आठवणी...
आठवणी...
"आज्जी आज्जी "चा नारा लावत इवलीशी ईशा कशीबशी धडपडत आज्जी ची साडी छोट्याश्या हातात घेऊन हॉल मधे आली. ईशा म्हणजे ताईंच्या मोठ्या मुलाची मुलगी. त्यांची नात. शिलाताईंना तिची धडपड पाहून खुप हसू आलं आणि खुप कौतुकही वाटल. म्हणाल्या "काय गं बाळ, काय हे? ".. ईशा लगेच "आज्जी... मला घालून दे ना गं तुझ्याच सारखी साडी ".शिलाताईंनी लगेच साडी हातात घेऊन तिला छान साडी घालून दिली आणि ईशा मग साडी घालून मिरवण्यात, खेळण्यात व्यस्त झाली.
शिलाताईंच्या डोळे मात्र अश्रूंनी डबडबले होते. पुसट पुसट सगळ्या आठवणी त्यांच्या डोळ्यांपुढे गर्दी करू लागल्या आणि त्या आठवणींत रमल्या. त्यांची इवलीशी मुलगी मीरा. हट्टी, सदैव हसरी, बडबडी, घरात दोन भावांत एक मोठी बहीण, वडिलांची अत्यंत लाडकी, आईची परी आणि सर्वांची लाडकी अशी मीरा. तिचा प्रत्येक हट्ट वडिलांनी पुरवला होता. लहानपणी पासूनच नृत्य कलेची आवड असल्याने शिकवणीलाही उत्साहाने जायची. कायम आईच्या मागे मागे असायची. नटण्याचा ही भारी नाद तिला. शिलाताईंची साडी घालून लहानपणी मिरवणारी मीरा हळू हळू मोठी झाली. अनेक गायनाच्या, नृत्याच्या, अभिनयाच्या स्पर्धेत कायम शाळेत अव्वल असल्यामुळे घरी खुप कौतुक होतं तिचं . वडील गावाचे सरपंच म्हणून घराण्याचा तसाही मान मोठाच होता. मीरा कॉलेज मधे शिकू लागली . गावात एकच कॉलेज होत. त्यावेळी ती नुकतीच ग्रॅज्युएट झाली आणि तिच्या साठी स्थळ शोधण्याचं काम सुरु झालं. शिलाताई आणि अरविंद राव डोळ्यात तेल टाकून सुयोग्य स्थळ शोधू लागले. शहरात एक योग्य घराण्यातील मुलगा त्यांना आवडला . चांगली नोकरी, उत्तम पगार, सासूसासरे अगदी खुल्या विचारांचे.मीराला विचारून होकार करून लग्नाची तयारी सुरु झाली. अरविंद रावांनी दूरवरून सर्व
नातेवाईकांना निमंत्रण दिली. पहिलंच मंगल कार्य घरी असल्यामुळे खुप हौस होती. शिलाताईंनी तर कुठलीच कसर न ठेवून दागिने, कपडे, साड्या अगदी उत्तमोत्तम घेतल्या सगळं अगदी मीरा हौसनं, आनंदानं करत होती. लग्नाला तर अरविंद रावांकडे संपूर्ण गावच्याच पंगतीत उठल्या. केवढा तो थाट. या आधी इतकामोठा लग्नसमारंभ गावात झालाच नव्हता. लग्न झालं. मीरा आनंदानं सासरी गेली. तिथेही तिला सर्व गोष्टींची मुभा होती. कुठेही कसलीही रोकटोक नव्हती. नवरा एकही शब्द खाली पडू देत नव्हता. तिच्या सासरी तिच्या कलेचं खुप कौतुक होत. लग्नाच्या दोन वर्षांनी एक गोड चिमुकली झाली 'सई '.खुप आनंदाने तिचं नामकरण झालं. मीराच्या सासरी सई खुप खुप लाडाची पहिली नात, वडिलांची प्राणप्रिय मुलगी.
अचानक एक दिवस मीरा कोणत्यातरी कारणाने बाहेर गेली, त्या आधी तिनं सईला जवळ घेऊन कुर्वाळलं. खुप तास मीरा घरी आलीच नाही. शोधाशोध सुरु झाली.सासरी तिच्या कपाटात एक पत्र मिळालं. ती तिच्या प्रियकरा बरोबर कायमची निघून गेली होती. पोलीस, कोर्ट, केस खुप काही घडलं. अरविंदरावांनी कोर्टात मीराला तिच्या प्रियकरा सोबत पाहून त्याक्षणी तिच्याशी सर्व नाते तोडले ते कायमचेच.
शिलाताईंना सावरण्यास एक दीड वर्ष गेलं.
आज सई छान सतरा वर्ष्यांची झालीय. मीरा नसली तरी तिच्या सासरच्यांनी सई ला मोठं केलं आणि अरविंदराव आणि शिलाताईंशी असलेलं तिचं नातं खुप नाजूकतेनं जपलं. मुख्य म्हणजे सई च आजोळ मात्र प्रियच राहील.
शिलाताई साडीच्या पदराने डोळे पुसतच होत्या तितक्यात साडी आवरत ईशा धावत आली "आज्जी आज्जी, हे घे सई ताई चा फोन आलाय..."मीरा नाहीए, पण सई ने जपलेला मायेचा ओलावा हा त्या कठीण आठवणींना हावी होऊ देत नाही एवढंच...
आता उरल्या त्या फक्त आठवणी...