Vasudev Patil

Others

3.8  

Vasudev Patil

Others

छपऱ्याची मंजा - भाग चौथा

छपऱ्याची मंजा - भाग चौथा

7 mins
737


 भाग -चौथा


आंबोलीहून परततांना ठाण्यास मंजिरी नकार देत असतांना नायक साहेब शाॅपिंग माॅलला जबरीनं घेऊन गेले. त्यांनी मंजिरीस अनेक वस्तू देऊ केल्या पण तिनं नम्रपणे नकार देत काहीच घेतलं नाही. त्यांनी रेड अॅण्ड चिफ चे शूजचे आठ नंबरचे दोन जोड घेतले. खिरणीत नायकसाहेब परतले तेच नाराज होत. तर ट्रेनिंग सेंटरला मस्टरवर सही करताना नायकानं मंजिरीस आपल्याजवळील आॅर्डर दिली. त्यावर मिसेस जोशीच्या खोडलेल्या नावावर आपलं नाव पाहून मंजिरीस आपल्याला मुद्दाम आणलं गेलं हे लक्षात आलं व तिचा पारा चढला. म्हणून पाच दिवस मंजिरीनं नायकास फडकूही दिलं नाही. परतल्या परतल्या नायकानं मंजिरी नसतांना छगनला गाठून रेड अॅण्ड चिफ शूज दिले.छगन तर ते पाहताच खूश झाला.व तो बाॅक्स छातीला लावत पळतच घरी आला. मंजिरी पीठ कालवून पोळ्या करत होती.भरलेल्या हातांनी ओट्यावर येत तिनं पाहिलं .छगन खोक्यातून शूज काढुन पायाऐवजी हातात घालून मस्त गालावर फिरवत नव्या कोऱ्या शूजचा वास घेत खुशीत लहरत होता.


मंजिरीनं ठाण्यास नायक साहेबानं घेतलेले दोन जोड आठवले.तिला तेव्हाही प्रश्न पडलाच होता की दोन जोड का बरं घेतोय हा!पण ती घरी परतण्याच्या धुंदीत नायकास टाळत असल्यानं व विचारणं संयुक्तिक नसल्यानं तिनं तसं विचारणं टाळलं होतं.पण छगनच्या हातात एवढे महागडे शूज पाहताच ती समजली.नायकानंच याला दिले असावेत.ती संतापली.

"कुठुन आणलेत बूट?कोणी दिले?"

"मंजा,मी नाही मांगितले.तुझ्या साहेबानंच स्वत: दिले.नी मला खूप आवडले."म्हणत छगनचं गालावर फिरवणं सुरूच होतं.

"परत करा ते!कुणाकडुन फुकटात असल्या वस्तू घेऊ नयेत!" ती संतापत छगनला समजावू लागली.

" नाही मी परत करणार नाही!साहेब किती चांगला आहे.त्यानं मला स्वत: दिलेत ते!"छगन बूट घट्ट धरत म्हणाला.

मंजिरीस कळून चुकलं की याला सांगून उपयोग नाही.हे हा वापरणारही नाही तरी नाहक आपणास दोन हजाराचा हा भुर्दंड सोसावा लागेल.

 दुसऱ्या दिवशी आॅफिसला जाताच कोणी नाही पाहून नायकाच्या टेबलावर मंजिरीनं पैसे ठेवले.

"दाते मॅडम ,काय हे?"

"आपण शूज दिलेत त्याचे हे पैसे, धन्यवाद."

"मॅडम ते कळतंय मला पण ते मी माझ्याकडून दिलेत छगनरावांना.नी तुम्ही मला पैसे देऊन माझीच किंमत करता आहात!"

"तसं नाही साहेब पण काही कारण नसतांना भेट स्विकारणं मला नाही आवडतं,माफ करा पण ..."

नम्रपणे हात जोडत ती चटकन निघाली.


नायकानं संतापानं विव्हळत त्या नोटा फाडून फाडून तुकडे करत मंजिरीजवळ ठेवलेल्या डस्टबीनमध्ये टाकल्या. मंजिरीनं मनातल्या मनात' तू फाड की काहीही कर मला घेणंदेणं नाही पण मी बोज्यात राहिली नाही' म्हणत ती समाधान पावली. नायक मात्र हिनं तर काही घेतलंच नव्हतं ठाण्यास पण छगनरावास दिलेलंही ....म्हणून दिवस त्याच जोड्याचे वळ गालावर उमटवत घालवला. तर छगन तेच बूट उशाशी घेत रात्री मस्त झोपला. मात्र पायात घालावयाची वस्तू डोक्यावर घेणाऱ्यासाठी आपण आपल्या मनास मारतोय ! देवा तुझा न्याय ही किती अजब!कसल्या जोड्या जुळवोस रे तू! मनासारख्या जोड्या न बनवायला काय जातंय तुझं?,म्हणत मंजिरी रात्रभर जागत तळमळत राहिली. नायकास दुखवल्याबद्दल तिला वाईट ही वाटलं.

  बस-स्टॅण्डवर मार खाल्ल्यापासून छगन तिकडं जाणं टाळू लागला. तो आता मंजिरीच्या आॅफिसातच गटलूस घेऊन येऊ लागला.आवारात पडलेल्या वस्तू घेत गटलूबरोबर टाईमपास करू लागला. मंजिरी त्याला खुणेनं घरी जाण्यास दटावू लागली तर हा मंद लाजिरवाणं स्मीत देत तिच्याकडं पाहणं टाळू लागला. तोच नायक साहेब त्याला दिसले. त्यानं हातानच बुट छान असल्याचं खुणवलं. त्याचा इशारा पाहून नायक साहेबास हसू आलं.

"काय छगनराव या बसा!"नायकानं मुद्दाम त्याला बोलवत बसवलं. मंजिरीला जी भिती होती तेच घडलं. मग नायकानं छगनशी गप्पा मारत बऱ्याच गोष्टी काढून घेतल्या. नंतर मात्र मंजिरीनं घरी जाताच छगनला दुट्टी भरत आॅफिसमध्ये येण्याचं बंद केलं. मग छगन कोणत्याही किराणा दुकानावर जाऊन तिथं सटरफटर मदत करत टाईमपास करू लागला. नायकाला मात्र एक ना एक दिवस मंजिरीचं आपण मन वळवूच याची अजूनही खात्री होती.

 

गावातील तुका जाधवानं शेतात विहीर खोदली.आधीच्या दोन ट्युबवेल फेल गेल्यानंतर या विहीरीस भरपूर पाणी लागलं.साहेबाकडनं वीज कनेक्शन त्वरीत मिळालं.पहिल्या वर्षीच त्याला बक्कड कमाई झाल्यानं त्यानं गावास गोंधळ करत बोकडांचा भंडारा द्यायचं ठरवलं. साहेबानं कनेक्शन दिल्याचे उपकार म्हणून तो साऱ्या स्टाॅफ ला आमंत्रण देत साऱ्यांनी पाचला सोबत जेवायला याच म्हणून विनंती करून गेला.

"काय मंजिरी मॅडम येणार ना सोबत जेवायला?"नायकानं विचारलं.

मंजिरीचा सहवास त्यांना हवा हवासा वाटे.

"आले असती पण घरी ते व गणेश एकटेच म्हणून माफ करा आपण या.मला नाही शक्य." मंजिरीनं नकार दिला.

"या हो मॅडम!जाधव प्रेमानं आमंत्रण देऊन गेलेत.व सारे राहणार नी तुम्हीच नाही म्हटल्यावर...!" जोशी मॅडमही बोलल्या.

तरी मंजिरीनं नम्रपणे माफी मागत नाकारलं.तिला ही आत कुठे तरी साऱ्यासोबत जावं, फिरावं वाटेच.पण साऱ्यांचे जोडीदार असणार व आपण एकटं!बरोबर वाटणार नाही, नी छगनला सोबत नेणं म्हणजे उरलीसुरली सारी इज्जत घालवणं.म्हणून तिनं घरीच मटण आणून छगन, गटलूस खाऊ घालण्याचं ठरवलं. मधल्या सुटीत तिनं घरी येत छगनला मटण आणावयास पैसे दिले.व गोंधळात जायचं नाही मी घरीच दुपारून मटण शिजवते म्हणून सांगत परतली.छगननं मटण आणून घरी ठेवलं.पण येतांना गोंधळात शिजणाऱ्या मटणाच्या वासानं तो उफाणला.त्यानं विचार केला,मंजिरी येईल स्वयंपाक करेल तो पावेतो आपण गोंधळात मस्त बत्ती देऊन परतू.असा विचार करत त्यानं गटलूस घेतलं व निघाला.

मंजिरी आॅफिसला परतली तर सारेजण आधीच जाण्याच्या तयारीत होते.नायक साहेबांनं एकांत साधत मंजिरीस पुन्हा विनंती केली.पण छगनचं कारण दाखवत नाही म्हटलं.


सारे निघून जाताच ती ही घरी परतली.तिनं स्वयंपाकास सुरुवात केली.गटलू छगन असतील इथंच कुठं तरी असा विचार करत ती स्वयंपाक करू लागली. ज्याच्यासाठी मंजिरी आली नाही तो गोंधळाच्या मंडपात एका कोपऱ्यात बसुन दोन पंगतीपर्यंत खातोच आहे ,लोक हसत आहेत,वाढणाऱ्यानं संतापानं मटणाची बादलीच त्याच्याजवळ ठेवून दिली. हे पाहून नायकास वाईट वाटलं.तो तसाच उठला व मंजिरीच्या घरी आला.

त्याला पाहताच मंजिरी घाबरली.ती ततफफ करु लागली.पण तरी हा पहिल्यांदाच घरी आलाय व साहेब आहे याला दारातच उभं करणं योग्य नाही.निदान पाणी तरी द्यायला हवं.

"या "म्हणत तिनं पाणी दिलं.

पलंगावर बसत नायक घरात इकडं तिकडं पाहू लागला.

"मंजिरी तू ज्याच्यासाठी सोबत आली नाही तो तर मंडपात बसून मस्त जेवतोय! का ? का? स्वत:वर इतका अन्याय करतेस!"नायक कळवळून बोलला.

पण आपला एकेरी उल्लेख ऐकताच मंजिरी सावध झाली.ती कोपऱ्यात सरकत " का आलात?" विचारती झाली.

"ऐक माझं....छगन आहे राहू दे....पण मी ही...."

मंजिरी बिथरली दरवाज्याकडं जाऊन बंद होऊ पाहणारा दरवाजा उघडत "निघा लवकर. माझा नवरा घरी नाही. तो आला की या!मग तुम्हास जे सांगायचं ते सांगा. पण माणूस घरी नसतांना इज्जतदार स्त्रीनं परक्या माणसाची बोलणं रितीला धरून नसतं"

"मंजिरी ऐकून तर घे मी काय सांगतोय!"

"निघायचं म्हणतेय ना!"मंजिरी संतापानं कडाडली नी त्याच वेळी तिकडणं अचानक छगन येतांना दिसला. घाबरून साहेब निघाला. घरात मंजिरी पलंगावर पडत रडू लागली.

"मंजा काय झालं गं?"छगननं आत येत विचारलं.

गटलू कोपऱ्यात उभा राहत आई का रडतेय हे भांबावून पाहू लागला.

विचारणाऱ्या छगनला पाहताच ती कडाडली "चरुन आलात!,खाल्लं मटण!तुला आणलं होतं ना मटण?तरी गेलास! का? हे कमी पडलं असतं ना तुला मटण?तू अप्पलपोट्या आहेस!खादाड आहेस!जा चुलीवरचं ही खा!"ती थरथरत कडाडू लागली.

तिचा अवतार पाहून छगन घाबरुन म्हणाला, "तसं नाही गं मंजा, हा गटलू सांगत होता म्हणून गेलो"

"तू इतका खादाड आहेस ना तुला ना बायकोची पडलेली ,ना मुलाची!तू मटणासाठी मेलेला जिवंत होशील" तिचा तोंडपट्टा चालूच होता.

"मेलेला मटणासाठी कसा जिवंत होईल,मंजा!काहीही सांगतेस"छगन आपला तारे तोडतच होता.

"मरून बघ!मेला नी कुठं गावात मटणाचा भंडारा असू दे येशीलच तू !खादाड!"


छगन मंजिरीच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत ओट्यावर आला. जेवायला जातांना आपण घरी टाकून गेलेले बूट त्याला मिळेतचना. त्या जागी त्याला त्याच्यासारखेच दुसरे बूट दिसले. ते नंदन साहेबाचे आहेत हे त्यानं अचुक ओळखलेत. साहेबांचे बूटच त्याने पायात घातले. त्याच्या बधीर गयबान्या मेंदूतल्या नसा ताठरल्या. तो आतून धगधगला. मंजिरी का इतकी संतापलीय हे त्याला कळलं. एव्हाना मावळून अंधारानं खिरणीला गच्च आवळलं. तसंच छगनला ही मेलेला माणूस मटण खायला खरच परत येईल का या विचारानं आवळलं. त्यानं वाकळ घेत गटलूस घेतलं.

"बाहेर जाण्याआधी ते चुलीवरचं मटणं चेंद मुकाट्यानं मग हवं तिथं जा!"मंजिरी रडतच कडकडली.तिचा संताप अजुनही गेला नव्हता.

छगन गटलूस घेऊन निघाला.


मंजिरी जेवलीच नाही. तशीच पडून राहिली. मटण चुलीवर तसच पडून होतं.पडुन पडुन तिला झोप लागली. छगननं गटलूस घेऊन साऱ्या खिरणीस चक्कर मारली. वाकळ देवळाच्या पारावर ठेवल्या व तो रानाच्या वाटेनं निघाला.गजा पाटलाच्या मळ्यात आला.बरीच रात्र झाली होती.थाळण्यात बसुन तो गटलूस खेळवू लागला. गटलू त्याला घरी परतण्यास विनवू लागला.

"गटलू तुझी मंजा मायला दाखवायचं रे आपण,की मरणानंतर माणुस मटण खायला येऊच शकत नाही." गटलू जास्तच आग्रह करू लागल्यावर त्याला आकाशाकडं तोंड करत तो पाठीवर झोपला व गटलूस पायानं उचलत वर खाली करत गुदगुल्या करू लागला.व नंतर फुटबाॅल सारखं उडवत त्यानं एका झोक्यात गटलूस विहीरीत फेकलं.व स्वत: ही नायक साहेबाच्या बुटासहीत विहीरीत उडी घेतली.

पहाटे मंजिरीस जाग आली.उठत अंघोळ करून तिनं मटणाचं सारं पातेलं जसंच्या तसं उकिरड्यात दाबलं. भकभकलं तरी देवळात झोपायला गेलेला छगन गटलू का परतला नाही म्हणून मंजिरी वाट पाहू लागली. आपण रात्री इतकं संतापायला नको होतं. पण आपण त्याच्यासाठी गेलो नाहीत व घरी मटण आणुनही तो गोंधळात गेला याचाच तिला राग आला होता. शिवाय नायकानं घरापर्यंत यावं यानंच ती बिथरली. जर नवरा चांगला असता तर नायकाची काय मजाल की तो घरी आला असता! यानंच ती संतापून छगनला अद्वातद्वा बोलली.


उजाडून दिवस वर चढू लागताच ती छगन व गटलूस देवळात पहायला आली. पण तिथं तिला मिळालेच नाहीत. मग ती बस स्टॅण्ड, दुकान, साऱ्या खिरणीत फिरली. पण गटलू व छगनचा तपासच लागेना. रात्री आपण नको ते बोललो याचा तिला पश्चात्ताप वाटू लागला. तिनं वडिलांना एस टी डी बुथवरून फोन करत बोलवून घेतलं. मंजिरी आली नाही म्हणून घाबरून व बूट बदलवण्यास नायक शिपायासह आला. छगन नाही म्हटल्यावर तो ही घाबरला. त्यानं धीर देत पोलिसांत मिसिंग केस दाखल केली. तो दिवस व रात्र शोधण्यात गेली. दाजीबा आल्यावर ते ही चिंतेत पडले. तिसऱ्या दिवशी सकाळी मळ्यात गेलेल्या माणसाला विहीरीत प्रेतं तरंगताना पाहताच माणसानं खिरणीत येत बोंब ठोकली. सारी खिरणी विहीरीवर पळाली. मंजिरी गटलूसाठी झिंज्या तोडू लागली. ज्याला वाचवण्यासाठी आपण छगनशी लग्नाची तडजोड केली तो गटलूच आपणास सोडून गेला की छगनच घेऊन गेला? यानं तिनं आकांत मांडला...


  (क्रमश:)


Rate this content
Log in