4 चा चहा
4 चा चहा


आज तर मिथिलाने 4 चा चहा एकटीनेच घेतला. कारण सध्या तिच्या सोबत चहा, नाश्ता करायला हल्ली कुणालाच वेळ नसतो. एरवी बाबा असायचे. म्हणून तिला एकटे कधीच वाटले नाही. आणि विशेष म्हणजे 4 चा चहा करायचा ही कधी कंटाळा आला नाही. पण आता मात्र एकटी साठी चहा करून घेणे हे वाक्य सुध्दा नकोसे वाटत होते.
बाबांना जाऊन आज तब्बल 13 महिने होत आले. पण काही केल्या आठवण जात नव्हती.
नेहमी 4 वाजले की बाबा मिथिला ला आवाज देत, मिथिला 4 वाजलेत चल छान गलेरीत बसून आपण चहा घेऊ. आणि हो आलं घालायला विसरू नकोस बरं.....
हो बाबा तुम्ही बसा मी आलेच चहा घेऊन..
मिथिला चहा घेऊन जाते तोवर बाबा छान पैकी दोन खुर्च्या घेऊन तिथे ठेवत असत. एक स्वतः ची आणि दुसरी मिथिला साठी.
ना त्यांनी कधी सुनेला कमी लेखलं ना मिथिला ने कधी बाबांना धिरकवले... छान मैत्रीचे नाते होते सासरा सुनेचे....
एक दिवस असाच चहा घेत ती आणि बाबा बसले होते. निवांत. अचानक तिला त्यांनी विचारले, मिथिला अग तू स्वतः ला कामात व्यस्त का नाही करून घेत. हे सर्व रोजचेच आहे. व्यस्त राहशील तर तुला कंटाळा ही येणार नाही, शिवाय 4 पैसे तुझ्या हातात राहतील.
पण बाबा आता कसे शक्य आहे, अनुराग अजून खूप लहान आहे त्याला माझी सध्या गरज आहे....
बघ बेटा.... अनुराग ला आज तुझी गरज आहे हे मान्य. पण जेव्हा तुला अनुराग ची गरज असेल तेव्हा तो देईल का तुला वेळ....,?
बाबांच्या या प्रश्नाने मिथिला थोडी विचारातच पडली....
पण मग काय करणार बाबा मी...?
अग मी आहेच की घरी... तू ही तुझे स्वतः चे करीयर बघ... जास्त मोठे किंवा खूपच मग्न रहा असे नाही म्हणत मी, पण निदान रिकामपण हातात नको एवढेच माझे म्हणणे.
मिथिला लाही ते पटले होते. तिने घरच्या घरी एक छोटासा व्यवसाय पण सुरू केला, त्यात तिला यश मिळत गेले तसा बाबांना आनंद झाला. आता तर पूर्ण घर बाबांच्या भरवश्यावर होते. चक्क मिथिला ला वस्तू विसरायला झाल्या.
जेवणाची वेळ झाली की खुशाल बाबा तिला हाक देऊन बोलावत आणि ही पण आपली आले बाबा म्हणून मस्त डायरेक्ट जेवायला बसत. अनुराग ची पण चिंता नव्हती कारण तो आता आजोबांच्या अंगावरचा झाला होता. त्यामुळे आता व्यवसायाकडे लक्ष द्यायला मिथिला कडे भरपूर वेळ होता.... सर्व मस्त चालले होते.
नवरा, सासरे , मुलगा आणि मिथिला छान चौकोनी कुटुंब.
पण एक दिवस अचानक काळाने घाला घातला आणि बाबांना या सर्वांना सोडून जावे लागले. मिथिला ने आपल्या परीने बरेच प्रयत्न केले. पण कदाचित वेळ निश्चित झालेली असावी. काही केल्या बाबांची प्रकृती साथ देत नव्हती. आणि जे व्हायला नको होते तेच झाले.
आणि आज तब्बल 13 महिने होऊनही त्यांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नव्हता.
आता खऱ्या अर्थाने मिथिला एकटी पडली होती. आता तिच्यासाठी घरात कुणा कडेच वेळ नव्हता. पार्थ म्हणजे तिच्या नवऱ्याला तर तेव्हाही नव्हता आणि आजही नाही. राहिला अनुराग चा प्रश्न तर तो आता मोठा झाला होता, शाळा, क्लास यातच तो इतका गुंग होता की आई ची गरज त्याला फक्त कामापुरता होती. जो तो आपल्या विश्वात मग्न होता. व्यवसाय तर आता जेमतेम चालला होता. कारण घरातील पूर्ण वेळ काम करून वेळ उरला तर व्यवसाय असा हट्ट पार्थ चा होता.
4 चा चहा आता नकोसा वाटायला लागला होता. एकटेपणा खायला उठला होता. म्हातारी माणसं घरात काय पेरून ठेवतात हे ते गेल्यानंतरच कळते. काहींना ही म्हातारी माणसे घरात नको असतात किंवा त्यांची त्यांना अडचण होऊ लागते. पण अडचणीच्या वेळी ह्यांची च मदत होते हे कळत नाही. आपणही कधीतरी म्हातारे होऊ हे का मान्य करीत नाही... असो.
पण मिथिलाचे तसे नव्हते. तिचे आणि सासऱ्यांचे छान मैत्रीचे नाते होते. कदाचित म्हणून ते गेल्याचे दुःख पार्थ पेक्षा मिथिला ला जास्त झाले असावे.
आलेला माणूस एक न एक दिवस जाणार हे निश्चित असते. पण तरीही आपले मन हे मान्य करायला तयारच नसते.
मिथिलाच्या बाबतीत नेमके तेच झाले. तिला बाबांची आता खरी गरज होती. खूप बोलायचे होते, खूप काही शेअर करायचे होते पण ऐकायला बाबा नव्हते. विशेष म्हणजे 4 चहात साखर कमी की जास्त याची तक्रार करायला देखील कुणी नव्हते.
नकळत अश्रू तिच्या गालावर ओघळले. आणि तितक्यात दारावरची बेल वाजली तशी मिथिला सावरली. पार्थ आणि अनुराग दोघेही सोबतच घरी आले. तिने लगेच पदर खोचला आणि कामाला लागली.
तेवढ्यात पार्थने आवाज दिला, मिथिला चहा घेऊन ये सर्वांसाठी आज आपण सर्व जण छान गॅलरीत बसून चहा घेऊ. क्षणभर का होईना पुन्हा बाबांची आठवण येऊन अश्रूंना वाट मिळाली.....