Vasudev Patil

Others

3  

Vasudev Patil

Others

छपऱ्याची मंजा - भाग तिसरा

छपऱ्याची मंजा - भाग तिसरा

7 mins
895


भाग - तिसरा


   हंबर्डीत, आपल्या मुलीच्या गावात दाजिबानं पाय ठेवताच पावसानं पुन्हा रतिब घालत दमदार हजेरी लावली.काळी काड्याची छत्री सांभाळत दाजिबा अंगणात आला. दीड दोन वर्षाचा गणू - गटलू ओट्यावर उभा राहत मावठीच्या पत्र्याच्या नळ्यातून खाली उतरणाऱ्या धारा इवल्या हातांनी पकडण्याचा प्रयत्न करत होता. मंजिरी घरात भिंतीला टेका लावत आढ्याकडं शून्यात पाहत होती. धाब्यात केलेल्या बिळात पाणी भरलं असावं की काय उंदरं ओली व सैरभैर होतं आढ्या-कड्यातून आसरा शोधत होती. धक्का लागून पाटीवर ठेवलेला रिकामा डबा दणाण आवाज करत खाली पडला. पण उठून तो उचलावा असं ही मंजिरीला वाटेना. भरला असता तर उचलला ही असता.आपल्या नशिबी खाली डबाच का यावा...यानं तिच्या डोळ्यातली काजळकाया पाझरली.त्याचवेळी दाजिबानं छत्री बंद करत झटकत ओट्यावरील खुंटीला टांगली. गटलू धारा झेलण्याचा खेळ थांबवत अनोळखी नजरेनं पाहू लागला. दाजिबाला त्याच्याकडे पाहताच रंजन व दामोजीराव दिसू लागले. तिकडे हंबर्डीच्या शिवारात दूर विजेचा आगडोंब कडकड आवाज करत कोसळला असावा मात्र आगिठा दाजिबाच्या अंतरात उठला. तरी विजेच्या आगडोंबानं जळणाऱ्या झाडाचा काय दोष असा विचार करत शेवटी आपल्या लेकीचाच पोटचा गोळाच! असा उदार विचार करत त्यांनी पोरास उचललं. गटलू भेदरून भिरभिरत्या नजरेनं पाहत 

'माय! माय!' हाका मारू लागला. 


 बापास अचानक पाहताच मंजिरीचा बांध फुटू पाहत होता.पण महा मुश्किलीनं दाबत ती उठली. बापास पाणी देत चहाचं आंधण ठेवलं. दाजिबानं आपलं अर्धवट भिजलेलं डोकं रुमालानं पुसत बैठक मारली. घरात मुआयना करण्यासारखं काही नव्हतंच. चार पाच पारलेचे गंज लागून सडलेले व धुरानंं काळपटलेले डबे, उतरंडीत जुने हारीनं मोठे होत गेलेले माठ, पातेल्या, ग्लास तांबे. दाजिबाच्या काळजात चर्र झालं. आपण आपली गाय कसायाच्याच दावणीला बांधली याची त्यांना पुरती जाणीव झाली.

"मंजू पोरी कशी आहेस?" आवंढा गिळत त्यांनी कसंबसं विचारलं.चहाचा कप हातात देत "बाबा, एकदम स्वर्ग सुखात..."

तोच बाहेरुन छगन आत प्रवेशता झाला.

"मामा केव्हा आलात! अरे व्वा" तो हारिखानं म्हणाला.

त्याला पाहताच तिला रात्रीचा वाकडी घेऊन मारतीच्या पारावर पळणारा तो आठवला नी तिचा बांध पुन्हा जोरात उसंडी मारत फुट लागला.

"मंजा ! मामा आलेत काही तरी चांगलं बनव!" छगननं म्हणताच पुन्हा मटण चेपणारं किळसवाणं रुप दिसू लागलं.

 रात्री जेवण आटोपून मंजिरी व दाजिबा आपापल्या चुकीचा उमाळा काळजातच दाबत रात्रभर जागले.


सकाळी दाजिबानं सोबत आणलेला 'महाराष्ट्र राज्य विद्युत'मंडळाच्या 'आॅपरेटर' पदाच्या भरतीच्या अर्जावर मंजिरीच्या सह्या घेत तिचे

आय. टी.आय. चे सर्व कागदपत्रे जोडली. नंतर छगनला सोबत घेत दुकानातून एक दोन महिने पुरेल इतका किराणा भरुन दिला व गावास परतले.

 छगन म्हैस , शेळ्या चारुन आणल्या की जेवण करून मस्त बस स्टॅण्डवर जाऊन बसे.गावातली चारदोन टारगट पोरं मजा घेण्यासाठी मुद्दाम "काय छगनराव काय मग निवडणुकीत आमदारसाहेब तुम्हास उभं करताय म्हणे!" सांगत चढवत.

छगन मग गालात गोड हसत पायाचा आकडा टाकून रेलून बसे.

"ऐकलंय मी. पण सवता आमदार घरी येऊन विनवणी करतील तरच उभं रायचंय!"छगन तावात येई.

मग मुलं खी खी हसत .

"छगन राव गुलाल नी धुरळा आपलाच"

जाणारे येणारे हासून "छगन्या लेकाचा छपऱ्या हाणण्याचं बंद कर नी काही. तरी पोटापाण्याचं बघ!"म्हणत दमकावत. 

"लोकांना आपलं खरं चालत नाही पहा!म्हणून मी राजकारणात पडत नाही.नाहीतर हंबर्डीला कुठल्या कुठं नेली असती" छगन जास्तच तावानं बोलू लागे.

"या छपऱ्याला हाकला रे! त्या टारगट पोरांनी वात लावायची नी यानं बत्ती द्यायची! येडं बांदर चाललं पुढारी व्हायला !"एखादा शहाणासुरता केकले.म्हणून छगनला सारा गाव छपरीच म्हणत नी आता आता मंजिरीही छपऱ्याची मंजाच झाली.

सकाळी सकाळी गाव दर्ज्यातून मंजिरी डोक्यावर टोपली,कडेवर गटलूस घेऊन निघे.मागून छगन शेळया व म्हैस घेऊन चालला की एखादा

 "कोण रे ही ?" म्हणून विचारी.मग लगेच आजुबाजुला बसलेली एकदोन टाळकी "काका ही आपल्या छपऱ्याची मंजा!" हसत परिचय करून देई.पुढं पुढं मंजिरीनंही छगनला सुट न होणारं आपलं 'मंजिरी' नाव सांगणं सोडलंच व सरळ 'छपऱ्याची मंजा' सांगून मोकळं होई.पण आत उठणारी वेदनेची कळ मेंदूत थेट रंजन गाडेकरचा उद्धार करूनच शांत होई.


एका वर्षातच लेखी, तोंडी होत मंजिरीला खिरणीची पोष्टींग मिळाली.सुरुवातीस छगन नं "मंजा जाऊ नकोस,तू जर गेलीस तर माझं कसं होईल गं!"म्हणत‌ एकच हुडदंग माजवला.मंजिरीला हसावं की रडावं तेच कळेना.पण हा जंजाळ पुढे नेटण्यासाठी नोकरीच आपणास तारेल असा पक्का विचार करत तिनं त्यास समजावत माहेरात वडिलांसोबत पाठवलं.ती गटलूस घेत रूजू होण्यासाठी निघाली.

  खिरणी पंधरा सतरा हजार डोईचं मोठं बाजारपेठेचं गावं. गावात काळी कसदार बागायत जमीन.सर्व जिनसा सहज मिळतील अशी मोठी बाजारपेठ.सब स्टेशन गावापासून अंतरावर एकांतात वसलेलं.

  नंदन नायक म्हणून अभियंता व इतर बराच मोठा कर्मचारी वृंद.

 "मी मंजिरी दाजिबा दाते!आॅपरेटर म्हणून रुजू व्हायला आलीय!मंजिरीनं हातातला आदेश सरकवला.


नंदन नायक साहेबानं मंजिरीकडं पाहिलं. साधी, सालस, नैसर्गिक कलाकृती वा शिल्प एखाद्यानं पहातच रहावं..एकवेळ तर त्यांना पहिला पावसानं वा वळिवानं सारा आसमंत मृदगंधानं भरतोय असाच भास झाला. कसलंही लेपन नाही, कृत्रिमतेचा लवलेशही नाही. भानावर येत नायक साहेबानं समोर खुर्चीकडं निर्देश करत बसायला लावलं. टेबलावरची बेल वाजवत शब्बीर शिपायास चहा सांगितला. चहा येईपर्यंत जुजबी बोलणं. मंजिरीस कार्यालयाचा कुठलाही अनुभव नसल्यानं खुर्चीतही ती अंग आकसून बसली. बोलतांना नजरेला नजर येणार नाही या बेतानं ती त्रोटक उत्तर देऊ लागली. चहा आला इतर सहकारी पण आले. चहा पितांना साऱ्याकडं दुर्लक्ष करत साहेब आपल्याकडंच पाहतोय हे मंजिरीला जाणवलं. पण मंजिरीचं आरसपानी अस्सल सौंदर्य नायक साहेबास भुरळ घालत होतं. पण गळ्यातलं मंगळसुत्र पाहताच नायक साहेबांना अपराधीपणाची जाणीव झाली. दोन तीन दिवस मंजिरीची सोय महिला सहकाऱ्याकडं क्वाॅर्टरवर करण्यात आली. नंतर मंजिरी गावाला परतत वडिलांना शेळ्या, म्हैस विकायला लावली. त्यावेळेस छगननं लहान पोरासारखा आकांत मांडला.

"मंजा नको विकू ना म्हैस शेळ्या!नविन गावाला मी काय करणार मग?"

"तुम्हास तिथं गाडी शिकायचीय.मग नविन ट्रॅक्स घेतली की मस्त तालुक्याला भाडं कमवायचं."मंजिरीनं समजूत काढण्यासाठी काही तरी सांगायचं म्हणून सांगितलं.


मग रात्री छगन गटलूसोबत गाडी चालवायचाच सराव करत बसला. मंजिरीस नविन गावात छगनचं कसं करायचं याचाच मोठा प्रश्न पडला.

 दाजिबानं मंजिरीस क्वाॅटर ऐवजी खिरणीत खोली करून दिली. सारं सामान लावून स्थिरस्थावर होताच दाजिबा परतला. मंजिरी नियमित कामावर जाऊ लागली. छगन गटलूस घेत खिरणी फिरू लागला.खिरणीतीलं दुकानं पाहू लागला. बस स्थानकावर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जीपचालकाशी संधान साधत गाडी शिकवायला सांगू लागला. ड्रायव्हर लोकांनी छगनची अचुक पारख करत क्लिनर म्हणून त्यांच्याकडून गाडी पुसायचं, प्रवाशी भरण्याचं काम करवून घेऊ लागले. छगन आता बसस्थानकावरच रमू लागला. बस स्थानकानं त्याला छगन्या म्हणून अलगद स्विकारलं. छगन आरोळ्या मारून मारून प्रवाशी गोळा करू लागला.

 नायक साहेबानं गळ्यातलं मंगळसुत्र पाहून याचा धनी कोण ते ही पाहण्याचं ठरवलं.नी अवघ्या आठ दिवसातच छगनशी त्यांची भेट बस स्थानकावर झाली.गयबान्या छगनला पाहताच त्यांना कळायला काही त्रास झालाच नाही.'येडं बांदर काय नशीब काढून आलंय! एवढं आरसपाणी सौंदर्याचा मालक होऊन बसलाय. पण नंतर त्यांना जशजशी माहिती मिळत गेली, त्यानुसार मंजिरी सारखं रत्न छगनकडं नुसतं पडून आहे.म्हणजे रत्नही मनासारखं कोंदण मिळालं तर अलगद कोंदणात बसेन म्हणून त्यांनी कपाळावरील कुंकू व मंगळसुत्र पाहायचंच नाही असं पक्क ठरवलं.

  

"बसा दाते मॅडम,कसं वाटलं गाव?आपलं कार्यालय?"नायकांनी दुपारी चहा पिता पिता विषय छेडला.

"छान आहे"मंजिरीनं साहेब म्हटल्यावर नरमाईनं उत्तर दिलं.नायकाच्या मनात मंजिरीचं सालसपण उठत होतं.आजही मंजिरीनं लिंबोणी कलरची साडी घातली होती.केसाचा चापून चोपून अंबाडा घालतांनाही तजेलदार चेहऱ्यावर मस्त बटा डेरेदार गोल आम्रतरूवर देठा-देठानं कैऱ्या लगडाव्यात तशाच भुरभुरत होत्या.मंजिरी हळूच नजाकतीनं त्यांना पुन्हा चेहऱ्यावर येतील अशा रितीनं मागं सारत होती.एकटक पाहणाऱ्या साहेबाकडं मंजिरीनं एखादा चोरटा कटाक्ष टाकताच नायक साहेब आपण ट्रॅपमध्ये असंच अडकून पडावं या विचारानं पुन्हा जोमानं पाहू लागत.


    दिवस महिने जाऊ लागले.मंजिरी नायक साहेबांशी कळत असुनही योग्य अंतर राखत रुळू लागला. मात्र गटलूस साथीला घेत खिरणीत यात्रेत मटनाचा भंडारा, गावातील गोंधळ आमंत्रण असो नसो मस्त सपाटून वरपू लागला.तरी त्यांची मटणाची लिप्सा भागेच ना. मध्यंतरी आंबोलीला प्रशिक्षण निघालं. नायक साहेबानं आपल्या मित्राकरवी आदेश बदलवत स्वत:च्या व मंजिरीच्या नावाचा आदेश काढावयास लावला. आदेश येताच आपल्या नावाचा आदेश पाहताच पाच दिवसासाठी बाहेर जाणं म्हणजे छगन व गटलूची सोय कशी लावावी या विचारानं ती धास्तावली.

"साहेब प्रशिक्षण रद्द नाही का होऊ शकत?"विनतीच्या सुरात समोर उभी राहत मंजिरी उद्गारली.

"नविन लोकांना प्रशिक्षण कंपलसरी असतं.शिवाय ही सुवर्णसंधी असते.तरी काही समस्या आहे का?"

"तसं नाही सर पण कौटुंबिक समस्या" मंजिरी अडखळत बोलली.

"ठिक आहे मी करतो बदल काही तरी" नायक साहेबांनी सांगितलं.


पण मंजिरीला आपण नविनच असल्यानं प्रशिक्षण रद्द करणं योग्य वाटलं नाही. ती बाहेर पडत गावात एस टी डी बूथ वर येत वडिलांना फोन लावत गटलू व छगनला माहेरीच घेऊन जाण्याबाबत सांगू लागली.नेमकं त्याच वेळी त्या ठिकाणी जिल्हा बॅंकेच्या शाखेत नंदन नायक आपल्या कामा करिता आले होते.त्याच ठिकाणी बस स्थानकावर चार पाच ड्रायव्हर दारूत फुल टल्ली होऊन छगनला डुकराला मारावं तसं बेदम मारत होते.पोटात लाथा बुक्क्यांनी बदडतांना छगन ढोरासारखा ओरडत मदतीसाठी याचना करत होता.मंजिरीस हे दिसताच ती धावतच छगनच्या अंगावर आडवी झाली.तरी नशेत चूर असलेल्या एक दोघांनी मंजिरीला बाजूला ढकलत मारहाण सुरु केली.नायक साहेबांनी पाहताच दोघा तिघांना दमदाटी करत बाजूस सारलं.मंजिरी थरथर कापत पाहू लागली.

"काय केलंय त्यानं एवढं मारता आहात त्याला?"नायक साहेबानं दुट्टी भरत विचारत त्यांना दूर लोटलं.

"साहेब हा लई बेरका नी हावरट आहे.आमचं सारं मटण यानं एकट्यानंच चेपलं.याला सोडणार नाही आम्ही.तुम्ही मध्ये पडू नका!"

झालं असं होतं की.गाडी नंबरला लावल्यावर चार पाच ड्रायव्हर बस स्थानकामागं रिकाम्या घरात जमुन पत्ते कुटत बसत.ज्यांचा नंबर तो जाई व त्याची जागा दुसरा घेई.त्या दिवशी एकानं पत्त्यात बराच मोठा हात मारला.कुणी तरी बाहेर गावचा कापसाचा व्यापारी पत्त्यात हरला होता.ज्यांनं हात मारला त्यानं सर्वांना पार्टी दिली.छगनला बोलवत त्यांनी सुरुची डाब्यावर दिड हंडी मटणाची आर्डर दिली.छगन सुरुची ढाब्यावर जाऊन हंडी शिजेपर्यंत बसला.तो वास त्याच्या नाकात जाताच त्याचा जठरानल पेटला.त्यानं कळ सोसत दिड हंडीचं पार्सल बाजरीच्या भाकरी जिरा राईस रिकाम्या घरात आणलं.खेळणारे जेवण येताच पततते खाली टाकत पिण्यासाठी बारवर पळाले.तो पावेतो छगननं इकडं खायला सुरूवात करून दिली.बारवर त्यांना प्यायला उशीर होऊ लागला तसा छगननं पार्सल पुरतं बसवत ढेकर दिला.वर्दी टाकून आलेल्या एकानं हे पाहिलं.छगन खाऊन बस स्थानकावर गाडीत येऊन बसला.पिऊन आलेल्यांना हे कळताच नशा व भूक यानं चवताळत त्यांनी छगनवर हल्ला चढवला होता.हे सारं कळताच नायकानं त्यांना पुरते पैसे देत छगनला मोकळं केलं.मंजिरीला मेल्याहून मेल्यासारखं झालं.पण आज नायक साहेब नसते मध्ये पडले तर?छगनचं काय झालं असतं? विचार करतच ती छगनला घेत घराकडं निघाली.नी दुसऱ्या दिवशी नायक साहेबासोबत आंबोलीला गेली.नायक साहेबाला आश्चर्य वाटलं पण त्याहून जास्त खुशी.रात्रीच्या एशियाडनं ते दोघे आंबोलीकडं रवाना झाले.


(क्रमश:)


Rate this content
Log in