आईस पत्र
आईस पत्र
*मातृदिना निमित्त आईस पत्र*
तिर्थरुप प्राणप्रिय आईस तुझ्या एकूलत्या एक लाडक्या सुवर्णाचा सा.दंडवत.
पत्रात कारण की,तुला रोजतर मी फोनवर बोलतेच ग. आयुष्यातील त्या अबोल घटना,प्रसंग,कधी मी बोललेच नाही तुला ते आज या पत्रात व्यक्त करते."स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"हे म्हणतात ते खोटं नाही. ज्याला आईचे प्रेम मिळालं तोच खरा सुखी.आई मी मुलगी म्हणून वडीलांनी माझा सतत तिरस्कार केला.कारण त्यांना फक्त मुलाविषयीच प्रेम होते.पण तू खूश होती मला तळहाताच्या फोडाप्रमानं जपलस ग तू आणि अजूनही काळजी घेतेस माझी.आई एका बागायतदाराची लेक तू पण सासरी आलेल्यागरिब परिस्थिती शी सामना करायला तू बाहेर पडलीस.लोकांच्या घरी धुणी,भांडी केलीस. दवाखान्यात सफाई कामगार म्हणून काम करत राहिली. तू म्हणायची कामाची लाज नाही वाटून घ्यायची कधी आणि प्रामाणिक कष्ट करायचं.कष्टाने माणूस मरत नाही. आणि मला तुझा कायम अभिमान वाटतो ग.तू शाळा नाही शिकली म्हणून तुला हे दिवस आले माझ्या नशिबी ते येऊ नयो म्हणून किती त्रास सोसला तू.वडिलांचा मार माझ्या साठी खाल्ला तू .पण शिक्षण बंद नाही केले माझे.घरात पाच माणसे.दोन्ही लहान भाऊ चौथीतूनच पोटासाठी मजूरीत शिरले.घरात एक वेळ जेवन पण तू नाही ग मला कधी पोटभर खातान दिसली .मला आठवतं रात्रीचंझोपताना तू मातीच्या माठातील पाणी तांब्याभरून घटघटा प्यायची आणि ढेकर द्यायची.मी विचारले आई तू नाही खाल्ले काही. तर म्हणायचीस मी खाऊन आले ग कामावरच.किती खोटं बोलायचीतू.कारण छोटा सा घास पण पाखरा सारखा कागदात तू तुझ्या पिल्लांना आणायचीस.आई हे सगळं मला आता आठवतं ग. माझ्या आईणी ती ढेकर फक्त माठातील पाण्याची होती ग.त्या वेळी हे समजण्याची बुध्दी नव्हती मला.माझ्या शाळेतले दाखले आणायला तू रोज दुपारी कामावरून आली की ऐन उन्हात उपाशी पोटी आणि अनवानी पायाने आठ किलोमिटर जायची.कारण बसला पैसे नव्हते.आणि चप्पल तर तुझ्या पायाला कधी मिळालीच नाही. त्या उन्हात तुझ्या पायांना बसलेले ते डांबरीवरचे चटके आता माझ्या काळजाला बसतेत ग आई.कचेरीतले लोकं तुला हेलपाटे मारायला लावायचे.तू जायची कारण लवकर काम करून घ्यायला तुझ्या कडे त्यांना देण्यासाठी पैसे नसायचे म्हणून. आई मी बारावीझाले.आणि डीएडचे फॉर्म सुटले.मला आठवतो तो दिवस.भवानीमंडपात खूप मोठी रांग होती ग फॉर्म साठी दिवस तू उन्हात उपाशी घालवला सगळा.आज मी जे काही आहे ते तुझ्या मुळच आहे .आई माझ्या शिक्षणासाठी किती ग दिवस रात्र उपाशी काढलेस तू.पण शिक्षण नाही बंद केलेस माझे.आई तू मला रागवलेलं,मारलेलं कधी आठवत नाही खूप लाडकी लेक मी तुझी.किती ग प्रेम करतेस माझ्या वर.आजही दूर असलीतरी माझ्या आवाजावरून कळतं तुला मी टेंशन मध्ये आहे.आणि लगेच विचारतेस तू मला तू बरी आहेस ना.आई त्या वेळी मी फोन कट करते कारण रडू नाही आवरत ग मला.आई मी आज शिकले तुझं स्वप्न पूर्ण झाले. मी खूप सुखात आहे ग.पण माझी आई अजून कष्ट करते हे नाही ग मला सहन होत.तू का नाही ऐकत माझं माझ्या कडे रहायला नाही येत तू.आई मला तूला पोटभर जेवू घालायचंय ग,फाटक्या साड्यात आयुष्य गेलेल्या माझ्या आईला छान साड्यात बघायचं मला.आई तुझं कष्ट बघून माझं मन पिळवटून निघतय कसं नाही कळत तुला हे .पाहुण्यांच्या दारात नको असले हे सोड जुने विचार तुझे . मला तुझी सेवा करायची संधी देत नाही तूआई .माझ्या इतकी दुर्देवी लेक जगात मीच एकटी असेल. आई मी वाट पहाते ग तुझी.... ये लवकर तू कायमची माझ्या कडे.
