ग्रीक दंतकथा
ग्रीक दंतकथा


दुःखाची पेटी
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. मानवी जीवनात आनंद ओसंडून वाहत होता. दुःख तर नावालाही नव्हते. सर्व जण आपापल्या धुंदीत जगत होते कोणताच रोग, व्याधी, भांडणे नाही, कशाचीही कमतरता नाही. सर्वांना सर्व गोष्टी मुक्त हस्ताने मिळत होत्या. त्यामुळे द्वेष नावालाही नव्हता.
मानवी जीवन एवढे सुखकर चाललेले पाहून देवांचा राजा झ्यूस बैचेन झाला. मानवांना देवाकडून कोणतीच अपेक्षा नसल्यामुळे ते देवाकडे कसलीच भीक मागत नव्हते. झ्यूस ला वाटायचं मानवांनी आपली पूजा करावी, आपल्याला मान द्यावा, आपल्याजवळ अगतिक होऊन सुख मागव.
झ्यूसने (देवाने) आपल्या कारागीराला मानवाचे जीवन विस्कळीत करण्यासाठी एक स्त्री निर्माण करण्याची आज्ञा केली. कारागिराने आपले कौशल्य पणाला लावून एक सुंदर स्त्री निर्माण केली. झ्यूसने तिच्याजवळ व्याधी, द्वेष, क्रोध, मत्सर, भांडण, माया, यांनी भरलेली एक पेटी दिली आणि तिला मृत्यूलोकात पाठवून दिले. पृथ्वीवर जाऊन तिने ती दुःखाची पेटी खोलली आणि दुःखाने आपले जाळे पसरण्यास सुरुवात केली.
ही स्त्री खूप सुंदर असल्यामुळे भावा-भावांमध्ये तिचा प्राप्ती बद्दल भांडणे निर्माण झाली. तिने कित्येक स्त्रियांचा संसार धुळीस मिळवला म्हणून त्या तिचा मत्सर करू लागल्या. कित्येकांनी तिच्यासाठी घरदार सोडले व धुळीस मिळाले. तिच्या वियोगाने कित्येकांनी अन्नपाणी सोडले व प्राण गमावले. अश्याप्रकारे पृथ्वीवर दुःखाची छाया पसरली.
झ्यूस राजाचा उद्देश पूर्ण झाला होता मानावांमध्ये कलह होऊन ते सुख प्राप्तीचा मार्ग शोधत होते. अखेर ते देवाला शरण गेले. आपापल्या परीने देवाची यथासांग पूजा करून भक्तीभावने नतमस्तक होऊ लागले. सुखाची अभिलाषा करू लागले. देवसुद्धा प्रसन्न होऊन भक्तांचे संकट निवारण करायला लागला.