अग्निकुंड
अग्निकुंड
रसग्रहण
पुस्तक : अग्निकुंड
लेखिका : डॉ नयनचंद्र सरस्वते
प्रकाशक : कवी चंद्रकांत वानखेडे
काषाय प्रकाशन, पुणे.
प्रस्तावना :
ही गोष्ट एका कुटुंबाची आहे ज्यात मुख्य आईची भुमिका आहे, जिला दोन अपत्ये एक मुलगी (लेखिका) आणि एक मुलगा (मयुर). लेखिका आणि मयुर यांचे परिवारसुद्धा आहेत. दोघांनाही एक एक मुलगी आहे. हे सर्व एकत्र राहतात.
कुटुंबाचा केंद्रबिंदु म्हणजे आई. जिचे दहा वर्षापासून सात ऑपरेशन्स झालेले आहेत. आई अतिशय हट्टी, पथ्य न पाळणारी, कुणाचेही न ऐकणारी आहे.
आईच्या स्वभावगुणामुळेच ती परत एकदा दवाखान्यात भरती होते तिथे जे भावनिक अनुभव लेखिकेने अनुभवले त्याचे प्रामाणिक दर्शन या कांदबरीरुपात आपल्यासमोर ठेवले आहे.
लेखिकेने प्रत्येक दिवसाचा प्रवास म्हणजे दवाखाना ते घर आणि या दरम्यान होणारी मनाची घालमेल वाचकांच्या समोर जशीच्या तशी मांडली आहे त्याबद्दल दाद द्यायला हवी.
१ दिवस
लेखिकेची आई पोटदुखीने बेजार असते. लेखिका आणि तिचा भाऊ (मयुर) हे दोघेही गेल्या दहा वर्षांपासून आईची सेवा करीत असतात. त्यांचे वैयक्तिक आयुष्य जगायला त्यांना वेळच मिळालेला नसतो याची दोघांनाही खंत आहे परंतु तरीही ते आईची सेवा करीत आहेत. उलटपक्षी आई ही अजिबात मुलांचा विचार न करणारी, मुले जर माझे करीत आहेत तर ते त्यांचे कर्तव्यच आहे अशा विचारांची आहे.
उपासासाठी खाल्लेल्या साबुदाण्याने ती पोटदुखीने हैराण होते व मयुरला दवाखान्यात नेण्याबाबत आग्रह करते.
मयुरची नवीनच नोकरी असल्यामुळे रजा घेणे किंवा पैसे असे दोन्ही समस्या आहेत परंतू आई या कारणांना न जुमानता दवाखान्यात नेण्याचा पाढा वाचत असते.
अखेर, लेखिका आणि मयुर हे दोघे तिला दवाखान्यात आणतात.
लेखिका म्हणते की आईने मनोरुग्ण बाबांची मनोभावे सेवा केली म्हणून आम्ही तिची सेवा करायलाच हवी.
इथे दोन्ही मुलांचा सोशिक स्वभाव बघायला मिळतो.
आईने मुलांना शिस्तीत वागविले किंबहूना अपमानास्पद वागणूक दिली तरीही तिने वडिलांना सांभाळले ही गोष्ट त्यांच्या मते फार मोठी होती.
दवाखान्यातील पहिल्या दिवशी दोघे बहिण भाऊ ज्या पद्धतीने सर्व समस्यांना सामेरे जाण्याचे आराखडे आखत होते ते कौतुकास्पद आहे.
जी व्यक्ती आपला शून्य विचार करते तिच्यासाठी मानसिक, शारीरिक, भावनिक लढाई लढणे सोपे नाही.
या सर्व विचारचक्रात पहिला दिवस संपतो.
२ दिवस
रात्रभर मयुर दवाखान्यात थांबला होता, लेखिका सकाळीच दवाखान्यात जाते. गेल्या दहा वर्षांपासून दवाखान्यातील सर्व गोष्टींची सवय झाली होती आँपरेशन करतील आणि चार दिवसांनी आईला रजा देतील. दोघांनाही सगळं पाठ झाले होते परंतु यावेळी जरा वेगळे वाटत होते म्हणून जरा ते घाबरले.
शेवटी डॉक्टर नक्की कुठली उपचारपद्धती आईला सुरु करतील या विचारचक्रात दुसरा दिवस संपला.
३ दिवस
मयुर रात्रभर दवाखान्यात थांबून सकाळी घरी येतो. मयुरची बायको गौरी, मयुर आणि लेखिका हे तिघेही चहा पिण्यासाठी एकत्र बसतात.
एकंदरीत आईची नेहमीप्रमाणे रजा होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले असते. प्रत्येकाने दवाखान्यात राहणे गरजेचे आहे हा ठराव मंजूर होतो.
गौरी ही सासुला घाबरत असते परंतु वेळेचे विभाजन कसे आवश्यक आहे यावर सर्वानुमते छान निर्णय होतो. इथेही लेखिकेच्या समजुतदार स्वभावाचा प्रत्यय येतो.
दवाखान्यात आईने पाणी पिण्यासाठी उच्छाद मांडलेला असतो. कुणाचे ऐकणे आईच्या स्वभावातच नाही हे आईने इथे दाखवून दिले. डॉक्टर नको म्हणत असतानाही ती सर्वांना पाणी मागत असते परंतु, आतापर्यंत ज्या कठोर आईचा आपल्याला राग येत असतो तो काही क्षणासाठी नाहिसा होतो. आणि आईची पाण्यासाठी चाललेली धडपड डोळ्याच्या कडा ओल्या करून जाते.
शारीरिक आणि मानसिक अशक्तपणा देउन तिसरा दिवसही संपला.
४ दिवस
आजपासून सकाळी गौरी, दुपारी लेखिका आणि रात्री मयूर हे दवाखान्यात आईजवळ थांबणार असे ठरले आहे. आई आणि गौरीचा अगदी विरोधाभासी स्वभाव असल्याने गौरीने दवाखान्यात जाण्यासाठी कशीबशी मनाची तयारी केली.
लेखिका सांगते की मयुर आणि गौरीचं नुकतंच लग्न झाल होतं आणि गौरीला नोकरी सोडून फँशन डिझाईन करायचे आहे.
हे ऐकल्यावर सर्व प्रथम लेखिका मयुरवर चिडते की हे तू का सांगत आहेस, ती का सांगत नाही. वाह.... खरोखर एक आधुनिक विचाराची महिला इथे लेखिकेच्या रुपात पाहावयास मिळाली. एवढेच नाही तर जे मनाला पटेल ते करण्यासाठी गौरीला खंबीरपणे साथ देते. इथे लेखिकेने कुठल्याही नात्यापेक्षा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेली खंबीर साथ प्रत्येक स्त्रीला खुप काही शिकवून जाणार आहे.
शेवटी येणाऱ्या अडचणी गौरीलाच दूर करायच्या होत्या परंतु त्यासाठी लागणारी ताकद लेखिकेने तिला दिली होती.
५ दिवस
आज गौरी घरी आणि लेखिकेला दिवसभर दवाखान्यात थांबायचे होते. लेखिका म्हणा की मयुर म्हणा ही भावंडं खरचं प्रामाणिक आहेत कारण या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे हे दोघेही एकमेकांना सांगताना दिसतात आणि दुसऱ्याच क्षणी सर्व शक्ती एकवटून परत कामाला लागतात.
लहानपणापासूनच लेखिकेला आणि मयुरला आईने छळले आहे हे ती सांगते. दया म्हणून नाहीच.पण अशा आईच्या वागण्याने ही दोघेही कणखर बनली, जबाबदार बनली.
दवाखान्यातील इतर लोकांना बघून ,ऐकमेकांना भावनिक आधार देत,आईच्या त्रासाला कसेतरी सहन करीत पाचवा दिवसही संपला.
६ दिवस
आज अचानक लेखिकेला आठवलं की आईला मानसोपचारतज्ज्ञ यांनी झोप येण्यासाठी गोळ्या दिल्या आहेत ज्या तिला दिल्या तर ती जास्त वेळ झोपेल आणि पिण्याच्या पाण्याचा हट्ट करणार नाही. आईला निवांत झोप लागली.
७ दिवस
आज रविवार असल्याने मयुरला सुट्टी होती त्यामुळे समंजसपणे तो दवाखान्यात थांबला. आईकडून ममता न मिळाल्यामुळे मयुर आणि लेखिकेने एकमेकांना भावनिकरित्या सांभाळले असे जाणवते. बालपणीच्या आठणीने लेखिका किंवा मयुर व्यथित होत परंतु ती दोघेच त्या विचार तंद्रितुन बाहेर काढित असत.
८ दिवस
झोपेच्या गोळीने आईला चांगलीच झोप लागली होती परंतु, डॉक्टरांनी आईला उठून बसायला, चालायला सांगितले होते. आई तिच्या स्वभावानुसार अजिबात प्रतिसाद देत नव्हती.
लेखिकेची मानसिक अवस्था फार वाईट झाली कारण रोज पाण्यासारखा पैसा जात होता, शारीरिक थकवा, परिवाराकडे दुर्लक्ष हे तर होतेच. अशावेळी लेखिकेने आपल्या मित्राला चंद्रकांतला बोलावून घेतले ज्याच्या येण्याने लेखिकेला आधार मिळाला.
९ दिवस
आईने दुःखाचे भांडवल केले आहे असे लेखिका म्हणते कारण डॉक्टरांनी तिला काही व्यायाम करायला सांगितले परंतु तेही ती काळजीपूर्वक करीत नव्हती.
१० दिवस
मानसोपचारतज्ञांच्या सल्ल्यामुळे लेखिकेला जरा धीर आला होता. गौरीला हे सगळं नवीन असल्याने तिची लेखिकेला दया येत होती पण पर्याय नव्हता.
दवाखान्यात गेल्यावर एका वीस वर्षाच्या मुलाकडे बघून लेखिकेला आईबद्दल आदर वाटला की तिने मुलांना खंबीर बनविले, मायेने लुळेपांगळे बनवले नव्हते.
आईच्या बाजूला असलेली बाई वारल्याने आई अस्वस्थ झाली ही बाब लेखिकेसाठी आनंदाची होती. स्वतःबद्दल जबाबदारीने वागायचं बोलू लागली.
परंतु दवाखान्यातील जग वेदनादायी आहे तेथील इतर लोकांच्या वेदनेत आपण कधी समरस होत जातो हेच कळत नाही, असा विचार करून लेखिका तिथून निघण्याचाच विचार करीत असते हे ती वारंवार कबूल करते.
मयुरच्या मुलीला ताप असतानाही त्याला दवाखान्यात येणे गरजेचेच होते. मुलगा आणि बापाच्या कर्तव्यात त्याची नेहमीच फजिती होत असेल.
पण आजचा दिवस समाधानकारक होता कारण आईने मुलांशी हितगूज करीत घालविला होता.
आई लवकरात लवकर बरी होणार ह्या सुखद विश्वासावर दहावा दिवस संपला.
११ दिवस
आईही वर्तमानात जगणारी व्यक्ती होती पण लेखिका मात्र स्वतःच्या भुतकाळाच्या वेलीवर जरा वेळ झुलु लागली त्यावेळी तिच्या लक्षात आलं की आईने तिला निर्णयक्षमता, वैचारिक दृष्टीकोन... सारखे चांगले संस्कारही तिच्या नकळत दिले होते हे तिच्या लक्षात आले.
"तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.." असं काहीसं सांगणारी आई आज लेखिकेला ती मोठी झाल्यावर आढळली.
वैचारिक भिन्नतेमुळे आई आणि लेखिकेमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली होती. आई सर्व सुखाचा मनमुराद आनंद लुटत होती तर लेखिकेला साधेपणाने राहणे जास्त रास्त वाटू लागले होते.
बाबांच्या स्वभावाप्रमाणे लेखिकेने तिच्या पुस्तकाचे काम उरकले. लहान वयातच आलेल्या जबाबदारीने लेखिका आणि तिची लेखणी धारदार झाली होती. भरीत भर म्हणजे आईला मोशन आल्यामुळे आयसीयुतून रवानगी होईल व पैसाचा होणारा ताण जरा कमी होईल या विचाराने आजचा दिवस संपला.
१२ दिवस
बाबा जाऊन दोन वर्ष झाले होते त्या दु:खातुन जरा सावरायला लागले तर आईने परत दवाखाना दाखवला अशाप्रकारे लेखिका नैराश्याने व्याकूळ झाली. फॅमिली डॉक्टरने शांत झोप यावी म्हणून गोळ्या दिल्या ज्यांचा छान फायदा झाला व आईलाही दोन तिनदा मोशन आली हे कळल्यावर अधिकच हायसे वाटले.
१३ दिवस
गेल्या बारा दिवसाप्रमाणे तेरावा दिवसही त्याच यातना, नैराश्य, थकवा देऊन गेला.
१४ दिवस
लेखिका दोन दिवस दवाखान्यात जाणार नव्हती. घरी असूनसुद्धा विचाराने ती दवाखान्यातच होती. प्रामाणिकपणे ती सांगते की आता तिच्या पंधरा वर्षाच्या मुलीला तिची आणि चार वर्षाच्या मयुरच्या मुलीला त्याची जास्त गरज आहे परंतु, आईच्या हट्टी स्वभावामुळे ती पथ्य पाळत नाही आणि आजारी पडते. परंतु आता यापुढे आईचे काही चालू द्यायचे नाही असा निर्धार ती मयुरजवळ फोनवर बोलून दाखवते. आईला उद्या घरी सोडतील या विचाराने आनंद वाटला.
१५ दिवस
मयुरने फोनवर सांगितले की आईला आज घरी येता येणार नाही कारण तिच्या आतड्यात लिकेज होते आत्ताच दुखणे हे जीवघेणे ठरते की काय अशी भीती वाटुन लेखिका रडू लागते.
१६ दिवस
आज लेखिकेच्या मनात विचार येत होते की आई मरुन जावी. लेखिकेच्या मनातील हा विचार माझ्या मनाला चटका लावून जातोय. माणसाने व्यवहारी, स्पष्टवक्ते असावे पण इतके.... पुढे लेखिका म्हणते की, गेल्या पंधरा दिवसातील आईला झालेला त्रास आणि पुढे होणारा त्रास त्यात पैशाचा प्रश्नही होताच या सर्व विवंचनेतुन असा वाईट विचार लेखिकेच्या मनात आला असे जाणवते.
आईलाही तिचे भविष्य कळले की काय म्हणून ती तिच्या नातींना भेटण्याची इच्छा दर्शविते. नातींना आजीची अवस्था बघवत नाही. कसंबसं त्या दोघींना घेऊन लेखिका दवाखान्यातून बाहेर पडते.
१७ दिवस
आईच्या धीरगंभीर, कठोर... स्वभावाचं गुपित आता थोडं थोडं लक्षात यायला लागलं होतं. फक्त बाबा गेले तेव्हा एकदाच खचली होती. त्यानंतर तिने मुलांना शिस्तीत वाढविले, मुलांना कणखर बनविण्यासाठी प्रथम ती कणखर बनली. मायेच्या सावलीत ठेवून मुलांना तिला लुळेपांगळे करायचे नव्हते हे आज लेखिकेला स्पष्ट जाणवले. शारीरिक वेदना आज असह्य झाल्यानंतर तिने मुलांना बाहेर जायला सांगितले जेणेकरून त्यांना त्रास सहन करावा लागु नये.
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आईने मुलांच्या नजरेत स्वतःची प्रतिमा वाईट केली. मुलांना तिचा राग येईल इतपत ती त्यांच्याशी कठोर वागत आली. आणि हे फक्त आईच करु शकते हे त्रिकाळ सत्य आहे. आईला तिच्या जाण्याची कदाचित चाहूल लागली होती म्हणून की काय ती मुलांशी तिची जमेल तितकी हितगुज सुरू होती.
लेखिकेला तिची धडपड कळत होती. सकाळी साडे पाचला घरी जाण्यासाठी मयुर जेव्हा लेखिकेला म्हणतो की, कुत्रे नसणाऱ्या रस्त्यावरुन मी तुला घेऊन जातो तेव्हा खरच असे जाणवते की परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते. मयुर लहान असताना लेखिकेला त्याला सांभाळावे लागतं पण आज तो तिला आधार देतो आहे.
१८ दिवस
आज सेमी प्रायव्हेटला आईला शिफ्ट केलं. मामा भेटायला आला. आईचं लहान लहान गोष्टी वर रूसणं फुगणं त्यामुळे माझा संताप, राग, चिडचिड व्हायची. चंद्रकांत या सर्व गोष्टी सांभाळून घ्यायचा. आईचा रूसवा गेल्यावर मी तुला कादंबरीला विषय दिला अशी हसत म्हणते म्हणजे आपल्यामुळे मुलांना काही त्रास नसून आपल्या प्रत्येक गोष्टीचा मुलांना कसा फायदा होतो हेच ती सदा पटवून देत असते.
सुप्रिया जेव्हा सायंकाळी आईला भेटली तेव्हा आईची स्मरणशक्ती छान आहे अशी म्हणाली. यावरून आई लवकर बरी होईल असे लेखिकेला वाटून गेले.
१९ दिवस
आईच्या सद्यपरिस्थीतीशी संबंधित लेखिकेने केलेले चिंतन काव्यरुपात मांडले आहे.
२० दिवस
आज सकाळीच चहा पिताना मयुर, नवरा आणि लेखिकेत आईच्या दवाखान्यात असल्याच्या सर्व गोष्टीवर चर्चा झाली ज्यात नेहमी प्रमाणे लेखिकेने स्पष्टपणे सांगितले की आई जर गेली तर त्यातच सर्व काही ठिक होणार आहे त्यावर मयुर नाराज झाला. लेखिका व तिचे मन या दोघात मग विचाराचे द्वंद्व चालायचे.
गौरी आणि मयुरमध्ये आईच्या दवाखान्यात असल्याच्या खर्चावरून भांडण झाले असते तेव्हा लेखिका दोघांनाही उदाहरण देऊन समजावून सांगते.
आज दवाखान्यात गेल्या गेल्या लक्षात आले की आईला ताप होता. त्यानंतर जी धावपळ उडाली साक्षात यमदेवता आज अवतरतेय की काय असे वाटुन गेले. मयुरला लगोलग बोलावून घेतले. थोड्या वेळाने आईचा ताप कमी झाला.
२१ दिवस
आईच्या तब्येतीचा अंदाज घेऊन मयुरने आठ दिवसाची रजा घेतली होती. आईचं जे काही व्हायचं आहे ते माझ्या समोर व्हावे अशी मयुरची माफक इच्छा होती.
लेखिकेनेही हातातील पुस्तकाचे काम पुर्ण करून मोकळे व्हावे असे ठरवले. मयुरने फोनवर लेखिकेला सांगितले की गेले ४८ तास आई झोपली नाही. मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे ठरले.
आईला झोपेची गोळी दिली होती तरीही ती अस्वस्थ होती. तिला कळुन चुकले होते की आता तिची सुटका नाही.
मायलेकीत पहिल्यांदा प्रेमाचा संवाद झाला. हळूवार लहाणपणी सुद्धा आई रात्रीला प्रेमाने पांघरूण निट करणे, चेहऱ्यावर हात फिरवणे करीत असे आठवले. आईच्या प्रेमाची परिभाषाच निराळी होती हेच खरे.
जवळच्या नातेवाईकांपेक्षा दुरचे, प्रेमाची माणसं जवळची वाटू लागतात असेच काका काकू आईला भेटुन गेलेत.
रात्रीला गौरी आणि मयुरने दवाखान्यात थांबावे असे ठरले .
२२ दिवस
अजूनही आई निवांत झोपली होती. आज सायंकाळी मायाआत्या आणि सुप्रिया दवाखान्यात येणार होत्या. दवाखान्यातील डॉक्टर, नर्सेस... सर्व जणांना आईचा स्वभाव ओळखीचा झाला होता त्याची पावती मुलांना मिळत होती.
आईला सोडून लेखिका, मयुर, सुप्रिया ...चहा प्यायला बाहेर पडले. हीच परीस्थिती पिसे काकूच्या वेळी होती. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना आम्ही समजु शकलो नाही.
आईच्या या अनुभवातुन जीवनातील सुख तत्त्वज्ञान शिकायला मिळाले होते.
२३ दिवस
रोजच्या सारखाच हा ही दिवस गेला.
२४ दिवस
रात्रीला मयुरने लेखिकेला फोनद्वारे कळविले की आईला व्हेंटिलेटर लावणार आहे. तिच्या रक्तातील आँक्सिजन कमी झाला आहे. हे ऐकताच लेखिका दवाखान्यात पोहचली.
मयुर आणि लेखिका हे हतबल होऊन आईकडे बघत राहिले त्याशिवाय अजून काही करणे त्यांना शक्यही नव्हते.
२५ दिवस
आज जेव्हा मनाला आईचं जाणं नक्की वाटत होतं तेव्हा लेखिका तिच्यात आणि आईत साम्य शोधत होती. एरवी आयुष्यात लेखिकेला दोघीत कायम विरोधाभास जाणवला.
आई गहन शांततेत होती. मयुर आणि लेखिकेने आजच मनमुराद रडून घेतलं कारण आई जेव्हा जाणार तेव्हा त्यांना रडायला वेळ मिळणार नव्हता.
मयुरने सर्व नातलगांना फोनवरून आईबद्दल कळविले. सर्व भेटी देऊन गेले.
२६ दिवस
आज लेखिका धाडसी निर्णय घेते की आईचे पुढील उपचार थांबवावे कारण उपचाराअंतीसुद्धा निराशाच हाती येणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मयुरला निर्णय घ्यायला वेळ हवा असतो.
रात्री मयुरने लेखिकेला फोन लावला व आपला निर्णय सांगितला. तो म्हणाला तुझ्या निर्णयाशी मी सहमत आहे कारण आपल्या लोभासाठी आईच्या देहाचे हाल नको.
२७ दिवस
आईचा व्हेंटिलेटर काढला. कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त दोन दिवस आई जगणार होती.
लेखिका, मयुर, चंद्रकांत व सुप्रिया या चौघांनी तिचे सर्व पार पाडावे अशी आईची इच्छा होती.
सुप्रिया दुपारी दवाखान्यात भेटुन घरी आली व थोड्याच वेळात मयुरचा फोन आला की आई गेली. अशा प्रकारे २७ दिवसाचा आईचा जीवनाचा अंतिम प्रवास संपला होता.
लेखिका म्हणते त्याप्रमाणे त्या माऊलीने जो वसा घेतला होता तो पूर्ण केला. लेखिकेने आईला अग्निकुंड म्हटले आहे ते अचूक आहे कारण तिच्या वाट्याला आलेले जीवन हे आगीशी खेळण्यासारखेच होते ज्यात तिच्या मुलांना चटके बसणार होते. आई जाताच सर्व शांत होणार होते, मुलांचे जीवन तिच्या भोवतीच फिरत होते जे आता बदलणार होते.
शेवटी हे मात्र सांगावसे वाटतेय की याच अग्निकुंडामुळे, तिच्या संस्कारामुळे तिची मुले सक्षमपणे निर्णय घेऊ शकले.