STORYMIRROR

Kajal Pawale

Others

4  

Kajal Pawale

Others

तुझ्या मिठीत

तुझ्या मिठीत

1 min
473

बाप तुझा मी, मला ओळखशील ना गं 

परी, मला मिठीत घेशील ना गं?

काय नाते असे तुझे माझे

कसे सांगू शब्दांत पण तू माझ्याशी बोलशील ना गं 

राणी, मला मिठीत घेशील ना गं?


तुझ्या अस्तित्वाचं कारण फक्त मी, पण माझं संपूर्ण अस्तित्वच तू

देशप्रेम जरी हृदयात असले तरी हृदयाचा तुकडा माझ्या तू 

समोर येताच तुझ्या हास्याने हे हृदय भिजवशील ना गं 

सोनू, मला मिठीत घेशील ना गं?


तुझ्या आईच्या कुशीत सुरक्षित तू अन् माझ्या आईच्या सुरक्षेसाठी सीमेवर मी 

तुला ज्या जगात आणायचंय त्याचं रक्षण मला करायचंय हे तू समजशील ना गं 

पिल्लू, मला मिठीत घेशील ना गं?


तुझं हसणं, खेळणं-बागडणं कॅमेरातच बघितले 

ते सारे क्षण पाहून माझे डोळे पाझरले 

मला भेटताच क्षण ते पुन्हा जिवंत करशील ना गं 

छकु, मला मिठीत घेशील ना गं?


तुझ्यापासून दूर माझं काळीजच तुटतं 

जीव तुझ्यापाशी अन् शरीर फक्त इथे असतं 

तुला भेटण्याची आस मनातच राहते 

डोळ्यात तू अन् नजर कॅलेंडरवर जाते

मला भेटण्याची वाट अशी तू बघशील ना गं 

बच्चा, मला मिठीत घेशील ना गं?


आधी मला प्रतिपक्षात फक्त रावण दिसायचा

त्याचा खात्मा हेच लक्ष असायचा 

पण आता तुझ्यासारखा गुलाब त्याच्याही अंगणी असेल असे वाटते 

माझं अंगण असंच सुगंधी करत राहशील ना गं 

माझ्या फुला, मला मिठीत घेशील ना गं?


Rate this content
Log in