Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

एक रूपया

एक रूपया

4 mins
251


बसस्टॉपवर येताच नेहमीप्रमाणे मी तिकीट काढण्यासाठी आपल्याकडे सुट्टे पैसे आहेत का याची खात्री करण्यासाठी शर्टच्या खिशात हात घातला तर खिशात अवघा एक रूपया होता. पॅन्टच्या खिशात रूमाल आणि काही चुरगळलेले कागद होते. मग अलिबाच्या गुहेत म्ह्णजे माझ्या खांदयाला लटकवलेल्या झोळीचे सर्व कप्पे उलटे करून पाहिले पण त्यात एक रूपयाही नव्हता. दुसर्‍याच क्षणाला मी माझ्या पैशाचे पाकीट कोठेतरी विसरलो असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावर मी स्वतःच स्वतःवर भयंकर संतापलो. दिवसभर काम करून अगोदरच वैतागलो होतो त्यात हा नवीन ताप नकोसा वाटत होता. वेळ रात्रीची असल्यामुळे त्यावेळी मला त्या बसस्टॉपवर कोणी ओळ्खीचा भेटण्याची शक्यता कमीच होती आणि भेटला तरी माझा स्वाभिमान मला त्याच्याकडे पैसे मागण्याची देणार नव्हताच. आता चालत घरी जाण्याखेरीज माझ्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळे मी फार वेळ न घालविता निमुटपणे चालायला सुरूवात केली. चालताना आपल्याला कोणी ओळखीचा पाहणार तर नाही ना? हा माझाच प्रश्न सारखा मलाच सतावत होता. उत्तरादाखल मी स्वतःशीच म्ह्णत होतो, ‘ मला जर कोणी चालताना पाहिल तर ते विनाकारण आपले बहूमूल्य तास माझ्या चालण्यामागचं कारण शोधण्यात वाया घालवतील. पूर्वी जेंव्हा मी सामान्य माणूस होतो. आता ही मी काही असामान्य माणूस नाही पण इतरांपेक्षा वेगळा माणूस नक्कीच आहे. पूर्वी मला गल्लीतील कुत्राही ओळखत नसे कारण तेंव्हा मी घरकोंबडा होतो. त्यावेळी मी बर्‍याचदा पायीच प्रवास करायचो पैसे वाचविण्यासाठी. तेंव्हा बर्‍याच लोकांना मी मुका आहे की काय असा संशयही यायचा आणि ज्यांना मी मुका नाही हे माहीत होत त्यांच्या मते मी माणूसघाण्या आणि घमेंडी होतो. मी घमेंडी आहे हे मी व्यक्तीशः मान्यच करतो. आणि हो ! माझा घमेंडीपणा मला बर्‍याचदा महागातही पडला होता खासकरून प्रेमाच्या बाबतीत. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी हा माझा स्वभाव, मोडेन पण वाकणार नाही ही म्हण माझ्याबाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते त्यात आमच्या नसानसात मराठयांच रक्त मग काय बोलायलाच नको !


त्या बसस्टॉपपासून माझे घर चालत फक्त एक तासाच्या अंतरावर होत. सहज उत्सुकता म्ह्णून मी तीन-चार तास ही चाललोय... ती उत्सूकता नक्की काय जाणून घेण्याची होती ? यावर चर्चा न केलेलीच बरी. आज माझ्या खिशात फक्त एक रूपया असल्यामुळे माझ्यावर पायी चालण्याची वेळ आली होती पण एकदा माझ्याकडे हजाराच्या नोटा होत्या म्ह्णूनही माझ्यावर चालण्याची वेळ आली होतीच की, रोज हसत हसत मला सुट्टे पैसे देणार्‍यांकडे नेमके त्याच दिवशी सुट्टे पैसे नव्ह्ते. यापूर्वी याच रस्त्यावरून कोणाचा तरी पाठलाग करत मी आनंदाने कित्येकदा चाललो होतो. मग मला आजच या चालण्याचे इतके वाईट का वाटत होते ? मी लोकांना त्यांनी समोरून मागितल्यावर हजारो रूपये अगदी सहज काढून दिले होते. त्यातील एक रूपया ही कधी मला परत मिळाला नाही. आज चालताना मला त्या दिलेल्या पैशाची आठवण येत होती आणि मी स्वतःच स्वतःला प्रश्न विचारत होतो की मला लोकांना हजारो रूपये देताना काहीच वाटले नाही तर कोणाकडे दहा रूपये उसने मागायला मला जड का जाते ? माझ्या या प्रश्नालाही मीच उत्तर दिले, ‘ काहींचा जन्म मागण्यासाठी झालेला असतो, काहींचा जन्म फक्त मिळविण्यासाठी झालेला असतो आणि काहींचा जन्म फक्त देण्यासाठी झालेला असतो, माझा जन्म फक्त देण्यासाठी झाला होता. लहानपणापासून मी फक्त देतच आलो. अगदी करोडपती लोकांनाही माझ्याकडून काहीतरी मिळणे अपेक्षित असते तेंव्हा मलाच स्वतःवरच हसू येते.


आज माझ्याजवळ पैसे नाहीत म्ह्णून मी चालत चाललोय असा विचार मला ओळखणारा कोणीही स्वप्नातही करणार नव्ह्ता. प्रत्येकाला माझ्या चालण्यामागे ही काहीतरी कारण असेल, रहस्य असेल अथवा गुढ असेल असेच वाटणार होते. चालताना अगदी सहज माझ्या मनात एक विचार येवून गेला आज मी अपघाताने चालत होतो पण खंरच कधी परिस्थितीमुळे माझ्यावर अशी चालण्याची वेळ आली तर मी डगमगणार नाही ना ? भौतिक सुखे उपभोगणे आणि त्यांच्या आहारी जाणे हया दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज लोक भौतिक सुखाचे गुलाम झालेले आहेत. त्यामुळे ती भौतिक सुखे मिळविण्यासाठी आजचा प्रत्येक माणूस प्रचंड स्वार्थी झाला आहे. पूर्वी स्वार्थी माणसे अपवादाने सापडत पण आज निस्वार्थी माणसे शोधूनही सहज सापडत नाहीत. मला प्रश्न पडतो मला तर फक्त देण्याची सवय आहे. जर कधी माझ्यावर मागण्याची वेळ आली तर ? आणि मी माझा हेकेखोरपणा नाही सोडला तर माझे रक्षण कोण करेल ? माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जेंव्हा मला वाटले आता आपल्याला आपला स्वाभिमान गहान ठेवावा लागणार पण तेंव्हा तेंव्हा असे काही तरी घडले की मला तसे करण्याची वेळ्च आली नाही.


खिशात हजारो रूपये असताना ही मी तिच्यामागून आनंदाने चाललो होतो, पण आज तिच्यापेक्षा हजार पटीने सुंदर असणार्‍या पर्‍या पुढे चालत असतानाही मी चालताना वैतागलो होतो कारण काळाच्या ओघात माझ्या शरीरासोबत माझा उत्साह ही म्हातारा झाला होता वेळे अगोदरच. आयुष्यात महत्वाच काय आहे ? पैसा, प्रसिध्दी, प्रेम की आणखी काही ? आज चालताना का कोणास जाणे आयुष्यात पैसा फार महत्वाचा आहे हा साक्षात्कार मला अचानक झाला होता, अगदी घरच्यांच्या शिव्या खाऊनही जो झाला नव्हता. पैसा जवळ नसताही मी आनंदी होतो. माझे हे आनंदी असने जवळ्च्यांच्या दुःखाला कारणीभूत ठरत होते कारण फक्त पैसाच कमवायला अक्क्ल लागते याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि जे काम केल्यामुळे पैसा मिळत नाही ते काम निरर्थक ! माझ्या खिशात असणारा तो एक रूपया मला व्यतीत करत होता. माझ्या खिशात असणारा तो एक रूपया मला काही सुचवू तर पाहत नव्हता ना ? एक रूपयाने माझ्या आयुष्यात अनेकदा महत्वाची भूमिका बजावलेली होती. त्याबद्दलचा विचार करत चालता - चालता मी माझ्या घराच्या दारापर्यत येऊन पोहचलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी दारात एक फकीर उभा होता. माझ्या पैशाचे पाकीट माझ्या जवळ होते. पण तेंव्हा ही त्याला देण्यासाठी माझ्याकडे फक्त तो एक रूपयाच सुट्टा होता. मी तो रूपया त्याला दिला आणि तो दिल्यावर स्वतःशीच हसलो कारण तेंव्हा ही मी देणार्‍याच्याच भूमिकेत होतो. तो एक रूपया याचा साक्षीदार होता की माझा जन्म फक्त जगाला देण्यासाठी झालेला आहे. मागण्याचा मला अधिकारच नाही आणि मला जर काही द्यायचेच झाले तर तो देण्याचा अधिकार विधात्याने स्वतःकडे राखून ठेवलाय कदाचित...


Rate this content
Log in