Vasudev Patil

Others

3  

Vasudev Patil

Others

घागर भाग पहिला

घागर भाग पहिला

7 mins
555


उन्हं बरीच कलल्यावर सखा बापूनं धावेवरच्या घरातून उठत काठी टेकत टेकत गव्हाच्या शेताकडं निघाले.पाण्याच्या चारीवरील बांधावरून जातांना खालची हिरवी दरडी सुखावत होती.बाकी रानात उभा जाळ होता.त्या मानानं सखा बापूच्या मळ्यात हिरवळ बरी होती. मिरचीचा खिचडा तोडला जाऊन मिरचीच्या निष्पर्ण हिरवट निंबर काड्या उभ्या होत्या. गहू कापला जाऊन खालची बुडं शेतात होती.ती सखा बापून पाच नंतर हवा कमी होताच कोपरीच्या खिशातून आगकाडी शिलगावत पेटवली. चटचट चिटाक करत चुरु चुरु आग पसरताच सखा बापूच्या मळ्यातून धुराचा गराडा शिवारात वरवर चढला.बापू हळूच बाजूला वळसा घेत कांद्याचं रोप, लसुण टाकलेल्या पाळग्यात उभे राहिले.गव्हाचं शेत दुपारचं तप्त उन्ह खाऊन धडाडलं होतं.सारं शेत जळता जळता मळ्यातल्या झाडावर पक्षी परतण्याची सांज सावल्याची कातरवेळ झाली.आंब्यांच्या झाडावर राघू, वडावर बगळे, करकोचे धुराड्याला वळसा घालत आरडत स्थिरावत उडत होती.झाडांच्या सावल्यांनी सारा मळा आपल्या पखात घेतला.सूर्यनारायण पसार होताच साऱ्या शिवारात सावल्या लांबल्या.त्यांना पाहून सखा बापुच्या मनात घालमेल सुरू झाली.आवंतानं लावलेल्या झाडाच्या सावल्या साऱ्या रानास आपल्या पखात घेतात मग आवंता का नाही घेत अजुन आपल्यास पखात!.....

  

निष्पर्ण मिरचीच्या काड्यागतच आपली अवस्था झालीय! या मिरचीनं आपलं सारं दान देऊन आता निसंग झाल्यात .मालकानं येऊन वखर चालवून , उपटून आपणास मोकळं करावं म्हणून.तसंच संसारात आपणही हयातभर देह झिजवुन सारं दान दिलय.मग हे अलक्षा ,का नाही उचलत?  

 

सखा बापू हळूहळू जांभूळ, आंबा, चिंच ,लिंबाची झाडं मागं टाकत वडाखाली धावेवर आला .चालण्यानं त्याला दम लागला. संध्याकाळचा डबा त्यांनीच केव्हाचाच बंद करून दिला होता. कुंड्यातलं पाणी त्यांनी घटाघटा घोटलं.पोटात कळ उठली की ते घटाघटा पाणी पित.ऐन तारूण्यातही आवंताच्या घागरीचं पाणी पिऊनच ते दिवस दिवसभर औतामागं उमेदीनं राबत पण आपण उपाशी आहोत ही कल्पना ही त्यांना शिवेना. घरातनं बाजलं त्यांनी बाहेर धावेवर टाकलं.दुटलं टाकत त्यांनी अंग टाकलं. पक्ष्यांनी आपापली डहाळी,घरोटा पकडत किलबील बंद केली .सखा बापुच्या उरात मात्र विचाराची कलकल उठली. 


   ऐन उमेदीत गावात दुसऱ्याकडं सालदारी करत लहान दोन्ही भाऊ, आईवडील सारं खटलं सखा पोसत होता.त्याच वेळी वना दाजी पण लग्नानंतर सासरवाडीस त्याच्याच गावात आलेला.दोन्ही एकाच मालकाकडं राबत होते.त्याच्याच गावातली पोर पाहण्यासाठी वना सखास घेऊन गेला. सखाची परिस्थिती एकदम टाकाऊ.मालकाचीच बैलगाडी मागून शेतातूनच परभारे गेले.अंगावर धड कपडे नाही.त्याच दिवशी आवंताला पहायला खात्या पित्या बारदान्याचा मुलगा पहायला आलेला.पण त्यानं सावळ्या रंगाच्या आवंतास 'काळी' म्हणून नापसंत करत तिच्याच चुलत बहिणीस होकार दिला.यानं आवंता खवळलेली नी त्याच वेळी वना दाजी सखा बापुस घेऊन गेला.आवंताच्या बापानं रागातच ओटा ही चढू न देता

 "मला नाही करायचं या वर्षी पोरीचं लग्न! माझी मुलगी काही जड झाली नाही मला अजुन!" सखाची पाझरणारी दरिद्री पाहत दोघांना उडवलं. सखाला मेल्याहून मेल्यासारखं झालं.एकतर वडिलांना न सांगता आपण आलोत हीच चूक.त्यात अपमान. वना दाजी मात्र घरात जाऊन आवंता व तिच्या आईस " मुलगा लाथ मारीन तिथं पाणी काढीन.कष्टाला वाघरू आहे.पल बसुन राहत नाही.आवंतीची साथ मिळाली तर उपडीची झोपडी व्हायला वेळ लागणार नाही" सांगत पटवू लागला. आवंतानं आधी पाहून नापसंत करणाऱ्या मुलाचा बदला काढण्यासाठी बाहेर येत 

 "काळी, सावळी आहे पण रानात राबायला कसूर करणार नाही.पटत असेल तर हो म्हण!" एका दमात सखाला विचारलं.सखा तर आधीच घाबराघुबरा झालेला.तसंही नकाराचं करणच नव्हतं. वनादाजीनं सखा बापुच्या घरच्यांना पटवत पंधरा दिवसातच लग्न उभं केलं.चुलत बहिणीआधीच हळद लावत आवंता सखा बापुच्या जिवनात आली.

  दोन्ही लहान दिर, सासु सासरे साऱ्याची मर्जी सांभाळत ती राबू लागली.सखा वाघागत तर ती वाघिणीगत रात्रंदिवस राबू लागली. पण सुगीत व्यवस्थीत चाले तरी आखाड झडू लागला की फाके पडत कारण रानात खाण्या सारखं काहीच नसे व एकट्या सखास मिळणारी खावठी ही संपून गेलेली.दिरांच शिक्षण.मग सखा व आवंताचे उपास घडत.एरवी रात्री एकवेळचं जेवण त्यांना मिळेच ना पण कधी कधी दिवसाही पोटभर मिळेना. पण राबणाऱ्या सखास पाहून आवंताचं व आवंताचं सावळकायेचं सौंदर्य पाहून सखाचं पोट भरे.

 उपाशी पोटी झोप लागेना मग गप्पा मारत ते रात काढत.देण्यासारखं माणसाजवळ जेव्हा काहीच नसतं ना तेव्हा माणसाला स्वप्न व आशाच जगवत असते.

 "काहो, रानात दिवसभर औतामागं फिरतांना ,राबतांना उपाशीपोटी काहीच त्रास होत नाही का?" आवंता पोटतिडकीनं विचारत होती.

" होतो गं.पण रानात तू दिसली नाही का मग.पण तू दिसली की आपोआप पोट भरतं."

" काही तरीच आपलं" मूळच्याच सावळबाधी गालावर चढलेली लाली अंधारात दिसत नसली तरी सखाच्या चेहऱ्यावर मात्र हमखास उमटे.

" आवंते मला कायम एकच इच्छा असते गं!"

" काय?" 

" मी रानात उन ,वारा ,पावसात राबत असतांना तु मस्त बांधावरून डोक्यावर तांब्याची घागर घेऊन डुलत डुलत यावं ,घागरीतल्या डुचमळणाऱ्या पाण्याच्या लयीत पायातल्या साखळ्या वाजवीत.नी मग देहभान हरपुन माझी शीळ घुमतांना सारं रान शहरावं."

" अहो येईन मी घागर घेऊन पण आपलं स्वत:चं रान घ्याल त्यावेळेसच!"

 " आवंते तू साथीला असलीस ना,तर हा सखा रात्र दिवस राबेल नी रान ही घेईल" सखा आवेशानं बोलला.पण तुर्तास त्यालाही माहित होतं की रानच काय पण तांब्याची घागर घेण्याचीही त्याची औकात नव्हती.ही स्वप्न पाहतांना देखील ते उपाशी होते.

   आपल्या धन्याचं साधं स्वप्न पूर्ण करण्या साठी आवंता रात्रंदिवस झटू लागली. दिवाळी नंतर अधिक मास आला. जावयास बोलावणं आलं.पण हंगामात मालक जाऊ देईना.वना दाजीनं परस्पर मळ्यातून सखास पाठवलं.कापसाला पाणी भरता भरता सारे पाय चिखलाचे.तसाच सखा सासरवाडीत गेला.आवंतास धनी आला म्हणून हारीख झाला.पण त्याच वेळेस चुलत बहिणही तिच्या नवऱ्यास घेऊन आलेली.व आमचं एवढं रान, इतकी कमाई असल्या गप्पा.

  बापानं आवंतास व जावयास गोडधोड खाऊ घालत कपडे केले.त्याचवेळी आवंतानं साठवलेले व काही आईनं टाकत मोठी तांब्यांची घागर घेतली.सखाला जिवनात कधीच इतका आनंद झाला नव्हता जेवढा घागर पाहून झाला.

  पण आणलेली घागर मात्र तशीच घरात पडून राहिली दोन वर्ष.मग घागरीनं आपली बरकत द्यायला सुरवात केली.

  आवंदा दिरांना हाताशी घेत दिवसा तर मजुरी करेच पण रात्रीही कुणाच्या गोधड्या शिवून दे, कुणाचं तिखट कांडुन दे, कुणाचं पापड, कुरडाया असलं सामान करून दे ,असली काम करत पैशै गाठीला ठेवू लागली.गव्हू कापणीत तर रात्री ही सखा व ती दिरांना घेत शेतं अंगावर ठरवत कापणी करू लागली.वेड लागल्यागत ते चारही जण राबू लागले.पैशाला पैसे जोडू लागले.त्यातच भिका बामणाचं दोन एकर शेत विक्रीला निघालं. वना दाजीनं सखा बापुच्या कानावर घातलं.पण सखा बापुची बेजमी होईना.आवंतानं सासूबाईचं व आपल्या अंगावरचं सारं किडूक मिडुक देण्याचं ठरवलं.राहतं घरही विकण्याचं ठरवलं.तरी बजेट होईना.सखा कच खाऊ लागला.वना दाजीनं काही आपल्याकडची मदत देत काही उसनवार घेत एकदाचं शेत घेतलं. नी उन्हाळ्यात मालकाचं औत घेत सखा वखरणीस शेतात गेला.आवंतानं बरकत देणारी घागर काढली. डोक्यावर घेत ती स्वत:च्या रानात निघाली.बांधावर डुलत डुलत साखळ्या वाजवत येणाऱ्या आवंताला पाहताच बेफानपणे सारं रान शहारवणारी शीळ सखानं घुमवली.नी बांधावरील जांभळाच्या झाडावर जांभूळ खाण्यासाठी आलेल्या राघून मैनेसोबत डहाळी झुलवली.


 कोरडवाहू शेतात पावसाळा संपताच तिन्ही भावांनी विहीर काढावयास घेतली.दिवसा दुसऱ्याकडं राबत रात्री विहीर खोल खोल जाऊ लागली.पाच सहा महिन्याची पोटूशी आवंता ही विहीरीजवळच राबू लागली.सोसेल तेवढं कष्ट करू लागली. घरात दिनाचा जन्म झाला नी त्याच दिवशी विस फुटावरच विहीरीलाही पाझर फुटला.धावत घरी जात सखानं घागर आणत विहीरीतलं पाणी भरलं. कुशीत झोपलेल्या दिनास पाहून जो आनंद आवंतास झाला त्या ही पेक्षा कैक पटीनं आपल्या रानातल्या विहीरीच्या पाण्यानं भरलेली घागर पाहून झाला.

" अहो माझ्या माहेरी दिनाच्या निरोपासोबतच आपल्या विहीरीस पाणी लागल्याचाही निरोप अवश्य कळवा.लोकांना कळू देत की सखाजीराव बागाईतदार झाले." आवंताच्या पापणकडात लग्नावेळच्या व अधिकमासातल्या चुलतबहिणीच्या दुख:चा कढ होता.

  त्यानंतर सखा व आवंतानं मागं वळून पाहिलं च नाही.दोन एकराच आठ एकर,आठाच अठ्ठावीस एकर केव्हा झालं त्यांनाच काय पण गावाला ही कळालं नाही.विस वर्ष दुसऱ्याकडं राबत स्वत:चं रान सखानं फुलवलं.दोन्ही भावाचं शिक्षण संसार फुलवला.हे सारं कष्ट करतांना आवंताची तांब्याची घागर भरून डुलत डुलत मळ्यात येण्याची साथसंगत होतीच.आवंतानं आठ एकर भिका बाम्हणाच्या मळ्यात जांभूळ, आंबा चिंच अनेक झाडं लावली.जगवली.तिच्या हातालाच जस (यश) होतं.लावलं झाडं जगलंच.

   नोकरीस लागलेल्या भावांनी हिस्सेवाटणी केली.आवंतांनं दोघा दिरांना जास्तीचं रान देत ज्या भिकाबाच्या मळ्यानं बरकत केली तो कमी असुनही स्वत: ठेवला.आवंता हयात असेपर्यंत व राबण्याची ताकद असेपर्यंत मळ्यात येतांना घागर कायम सोबतच असायची.

    सखा बापूला झोप तरळू लागली.त्यांनी कूस बदलली. त्यांना आवंता गेली ते शेवटचे दिवस आठवू लागले.

   नंतर स्वत:चं विकत घेतलेलं घर दिनानं पाडून नविन स्लॅबचं बांधलं.त्यात आवंताचा जिव गुदमरे.सुन 'खटाचं' बोलणं, वागणं नविन घरावर तिचाच ताबा यानं व सारं आयुष्य रात्रंदिवस कष्ट यानं आवंता खचू लागली.त्यात खटाचं सखा बापुस टाकून बोलणं आवंताचा जीव घेऊ लागलं.

 " काहो! मला ही मळ्यातल्या घरातच यावंसं वाटतंय हो." सोबत मळ्यातच राहू!"

" आवंते! चारलोकात उठून दिसणार नाही!" सखा बापू तिला समजावून सांगे.

हे आवंताला न कळण्या इतपत ती दुधखुळी नव्हतीच.पण आपल्या धन्यानं एवढ्या खस्ता खात हा डोलारा उभा केला नी आपण त्यांनाच उतरत्या वयात मळ्यातल्या घरात काढतोय हे तिला जिव्हारी येत होतं.

" मग एक कराल?"

" काय?"

" मला काही झालंच...!"

"आवंते ,काय हे अभद्र बोलणं!" मध्येच अडवत सखा बापू तिला विचारू लागले.

" अहो, ऐका ना.एवढ्यात मला नाही काही होत हो.पण ऐका माझं.माझ्यानंतर दिना, खटीनं कितीही विनवण्या केल्या तरी मळ्यातल्या घरातून इकडं येऊच नका. कारण नाही जितेपणी मला येता येत पण मेल्यावर मी ही तुमच्या सोबतच येईन!"आवंताच्या डोळ्यात आसवे तरळली. सखा बापुचा हात केव्हाच आपसुकपणे आवंताच्या हातात होता.


त्याच रात्री आवंता गेली...

आपला अपमान झाला तरी चालेल पण आपल्या धन्याचा नको म्हणून आवंता सखा बापुस मळ्यातच ठेवे. सखा बापूसही मळ्यात राबण्यातच धन्यता वाटे.दिवसा डबा मळ्यातच येई.तो मळ्यात उतरत्या वयातही कधी पाणी भर ,कधी गवत काढ तर कधी भाजीपाला लाव ,भाजीपाला- फळं तोड असली कामं करत राही.सध्याकाळी भूक असो नसो पण आवंतास भेटण्यास घरी जाईच.त्यावेळी ही खटीचं अंगणात नसणाऱ्या कुत्र्याच्या आडून तर कधी रडणाऱ्या मुलाच्या आडून टोमणे मारणं सुरुच राही. आवंताला ते जिव्हारी लागत मग सखा बापूही आवंताशी चार गोष्टी करत कधी जेवत तर कधी अर्धपोटी तर कधी उपाशीच मळ्यात परते.आवंता गेली नी बापूनं गावातलं घरच तोडलं. जिच्यासाठी ते रात्री जात तीच गेल्यावर घरातली रिती घागर त्यांना ढवंढाय दाटवी.....

 पहाटे झाडावर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली.आणि अक्षय तृतीयेचा सूर्य थोड्याच वेळात मळ्यात उगवला.

पण बापूची ससेहोलपट तर अजुनही वाढणारच होती.कारण "सासू गेली पण सासऱ्याचा जाच माझ्यामागं लावून गेली" म्हणणारी खटीही गावातील घरी अक्षयतृतीयेची घागर भरण्यासाठी उठली होती.


 (क्रमशः)


Rate this content
Log in