील शब्दांचे अर्थ ही कळत नसायचे पण सर्व गाणी तेव्हा तोंडपाठ असायची .... काही गाण्यांची तर पूर्ण वाट लावायचो .... (नजर के सामने जिगर के बाम )😀 


  झाडलोट करून झाली की पूर्ण घरभर फेसाच पाणी करून लादी धुवून घ्यायचो ....

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ..... सर्व साफसफाई चालू असताना मध्येच ब्रेक घेऊन गरमागरम वडापाव खायचो. हे ठरलेलं असायचं ....पण खर सांगू आजही तसाच वडापाव खायला मिळतो पण ती टेस्ट होती नं सर्वांसोबत एकत्र खायची ती काही वेगळीच ....


दिवाळीच्या शॉपिंग साठी घरातून सकाळी लवकरच निघायचो ... मला पहिल्या नजरेत आवडलेला ड्रेस कधी कधी आईला आवडत नसे तेव्हा पुढच्या दुकानात असे करून चार पाच दुकान फिरायचो आणि परत त्याच दुकानात यायचो आणि आवडीचा ड्रेस मिळायचं 😀आमच्या चार मुलांच्या शॉपिंग आणि इतर खरेदीला संध्याकाळ होत असे. आमच्या मनासारखी शॉपिंग व्हायची खरं पण आई पप्पा तेव्हा स्वतःसाठी काही घेत नसत..... हे तेव्हा कळत नव्हतं पण आता समजत .....


फराळ साठी काय सामान लागायचं ते आम्हाला काही माहीत नसायचं पण एकमेकींच्या घरी जाऊन करंजी साठी पोळ्या लाटायची मदत नक्की करायचो .... आमच्या ग्रुप मध्ये ठरलेल्या मुली असायच्या त्या छान पातळ पोळ्या लाटायच्या त्यात मी सुद्धा असायचे तर काही करंजी मध्ये व्यवस्थित सारण भरून कापायच्या त्यात माझी बहिण(मयुरी) असायची ..... हे सर्व करताना किती मज्जा यायची तेव्हा.....आज ही ते दिवस आठवून डोळ्यात पाणी आले... खूप आठवण येते त्या दिवसांची .... आमच्या सर्वांच्या दरवाजावर गुलाबी रंगाचेच कंदील असायचे. रात्री सर्व चाळ खूप म्हणजे खूपच सुंदर दिसायची....


पहिली आंघोळ म्हटलं की आम्ही सर्व पहाटेच उठायचो... बाहेर तेव्हा काळोख असायचा ... आणि थंडी ही असायची आई छान सुगंधी उठण नारळाच्या दुधात भिजवून आम्हाला द्यायची आणि तेव्हाचा ठरलेला मोती साबण घेऊन आम्ही आंघोळ करायचो.


आंघोळ झाल्यावर कारीट फोडणे, नंतर सर्वांसोबत एकत्र फराळ करणे , सर्वाना नमस्कार करून आशीर्वाद घेणे, नवीन कपडे घालून एकडून तिकडे मिरवणे .दुपारीच बाहेरच्या ओट्यावर गेरू सारवून ठेवून संध्याकाळी चार वाजता रांगोळी काढायला बसने, फटाके फोडणे, सर्वांच्या सुंदर सुंदर रांगोळी पाहायला जाणे, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे , हेच आमचं तेव्हा काम असायचं . 


  लक्ष्मी पूजन झालं की आई दुसऱ्या दिवशी फराळाच ताट भरून त्यावर विणलेला रुमाल टाकून शेजारी वाटायला सांगायची ... जेवढे मित्र मैत्रिणी तेवढ्या घरात फराळाच ताट फिरायचं..... किती मज्जा असायची त्यावेळी खरंच आणि भाऊबीज च्या दिवशी तर नेहमी पेक्षा जास्त मोठी रांगोळी काढायचो . खूप उशीर व्हायचा त्या दिवशी.... "दिवस मावळला दिवे लागले तरी अजून रांगोळी काढते आहेस" म्हणून घरातून सर्वच ओरडत असत ....सर्व पटपट आवरून आम्ही नवीन कपडे घालून भाऊबीज साठी तयारी करायचो .... मला ते लाल दोऱ्याचे मुज खूप आवडायचे . गुंता होऊ नये म्हणून आई ते सुटसूटीत करून ठेवत असे ...


आईची भाऊबीज शांतपणे होत असे ...पण आमचा मात्र गोंधळ असायचा कारण भाऊबीज झाली की ओवाळणी म्हणून भाऊ मुद्दाम पाच रुपये ठेवत असे ... आणि मस्करी करून आम्हाला चिडवत असे ....पण आम्हाला माहीत असायचे आई पप्पा आधीच आमच्यासाठी काहितरी घेऊन आले आहेत ...आणि खर सांगू तेव्हा भाऊबीज ची भेट म्हणून गुलाबी कागदात गुंडाळलेले ग्लास ,पेला ,वाट्या, किंवा ताट असायचे ....आम्ही ती भेट आवडीने घेऊन पुढचे काही दिवस त्याच ताटातून जेवण, त्याच पेल्यातून चहा (मला आज ही पेल्यातूनच चहा प्यायला आवडतो) त्याच ग्लासातून पाणी प्यायला आवडत असे आणि त्या सर्व भांडयांवर आमचे नावही लिहिलेले असायचे ...आमच्या तिघीं कडून भावाला( बंटीसाठी) स्पेशल गिफ्ट असायचे त्याच्या आवडीचे .....


 आज ही माहेरी गेल्यावर ती भांडी आणि त्यावरची नाव पाहिली की त्या सोन्यासारख्या दिवसांची आठवण होते.... जसजसे मोठे होत गेलो तसे हळूहळू भेटवस्तू ही बदलल्या आता दरवर्षी भाऊबीज गिफ्ट म्हणजे साडी ठरलेली ...कधीकधी बोलते मी दरवर्षी साडी काय ह्यावेळी काहितरी वस्तू दे ... आणि जी वस्तू पाहीजे ती आता घेऊन येते😀 ....हा एक वेगळाच आनंद आहे.....पप्पांना तेव्हा दिवाळीच्या दिवसांतही सुट्टी नसायची पण भाऊबीज ला सुट्टी घेऊन ते सकाळीच त्यांच्या बहिणीकडे जायला निघायचे (वसई, मुलुंड, परळ, आणि शेवटी वडाळा )करून रात्री उशिरा घरी येत असत... पण उशिरा का होईना ते आमच्या सोबत फटाके फोडायचे ....आणि छान दिवाळी साजरी व्हायची ....भाऊबीज झाली की दिवाळी संपली असं म्हणायचे पण पुढचे काही दिवस छोटीसी रांगोळी आणि दारासमोर पणती लावणे चालूच असे ....  


दिवाळीचा अभ्यास करायला घेतलेली वही सजवायला घायचो. मला सोनेरी कागदी पेपर खूप आवडायचा त्याच पेपर च कव्हर लावून वही मध्ये छान रांगोळी, आणि कंदिलाचे चित्र काढून स्केच पेन ने रंग देऊन दिवाळी ह्या विषयावर निबंध लिहायचो. आणि वही डेकोरेट करून सुट्टी संपायच्या आता वही पूर्ण करत असू. 


  आज घरातली साफसफाई चालू असताना हे सर्व दिवसभर आठवत होते .... आज सर्वांची खूप आठवण आली .माझे आई पप्पा, माझी भावंड , माझ्या जुने मित्र मैत्रिणी ,माझे सर्व शेजारी , माझी ती चाळ आणि महत्त्वाचे म्हणजे माझे बालपण ....


"गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी .... "

माझ्या लहानपणी ची दिवाळी खरच खूप छान होती. आणि आज ही तशीच आहे माझ्या आठवणीत...!!


जुन्या त्या आठवणींनी

आज दाटून आलं मन

चाळीतल्या दिवाळीचा 

आनंदी होता तो क्षण 


Rate this content
Log in