भीती
भीती
दिवसच असे आलेत. सरकारी आदेशानुसार सारेच घरात कोंडून घेऊन बसले होते, बाहेर निघण्याची मनाई होती. घरात असलेलं सगळंच सामान संपायला आलं होतं.
घरात होते नव्हते पैसेही सम्पले होते. हाताला काम नसल्यामुळे पैसे येण्याची शक्यता सम्पलेलीच होती. आता पुढचे कसे होणार याची चिंता लागली होती. तारा त्याच विचारात असताना, बाजूच्या वंदूने तिला हाक दिली ती पण तिला ऐकायलाच आली नाही. वंदूने परत तिला आवाज दिला, तेव्हा ती भानावर आली.
काय झालं ग वंदे , कुठे निघालीस, बाहेर जायला बंदी आहे ना, रस्त्या रस्त्यात पोलीस अडवतात म्हणते ना, तू कुठे निघालीस.
अगं काय करणार, घरातलं सगळंच सम्पलं ग, काय करावं कळेच ना, आज स्वयपाक पण नाही केला ग. चौकात कोणी पुढारी धान्य वाटप करत आहे म्हणते, चालते का जाऊन पाहू, पोरं उपाशीच आहेत गं. वंदू बोलली.
वंदूकडे पण तीच परिस्थिती होती. तसे ताराला थोडा धीर आला. चल जाऊ या म्हणत दोघीही चौकाकडे निघाल्या. चौकात धान्यवाटप सुरू होते पण रांग बरीच मोठी होती, पण पोटाच्या भुकेपुढे त्याचे दोघींनाही काहीच वाटले नाही. उलट आनंदच झाला कारण दोनचार दिवस पुरेल इतकं धान्यवाटप तिथे चालू होतं. दोघीही रांगेत लागल्या आणि मंद गतीने पुढे सरकू लागल्या. जवळपास एक तासाने त्यांचा नंबर लागला आणि आपल्या वाट्याचं धान्य घेऊन त्या आनंदाने घराकडे परत निघाल्या.
डोळ्यापुढे रात्री जेवणाला काय करायचं या विचारात दोघीही चालत होत्या . तेवढ्यात त्या भागातील गुंड मंगु दादा त्यांच्या पुढे उघडा चाकू घेऊन उभा ठाकला . दोघींच्याही काळजात धस्स झाले. आता हा काय करणार या भीतीने दोघीही थरथर कापायला लागल्या. मंगुदादा त्यांच्या हातातील धान्य हिसकावून घेणार हा विचारच दोघींनाही असह्य होत होता. त्यांनी आपल्या हातातील धान्य लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण मंगु दादा च्या ते लक्षात आले आणि त्याने सरळ दोघींच्या हातातील धान्य हिष्कावण्याचा प्रयत्न केला. रस्ता सुनसान होता. जवळपास कुणीच दिसत नव्हते. तेव्हा आरडा ओरड करूनही काहीच उपयोग होणार नव्हता. दोघींनाही त्यांच्या हातातील पिशव्या मंगु च्या स्वाधीन करायचा निर्धार केला. मात्र परत रात्री मुलांना उपवास घडणार या विचाराने त्यांच्या डोळ्यातुन पाणी वाहायला लागले.
आणि त्यांनी देवाचा धावा सुरू केला. आणि खरच आज देवही त्यांच्या मदतीला धावला. नेमकी त्याच वेळी जोराने सायरन वाजवत पोलिसांची गाडी तिथे येऊन धडकली. गाडीचा सायरन ऐकून मंगु ही तिथून सगळं सामान टाकुन पळून गेला.
तसा दोघींच्या मनात धीर आला. पोलिसांची गाडी थांबली. आणि पोलीस बाहेर आले. दोघींनी पोलिसांना सगळी हकीकत सांगीतली तसे पोलीस मंगु दादा ज्या दिशेला पळाला होता तिकडे निघून गेले . आणि तारा वंदू आपल्या घरी पोचल्या.
आता पुढच्या तीन चार दिवसांची चिंता मिटली होती. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
Sanjay R.