एक मैत्रीण...
एक मैत्रीण...


होळीला मला न राहून कामिनीची आठवण येतेच. मला नचुकता रंग लावणाऱ्यां मुलींपैकी एक ती होती. जग तिच्याबद्दल काय विचार करायचं मला माहीत नाही पण मला मैत्रीण म्हणून ती आवडायची. माझी गुपिते माहीत असलेल्यापैकी ती एक होती. ती ही माझ्यापासून लपलेली नव्हती पण माझा दुसऱ्यांच्या आयुष्यात स्वतःहून ढवळाढवळ न करण्याचा स्वभाव, ज्यामुळे कित्येकांची आयुष्ये मार्गी लावण्याची माझ्यात क्षमता असतानाही मी ते केले नाही. मी तिचे आयुष्यही मार्गी लावू शकलो असतो कदाचित पण दुर्दैवाने मी तसे करणे त्या नियतिलाच मान्य नव्हते.
कामिनी माझी बालपणापासूनची मैत्रीण. माझ्या कविता ज्या मुलींना सुरुवातीपासून आवडायच्या त्यातील एक ती ही. आमच्यातील नात फारच हलकं फुलक होत. मी तिच्यासोबत माझ्या इतर मैत्रिणींकडे जस पहायचो वागायचो तसाच वागायचो पहायचो. पण मला वाटत निसर्गतः म्हणा अथवा ऐन तारुण्यात तिच्या मनात पुरुषांबद्दलच आकर्षण थोडं जास्तच होत. त्याचा काही नालायक पुरुषांनी फायदा घेतला आणि ती वाहवत गेली. तिचा मृत्यू जगाच्या दृष्टीने नैसर्गिक असला तरी माझ्या दृष्टीने तिचा नाहक बळी गेला होता. आपला समाज डोळसपणे विचार करून वागत नसल्यामुळे अथवा नैतिकतेचा अवास्तव बाऊ होत असल्यामुळे अथवा कामिनी सारख्या स्त्रिया स्वतःच स्वतःचा विचार करत नसल्यामुळे समाजात अनेक कामिनींचा बळी जात असतो. पण त्यांचा बळी जाण्यास कारणीभूत ठरणारे पुरुष मात्र सदैव आनंदात असतात. माझे मन प्रत्येकासाठी व्यतीत होते; तिच्यासाठीही व्यतीत झाले होते. पण मी जेव्हा तिला सावरण्याचा विचार केला तेव्हा पाणी डोक्यावरून गेले होते. स्त्रियांचे जीवन खरंच आजही अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. त्यांच्या आयुष्याचे महत्वाचे निर्णय आजही त्यांचे नातेवाईक घेतात. त्यांना स्वतंत्रपणे एक स्वतंत्र माणूस म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार समाज कधी देणार आहे की नाही ? कामिनी चूकलीच पण तिच्या आजूबाजूची परिस्थितीही चुकतच गेली. कामिनी माझ्याहून आठ वर्षांनी लहान पण आमच्यात छान मैत्री होती. ती मला उगाच कधी दादा म्हणाली नाही इतर मुलींसारखी. ती चौदा पंधरा वर्षाची असताना माझ्या मावस भावाला तिने एक प्रेमपत्र लिहले होते. ते त्याने मला दाखविले होतेे. तो तिचे पहिले प्रेम होता पण तो प्रेमाच्या बाबतीत फार गंभीर नव्हता. दहा - बारा पोरीसोबत लफडी करून झाल्यावर नात्यातीलच एका मुलीच्या प्रेमात पडून मार्गस्थ झाला. पण तोपर्यत कामिनीचा मार्ग वळणावळणाचा झाला होता. आपल्या मुलीच पाऊल जरा कोठे वाकड पडतंय अस दिसलं की आजही पालकांकडे एकच जालीम उपाय असतो; तीच लग्न लावून देणे! तिचेही तेच झाले. पण त्या लग्नाने तिचा जीवच घेतला ऐन पंचविशीत! आजही मला आठवतो तिचा तो हसरा चेहरा आणि मी व्यतीत होतो. तिच्या अंत्ययात्रेला मी नाही गेलो आणि शेवटच्या दिवसात तिला पाहायलाही नाही गेलो. कारण तिला त्या परिस्थितीत पाहणे मला शक्यच नव्हते. आता जगाच्या स्मृतीतून ती कधीच नाहीशी झाली, पण मला आठवते कारण माझ्या कविता आवडणाऱ्या एक तरुणीशी तिने माझी स्वतःहून ओळख करून दिली होती. तिच्या स्वभावातील मोकळेपणा मला आजही आठवतो. त्या सोबत तिचा खळखळून हसणारा चेहराही आठवतो. तिचा तेजस्वी चेहरा कलेकलेने निस्तेज होत गेला. मला वाटत तिच्या वाट्याला शापित जीवनच आलं होत दुदैवाने. तीच ज्याच्यावर मनापासून प्रेम होत त्याच्या मनात प्रेमाची किंमत शून्य होती. आणि त्यांनतर ती ज्याच्या प्रेमात पडली, ज्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं त्याला तिच्या घरच्यांचा विरोध होता. त्याच्यासोबत तीच लग्न लावून दिल असत तर कदाचित ती सुखी आणि जिवंत असती. निदान चार दिवस सुखाचे जगली असती. त्याचेही लग्न झाले. तरी ह्यांचे भेटणे बोलणे सुरूच होते. तिच्या घरच्यांनी तिच्या शिक्षणाचे खोटे चित्र उभे करून एका श्रीमंत मुलासोबत तिचे लग्न लावून दिले. पण त्यानंतरही तिचे त्याला भेटणे सुरूच राहिले आणि जे व्हायचे तेच झाले. तिला एक दिवस आपल्या घरी परतावे लागले. त्यांनतर लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या नजरा यांना उत्तर देताना तिची दमछाक होऊ लागली. त्यात तिच्या आईला टीबी झाला होता. त्याच काळात हिचे मानसिक संतुलन बिघडले . मग खाण्याकडे दुर्लक्ष होत इतर प्रकारचे आजार सुरु झाले आणि तिची प्रतिकारशक्ती कमी होताचं टीबीने तिच्या शरीराचा ताबा घेतला. त्यांनतर औषधाने ती बरी झाली पण तात्पुरती. त्यानंतर फक्त वेळ घालविण्यासाठी विवाहित - अविवाहित पुरुषांसोबत या ना त्या कारणाने फिरणे गप्पा मारणे सुरु झाले. या दरम्यान तिचा घटस्फोटही झाला. पण अचानक तिचा आजार पुन्हा बळावला. तिचे मानसिक संतुलन तर बिघडलेले होते, पण ज्यांनी तिला सावरायच ते ही किंचित तिच्याकडे दुर्लक्ष करू लागले. त्यामुळे तिचा आजार बाळावतच गेला. ती अशक्त होत होत अंथरुणाला खिळली आणि एक दिवस तिने या जगाचा निरोप घेतला. तीच लग्न ज्या मुलासोबत ठरलं होत त्या मुलाच्या एका नातलगाने माझ्याकडे चौकशी केली होती. शक्यतो खोटं न बोलणे हा माझा स्वभाव. पण तिच्यासाठी तिच्या भल्यासाठी मी खोट बोललो. आता वाटत खरं बोललो असतो तर बर झालं असत. निदान ती या जगात जिवंत असती, कोठेतरी एक क्षण का होईना गोड हसत असती, माझी एक सच्ची मैत्रीण जगत असती. माझ्या खोटं बोलण्याची किंमत शेवटी मलाही मोजावीच लागली होती; एक मैत्रीण अकाली गमावून! त्या निमित्ताने भगवान बुद्धांची एक शिकवण आठवली - सूर्य, चंद्र आणि सत्य कधीच फारकाळ लपून राहात नसतात.