स्वप्नातली माणुसकी
स्वप्नातली माणुसकी


काल अचानक निद्रेमध्ये, स्वप्न अनोखे पडले.
स्वर्गानेही खाली झुकावे, असे काहीसे घडले.
स्वप्नातले ते जग नवखे होते मला.
मन तृप्त झाले पाहून,माणसातल्या त्या देवाला.
अडवणारे हात मदतीसाठी पुढे आले.
रुसणारे चेहरे हास्यात मिसळून गेले.
ओलावा येईल पण-
काही मोजक्या थेंबांनी तळे जसे भरत नाही.
तिमिर नाहीसा नक्कीच करेल पण-
एका ताऱ्याला सारे आकाश सजवायला कधी जमत नाही.
पुसून टाकते जे दुःखाला, एकजूटीमध्ये दडलेले सुख.
द्वेष,गर्व, अहंकार नव्हता, चेहरे दिसले हसतमुख.
भावाभावांतील वैर संपून, वाहत होता प्रेमाचा झरा.
शोधला मी, माणुसकीत दडलेला सुखाचा मार्ग खरा.
माणसांना जोडून ठेवायची, माणसाकडेच असते कला.
सर्वांना समान वागवा अन् दूर करा स्वार्थाला.
दुसऱ्यांच्या आनंदात सामील व्हावे, गरीबांना करावे दान.
माणसातल्या देवाला पाहून
हरपून गेले माझे भान.
माणसांसोबत पशूप्राण्यांवर दाखवावी थोडी दया.
सारे मतभेद संपून आता , ओसांडून वहावी माया.
हवेहवेसे वाटणारे जग पाहून, ओढ लागे एकसारखी.
कधी सत्यात उतरेल का
माझ्या स्वप्नातली माणुसकी ?