तुझं जाणं
तुझं जाणं


रात्री तू रुसून झोपलास आणि मी ही मनवलं नाही
दुसऱ्या दिवशीची पहाट तू मात्र पाहीलीच नाहीस
तू गेलास हे स्वीकारायला मन धजावत नव्हतं
तुला शांत पडलेलं पाहताना ते आतून हादरलं होतं
मित्र ते नवरा हा तुझा प्रवास मी पाहिला होता
तू मात्र मला भयाण एकटेपणा देऊन गेला होता
तुझ्या जाण्याने मी एक रिकामेपण अनुभवलं होतं
कळत नव्हतं मला नक्की माझं कुठे चुकलं होतं
बरंच राहिलं सांगायचं अन् बोलायचं तुझ्याशी
सांग ह्या आयुष्याची लढाई आता मी कशी झुंजायची
माझ्या सोबत कोसळत होतं हे घर अंगण सारं काही
उरल होतं फक्त शरीर, मन रेंगाळत होतं तुझ्या पायी
त्या भाबड्या मनाला सांगायचं होतं एकदा तुला
काल मी मनवल असतं तर कदाचित गमावलं नसतं तुला
आयुष्य उध्वस्त कसं होतं हे त्या दिवशी उमगलं
प्रत्येक क्षण किती अमूल्य आहे हे तुझ्या जाण्याने समजलं
पोकळी तुझी खोल आहे कधी न भरणारी
आता फक्त वादळ वारे सगळं लुटून नेणारी...