Vasudev Patil

Others

3  

Vasudev Patil

Others

छपऱ्याची मंजा - भाग पाचवा

छपऱ्याची मंजा - भाग पाचवा

7 mins
696


भाग - पाचवा


 एकमेकांच्या छातीस बिलगलेल्या अवस्थेत गटलू व छगन्यास विहीरीतून काढून गजा पाटलाच्या धावेवर टाकण्यात आलं. व तेथून तालुक्याला नेऊन पी.एम. करून दोघांचं गाठोडं दाजिबा व नंदन साहेबानं खिरणीत आणलं.दोघांच्या चितेला अग्नीडाग दाजिबानंच दिला. नंदन साहेबानं आपल्या ओळखीनं पोलीसाचं सारं निपटत उत्तर कार्य सारं पार पाडलं. मंजिरीला तर तोंड दाखवायला देखील लाज वाटू लागली. जन्माच्या वैऱ्यासारखा छगन आपल्या बोलण्यानं निघून गेला! सोबत गटलूसही घेऊन गेला. कसा का असेना पण कुंकवाचा धनी होता.इज्जतीच्या उमरठ्याचा धनी होता. ती स्वत:लाच दोषी मानू लागली. नंतर दाजीबानं नायक साहेबाकडं रजा टाकत दोन महिने मंजिरीस माहेरातच घेऊन आला. सुनं कपाळ व चुड्याविना थोट्या हाताकडं पाहताच तिला छगन व गटलू आठवे. दाजिबानं तिच्या मनातून हळूहळू सारं दु:खं काढलं. पण दोन महिन्यानंतर तिला खिरणीत परतावं वाटेचना. मध्यंतरी नायक साहेब भेटायला आला तेव्हा दाजिबानं बदलीबाबतही विनवणी केली.

"तूर्त कामावर रूजू होऊ द्या मग पाहतो वरिष्ठ पातळीवर सांगून.पण तरी लगेच होणं मुश्कील आहे."नायकानं दातातून निसटू पाहणारा खालचा ओठ रक्त निघेपर्यंत गच्च दाबत सांगितलं. दाजिबानं मंजिरीला खिरणीला आणुन गावातली खोली मोडून सब स्टेशनच्या क्वाटरमध्येच आणलं.मंजिरीनं भरपूर विरोध केला.पण नायकाच्या सांगण्या वरून त्या खोलीतूनच छगन व गटलूची अंत्ययात्रा निघाल्यानं आठवणीनं घायाळ होण्यापेक्षा जागेचा खांदेपालट केलेला बरा.


दार कुणीतरी जोर जोरानं ठोकत होतं म्हणून वर्षभरातील या साऱ्या चक्रातून बाहेर पडत मंजिरी जडावल्या डोक्यानं उठली.

"मॅडम कार्यालयात तुमच्या वडिलांचा फोन आलाय" सांगत दार उघडायला कुणी इतका वेळ लावतं का? असा विचार करत विचित्र नजरेनं पाहत शब्बीर निघून गेला. मंजिरीनं तोंडावर छपका मारुन तोंड पुसत आरशात पाहिलं. सुनं कपाळ पाहताच हृदय गलबलून आलं व वडिल फोनवर काय सांगतील व आपण कुठवर टाळायचं याचं मनात ती गणित मांडू लागली. जाणाऱ्या काळासोबत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं होतं. नायकानं मंजिरीस कह्यात घेण्यासाठी आधी दाजिबास कह्यात घेतलं. दाजिबानं ही छगनचं प्रकरण निस्तरण्यात नायक साहेबानं घरच्यासारखी किती मेहनत घेतली हे पाहिलं होतं.व नंतर मंजिरीस ते कायम सहकार्यच करतात. शिवाय मोठ्या हुद्यावर व अविवाहित. छगन तर आता गेलाच. जाणाऱ्याचं दु:ख किती दिवस कवटाळायचं. नि जाणारा मंजिरीच्या आयुष्यात अपघातानच आलेला. नक्षत्रासारखी असुनही पोरीला जिवनात सुख मिळालच नाही. जर नायक साहेबासारखा जोडीदार मिळाला तर..! पण एवढा मोठा साहेब आपल्या विधवा पोरीला का स्विकारेन? असा विचार करत असतांनाच नायक साहेबानंच मंजिरीचा विषय छेळत लग्नाबाबत विचारल्यावर दाजिबानं हात जोडत "साहेब आपल्या नजरेत असेल एखादं स्थळ तर सुचवा" विनवलं. नायकाला तर आंधळा मागतोय एक डोळा तर देव देतो दोन याप्रमाणंच झालं. व त्यांनी सरळ मंजिरीसोबत लग्नास आपण तयार असल्याचं सांगताच दाजिबाला आधी विश्र्वासच बसेना. ते तर एका पायावर तयार झाले. त्यांनी याबाबत मंजिरीस विचारताच मंजिरी खवळली होती. पण दाजिबा तिला हळूहळू समजूत घालू लागले. आजही फोनवर मंजिरीला दाजिबा पुन्हा तेच सांगत पुढच्या आठवड्यात ते खिरणीला येत असल्याचं सांगितलं.


 मंजिरीला छगनच्या जाण्यामागे आपण जबाबदार असलो तरी त्या दिवशी नायक घरी आल्यामुळेच तिचं संतुलन बिघडलं व ती संतापानं छगनला मटणावरून बोलली. तरी छगननं ते हसण्यावारीच नेलं होतं. कारण त्यापुर्वी ही आपण त्याला किती तरी बोलायचो पण तो त्याच्यातलं जन्मजात दैवी न्युनत्व झाकण्यासाठी कधीच मनावर घेत नसे. पण त्या दिवशी त्यानं नायक आल्याचं लक्षात आलं नी त्यानं तो निर्णय घेतला असावा. म्हणून याला नायक ही जबाबदार आहे असंच तिला वाटे. पण काळ जाऊ लागला. जीवनातील पोकळी तिला ग्रासू लागली. मग छगन तिच्या स्मृती पटलावरुन सरकू लागला. नाहीतरी छगन त्या पटलावर बुजगावण्यासारखाच होता. म्हणून पुढे आपल्या जीवनाचं गलबत हाकारेल असा, गलबताच सुकाणू हाकारणारा कोण? हा विचार तिला छळू लागला. त्यातच नायकाला आपण हवे असलो तरी तो आपणास मिनतवारीच करत आलाय. त्या दिवशी देखील तो काय सांगतोय आपण ऐकलंच नाही व संतापलो. तरी तो निमूट निघाला नी नेमक्या त्याच वेळी छगन आला. त्यानं मंजिरीचं दुसरं मन दोलायमान होऊ लागलं. पण तरी गटलू आठवला की या दुसऱ्या मनाची तिला किळस वाटे व नायकास आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत ती द्वेषानं पाही.

 

दाजिबा आले. आठ पंधरा दिवस राहत मंजिरीला समजावलं. "पोरी! मी आता पिकलं पान.केव्हा गळून पडणार शाश्वती नाही.पण तुझं सारं आयुष्य तुझ्या समोर पडलंय.जाणारा गेला. होता तरी नावालाच.असुनही सुख तुला दिलंच नाही.तरी त्याचं, पोराचं दु:खं तर वाटणारच.पण ते दु:ख कवटाळत बसुन आयुष्य कटणार नाही.जिवनात पुढे पहायचं असतं.नादानपणा सोड."

मंजिरीच्या पापणकडा गटलूस आठवून पाणावल्या.पोरगी रडतेय हाच होकार पकडून दाजिबा कामाला लागला.

नायक साहेबाच्या गावाला गेला.गावाला त्यांचं कुणीच नव्हतं.फक्त म्हातारी आई.नायकानं तशी त्यांना सारी कल्पना ही दिली होती.म्हातारीस पोरांचं लग्न होणार यानं दुनियेचा आनंद झाला. नंतर मंजिरीचा नायकास विरोध मावळला तरी सहजासहजी स्विकारलंही नाही.पण नायकास हळू हळू सारं व्यवस्थित होईल असा भरोसा होता म्हणून तो संयमानं वागत होता.

 

गजा पाटील गेल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात मंदिरात दोघांचं लग्न लागलं. मंजिरीस करंगळीस फक्त हळद लावली होती. लग्न लागलं नी ते लगेच खिरणीत परतले.लग्नातही मंजिरी एकदम शांत,उरात दु:खाचा मोठा सागर उचंबळत असल्यासारखी. रोहिणी नक्षत्र संपलं नी मृग लागलं. खिरणीकरांनी गावास पंगत न देता साहेबानं मंदिरात लग्न केलं हे कळताच निदान गोंधळ तरी घाला म्हणून आग्रह केला. साहेब खंडोबाचे भक्त आहेत हे त्यांच्या बैठकीतल्या लोकांना माहित होतं.नायक साहेबाची आई देखील त्यास लग्नाआधी दारात खंडोबाचा गोंधळ घालायचं विनवतच होती.पण मंजिरी होकार देईल याची शाश्वती नसलेल्या नायकानं होकार मिळताच सारं बाजुला ठेवत सरळ मंदिरात लग्न उरकलं.म्हणुन खिरणीकरांनी गोंधळाचा विषय काढताच त्यांनी होकार दिला. खिरणीकरांनीच सारं नियोजन केलं.पाच बोकड आणत साऱ्या खिरणीकरांना गोंधळाचं आवतण फिरलं.मंजिरीनं आदल्या रातीच नायकास भित भित विनवलं.

"मटणाचं नाव काढलं तरी मला भिती वाटते.प्लिज निदान गोंधळाच्या दिवशी तरी साधं जेवण करा."

"मंजिरी हक्कानं काही तरी मागतेय यानं नायकास एकदम आनंद झाला. पण बोकड आणले गेले .गावातील लोकांना काय वाटेल म्हणून जवळच्या लोकांना बोलवत त्यांनी मधला मार्ग काढला.गोंधळाच्या रात्री साधं वरण बट्टीचं जेवण देत रात्रभर गोंधळाचा जागर घातला.

दुसऱ्या दिवशी मात्र दुपारीच खिरणीत कढाणीत पाच बोकडाचं मटण रटरट शिजत खिरणीच्या आसमंतात मटणाचा वास घमघमला.

 रोहिणीत टिपुसही गळला नव्हता.खिरणीत तीन पर्यंत मटणाच्या पंगती उठल्या सारे घामाच्या धारात निथळत तृप्त होत ढेकर देत आवरा सावर करू लागले. 


मटणाच्या वासानं की गोंधळाच्या जागरानं की इतर काही.... की निसर्ग नियमानं खिरणीच्या आभाळात ढगांनी अचानक गचबूच दाटी केली. घनघोर (मेघगर्जना) होऊ लागला. उठलेल्या वावटळीत उष्ट्या पत्रावळी गोलगोल फिरत, घेर धरत उडू लागल्या.गजा पाटलाच्या मळ्याकडं विजेची काकरी चमकत कडकडाट झाला. नंदननं ओल्या हळदीच्या अंगानं करंगळीला हळद लागलेल्या पण अंघोळीनं ही न उतरलेली कालच्या गोंधळातील भंडाऱ्याच्या हळदीनं माखलेल्या मंजिरीस पुढ्यात घेत गावातून सबस्टेशनवर आणलं. पाच वाजेपर्यंत मृगाच्या पहिल्या पावसानं खिरणीच्या साऱ्या रानास तृप्त केलं. आसमंतात मृदगंध उठला पण मटणाच्या वासाच्या पार्श्र्वभूमीवर तो ही फिकाच पडला. वावटळीनं जिकडे तिकडे जंगलात पोल वाकले, पडले. विजेच्या तारा तुटल्या व बरेच फिडर बंद पडले. वातावरणात जिवघेणी शांतता पसरल्यासारखं भासू लागलं. साऱ्या आसमंतात झगार (पावसाची अंधारी) पसरली. नायकास गोंधळ घातला गेल्यानं बारा वाटा मोकळ्या झाल्यानं सुटलेल्या मृदगंधानं व गावातून सबस्टेशनला परततांना मंजिरीच्या स्पर्शानं रोम रोम पुलकीत झाल्यासारखं वाटू लागलं.


पाऊस उघडताच त्याचे कर्मचारी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्या साठी निघावं की अंधारानं उद्याच जावं या भ्रांतीत निघाले.

संध्याकाळ उलटून ओलेती काजरबिलाई रात उतरू लागली. नंदननं गावातून गुलाबाची फुलं, मोगऱ्याच्या माळा, गजरा काहीबाही आणलं. तो स्वत: ही सवरू लागला. पण त्याच वेळी मृदगंधासही पुरुन उरलेल्या मटणाच्या वासानं सबस्टेशनच्या लोखंडी फाटकाजवळ गजा पाटील मरून पडलेल्या जागी अंधारात काहीतरी वळवळ उठत होती. तर कामावर असलेल्या व आॅपरेटरला जंगलात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याचे सारखे फोन येऊ लागले. तसे फीडर बंद होऊ लागले तर वायरमन अंधारातही जमेल तसं काम करत काही फिडर सुरू करू लागले.


रात्र चढू लागली. खिरणीकर दुपारचं मटण रिचवण्यासाठी व दुसऱ्या दिवशी शेतात कामाची लगबग उडणार म्हणून लवकर झोपायची तयारी करू लागले. शब्बीर शिपाई कार्यालयातच झोपला. फाटकापासून शंभर दीडशे फुटावर जुनं पण मजबूत बांधकाम असलेलं सब स्टेशनचं कार्यालय. मागच्या बाजुस सारा लवाजमा पसरलेला. तर समोर रस्त्याच्या पश्चिमेला मोकळ्या जागेत लोखंडी, सिमेंटचे पोल, तारा ,चिनी मातीचे इन्शुलेटर व इतर भंगार पडलेलं. फाटकापासून सरळ रस्ता कार्यालय व तेथून दूर अंतरावर असलेल्या क्वार्टरकडे येणारा. दोन्ही बाजुस जुनी भलीमोठी जांभळाची झाडं. आजच्या वावटळीनं व पावसानं त्याच्याखाली उरल्यासुरल्या जांभळ्या जांभळाचा खच पडलेला. क्वार्टरच्या गॅलरीला लागुनही जांभळाच्या झाडाची गच्च दाटी.

फाटकाजवळचे मोठे लाईट पिवळा झिरमिरता प्रकाश फेकत असले तरी झाडाच्या दाटीत तो आटल्यासारखाच भासत होता. शब्बीरला फाटक कुणीतरी वाजत असल्याचा भास झाला. त्यानं उठून बाहेर येत पाहिलं. लाईटच्या उजेडात किड्यांचा थवाच उडत होता. सकाळी त्यांचे पंख गळून खाली खच दिसेल हे शब्बीरनं ताडलं. फाटकाजवळ येत त्यानं इकडे तिकडे पाहिलं. पण काहीच दिसेना. तो परतला व झोपला.


  मंजिरी कालचं जागरण व आजची धावपळ व वातावरण यानं थकव्यानं लगेच झोपली. नंदन कपाळाला हात मारत गुलाबाच्या पाकळ्या विस्कटत अंधारात बसला. त्यानं सारे लाईट्स घालवत देवघरातला झिरो बल्ब चालू ठेवला. बारा वाजले. त्यानंही मग त्रागा करत झोपायचं ठरवलं. गॅलरीतल्या जांभळाच्या झाडात सळसळ दाटल्याचं त्याला जाणवलं. मागच्या खोलीच्या उघड्या खिडकीतून थंड हवा आत येत गारवा पसरवत होती. नंदन झोपला. दारावर कुणीतरी थापा मारत असल्याचं त्याला जाणवलं. त्यानं डोळे चोळत, झोप झटकत उठत दार उघडलं. दरवाज्यात कुणीच दिसेना. त्याला वाटलं स्वप्नात भास झाला असावा. तरी इकडं तिकडं पाहत तो परतू लागला. तोच त्याला गॅलरीतल्या जांभळाच्या झाडाखाली काहीतरी दिसलं. परतणारी पावलं थबकली. तो तसाच पलटला व पाहून चक्रावला. एक लहानसं मूल पावसानं पडलेली जांभळं वेचत होता. एवढ्या रात्री आणि लहान मूल?....


 (क्रमश:)


Rate this content
Log in