घागर भाग दुसरा
घागर भाग दुसरा
आज आवंताचा डेरा भरला जाणार होता.दहा वाजायला आले तरी घरून बोलावणं येईना.सखा बापूला ही जावंसं वाटतंच नव्हतं.दहाच्या सुमारास वना दाजी मळ्यात आला. जिवाभावाचा मित्र येताच आवंतेच्या आठवणीनं सखा बापू गदगदू लागला. गदगदणाऱ्या बापूच्या खांद्यावर हात ठेवत "बापू चल! मला माहीत नाही दिन्या ,खटी बोलवतील की नाही पण माझ्या बहिणीच्या डेऱ्यात पाणी टाकण्यासाठी नाही आला तर तिच्या आत्म्यास शांती मिळणार नाही."
" वना जाणारी तर केव्हाच गेलीय व सुखानं सवाष्ण गेलीय.आता डेऱ्यात पाणी टाकलं काय नी नाही टाकलं काय; काय फरक पडणार नाही! म्हणून मला आग्रह करू नकोस!"
"बापू वेड्यागत वागू नकोस, ती सारी नादान आहेत.ती चुकली म्हणून तू चुकू नकोस!" दाजी बापूस समजावू लागला. पण बापूस आवंताचं शेवटाचं बोलणं आठवू लागलं.' काही झालं तरी मळा सोडायचा नाही.
" बाप्या निवार्णीचं सांगतोय ,जर माझ्या बहिणीच्या डेऱ्यात पाणी टाकायला आला नाही तर हा वना इथंच विहीरीत उडी घेईल तुझ्या समोर!" वना दाजीनं सरळ धमकी देत विहीरीकडं चाल केली.
बापूला घेऊन दाजी आला. सखाचे दोन्ही भाऊही नुकतेच आलेले.बाहेरगावाला असलेल्या भावांनी बापूला पाहताच " बापू कसा आहेस?" मायेनं विचारपूस केली.पहाडासारख्या आपल्या भावाने हयातभर खस्ता खाल्ल्या म्हणून आपणासही सुखाचे घास मिळताहेत याची त्यांनाही कुठंतरी खोलवर जाणीव असावीच.पण जो तो संसारात अडकल्यावर दूर जाणारचं. बापूनं डेऱ्यात पाणी टाकलं.सारे जेवायला बसले.खटी साऱ्यांना आग्रह करून करून वाढत होती पण बापूला मात्र काही एक न बोलता दुर्लक्ष करत होती. बापूला सारं समजत होतं पण आवंता व दाजीमुळं त्यांनी मुकंमुकं बळेबळे दोन चार घास ढकलले.जेवण आटोपताच सारे बाहेर आले.बापू मळ्यात जाण्यासाठी उठू लागला.तोच वना दाजीनं हात धरत इशाऱ्यानंच थोडा वेळ बसवलं.
" अहो ऐकलंत का? जेवण करून मस्त गप्पा झोडताहेत! तिकडं मळ्यात बैलं, गाई उपाशी असतील! त्यांना चारापाणी करायला कोण जाईल? " खटी बापूकडं मारक्या म्हशीगत तिरक्या नजरेनं पाहत नवऱ्यास म्हणाली.
" हा जातो!" दिना संतापात म्हणाला.
" तू बस मी चाललो म्हणत सखा बापू भर उन्हात काठी टेकत मळ्याकडं निघाला.वना दाजीला मात्र त्या ही स्थितीत दु:खातही एक समाधान वाटलं की आपण जर गेलो नसतो तर आवंता ताईच्या आत्मा भरकटतच राहिला असता! बापू आलाच नसता. व ही नादान औलाद फक्त डबाच घेऊन गेली असती मळ्यात .जो बापूनं गाईस चारला असता. पण नंतर मात्र दाजीनं जाणाऱ्या बापूकडं पाहत मनात कळवळला," बाप्या ! वाघासारख्या राबणाऱ्या माझ्या मित्राची परवड नाही पाहू शकत मी आता!"
बापू मळ्यात जाऊन ज्या आंब्याखाली आवंतेस पुरलं होतं त्या ठिकाणी जात झोपून राहिले.
वना दाजीनं त्या दिवसापासून अचानक जेवण सोडलं.तीन दिवसानंतर पुण्याला असलेला मुलगा आला व त्यांना घेऊन गेला. दवाखान्यात अॅडमीट केलं.दहा-बारा दिवस दाजी दवाखान्यात होते.डाॅक्टरांना कळेना.पेशंटची जगण्याची इच्छाशक्तीच त्यांना दिसेना. पंधरा दिवसांनी दाजीचं प्रेतच गावात आलं. बापूनं मळ्यातच हंबर फोडला.
दाजीला मुलानं पाणी दिलं नी स्मशानभूमीतच बापू कळवळला " वन्या लेका वीस वर्ष राबतांना माझ्या पुढं कधी निघण्याची तुझी ताकद झाली नाही. औताला मागे, कापणीत मागे,प्रत्येक गोष्टीत मागे .मग अखेरच्या लढाईतच कशी बाजी मारली नी पुढे निघालास! या बाप्याचा जरा ही विचार केला नाहीस?" साऱ्या गावानंच दोघांचं सख्य व संघर्षही पाहिला असल्यानं बापूच्या काळजाला घर करणाऱ्या शब्दांनी ते आसवांत न्हावू लागले.पण वना दाजीला आपल्या बापूची परवड पाहिली गेली नाही म्हणून तर जिवाजी बाजी लावत दाजीनं अखेरची बाजी मारली होती.
दहा दिवस बापू दिवसभर मळ्यात राबे व संध्याकाळी बापूच्या घरी येत रात्रभर बसे.दाजीचे खूप उपकार होते बापूवर.शेत घेतांना दाजीच त्याला मदत करत हिम्मत देई.प्रत्येक सुख दुखात ते सोबत असत.दसव्याच्या दिवशी पहाटे बापुस दिनानं मळ्यात न जाऊ द
ेता "घरीच अंघोळ करा व न नंतर लगेच दाजीच्या घराकडं या" म्हणून सांगितलं. बापुची घराकडं जायची इच्छा तर होईचना पण दसव्यासाठी लगेच यायचं होतं म्हणून नाईलाज झाला.
बापुनं खटीला न उठवताचअंधारात चाचपडत आपापली अंघोळ उरकली.तोच दिनानं खटीला चहा ठेवायला लावली.खटीची झोपमोड झाल्यानं व म्हातारं मळ्यात न जाता इथं? म्हणून ती संतापली.दिनानं थांबायला लावलं म्हणून बापू किचनमध्येच एका कोपऱ्यात बसले.खटीनं चहा ठेवलेला. चहाला उकळी फुटली.खटीनं मनात काही आखलं.म्हातारं तिच्या टप्प्यात बसलेलं.तिनं छोट्या बल्बच्या पिवळसर अपुऱ्या प्रकाशात मुद्दाम जुनी सांडस काढली.सांडस बेतानं धरली.सांडस गर्रकन रिबीटमधनं फिरली कि फिरवली.चहाची पातेली घुमली ती बापुच्याच बाजूला.उकळी फुटत असलेला चहा बापुच्या अंगावर पडताच बापूचा आकांत सुरू झाला.दिना धावतपळत येत मोठा लाईट लावला.डाॅक्टर बोलावला.बापुच्या एका पायाची चामडी सोलली गेलेली. जखम झालेली.बापुला इंजेक्शन देताच शुद्ध हरपली.दसवं कुठं झालं बापुला समजलंच नाही.तीन दिवस बापू खाटेवरच.पायाजी आग आग होऊ लागली.त्यात कोणी नसलं की खटीच्या डागण्या.
"एवढी हौस होती जळायची तर तिकडं मळ्यातच जळायचं ,का मला उगाच बदनाम केलं.पाय अडवून चहा स्वत:च अंगावर पाडला नी वरून सोंग"
बापू या बोलांनी विदीर्ण होऊ लागला.पण त्यांना मळ्यापर्यंत चालत जायला हिम्मत होईना.
आज आभाळाचा रंग बदललेला.वातावरणात सकाळपासुनच दमटपणा वाढू लागला.मृगाला सुरुवात होण्याचं लक्षण.दिना व खटी तालुक्याच्या बाजाराला लोणच्यासाठी कैऱ्या घ्यायला निघाले.बापूस असह्य वेदना होत होत्या .जखमेच्या ही नी खटीच्या बोलण्याच्या ही. त्यांचा थोडा डोळा लागला.झपकी.
"अहो, ऐकलत का? मृग लागला.पावसाआधी धूळ पेरणी थोडी फार तरी व्हायला हवी.झोपलात काय!उठा मी वाट पाहतेय!येतांना तेवढी घागर मात्र सोबत आणा!" बापु खाडकन उठत बसले.आवंता तू! पायाच्या जखमेत कळ निघताच त्यांना भास झाल्याची जाणीव झाली.
बापू काठीचा आधार घेत लंगडत लंगडत काॅटवरून उठले. घरात कुणीच नव्हतं.त्यांनी पडदीवर ठेवलेली घागर कशीबशी उतरवली.घागरचा स्पर्श होताच अंग शहारलं.
घागर घेत ते मळ्याकडं निघाले.धड चालता ही येत नव्हतं.पण त्यांच्यात बळ संचारल्यागत ते मळ्याकडं ओढले जाऊ लागले.
वातावरणात घामोठा वाढलेला.वारा पडलेला.तप्त उन्हाचा पारा चमकत होता.झाडाची पत्तीही हालत नव्हती.अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या.बापू मळ्यात पोहोचला. दूर क्षितीजाकडं सावळबाधा झालेलं आभूट फुटलं.नी वारा घोंगावत वर चढू लागला.आभूटाचा काळेपणा वाढला.वारा घेंघाणा घेत धुळीच्या लोटास वर चढवत फिरकवू लागला.वारा भरारा वाहत जांभुळ, आंबा, चिंचेला लपेटू लागला.उंच शेंड्यावरची उरलीसुरली टपोरी जांभळं टपाटपा तुटत सैरभैर फेकली जाऊ लागली. कोपऱ्यावरचं पसाद मोहरणाऱ्या आंब्याच्या कैऱ्या तुटू लागल्या.उलगलेल्या आंब्याच्या, जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या कडकड मोडून वाऱ्यासोबत उडत दूर भेलकावू लागल्या. जलथेंब बरसू लागले. हवेत गारवा सुटला. थेंब नाचू लागले.मृदगंध दरवळला.बापुनं घागर डोक्यावर घेतली. त्यांचे पाय आपसूकच आवंताला दफन केलेल्या आब्याकडं वळले.आंबा जवळ येऊ लागला. नभात गडगडाट सुरू झाला, कडकडाट व चमचमाट सुरू झाला.मंद मृदगंधात गडगड,कडकड चमचम मिसळू लागली. बापुस मृदगंधात आवंताच्या घामाचा सुवास,गडगडाडात घागरीच्या डुचमळण्याचा आवाज तर कडकडाडीत व चमचमीत साखळ्याची छुमछुम ऐकू येऊ लागली.डोक्यावरची घागर पावसाच्या पाण्यानं भरू लागली.
बापू आंब्याजवळ आला तोच कडकडाट होत चमचमता प्रपात नभातून धरणीकडं झेपावला.घागर... तांबं... आंबा.... बापू.... एक झाले.पूर्ण आंब्याचं झाडं उभं जळालं........
आवंता.....बापू एक झाले. त्या सोहळ्यात बरकत देणारी तांब्याची घागरही वितळली.
.
.
गावात शिरलेल्या वादळात वनादाजीच्या तेराव्याच्या जेवणाच्या उष्ट्या पत्रावळी आभायात उडू लागल्या.