"सुखी माणसाचा सदरा"
"सुखी माणसाचा सदरा"
मुलं होत नाहीत म्हणून
उदास असतात काहीजण
कशाला मुलं इतकी म्हणून
देतात काही देवाला दुषण… १..
पैसा नाही, पोटाला काय
एकाला पडलेली याची भ्रांत
इन्कमटॅक्स चुकवावा कसा
विचाराने या कोणी अशांत.… २…
हुशार नाहीत मुलं म्हणून
कोणाला भविष्याची चिंता
स्कॉलर मुलगा परदेशी स्थायिक
म्हणून भोगत कोणी एकांता…३..
लग्न होईना म्हणून मनोमनी
कोणी एक होतसे खिन्न
भांडखोर पत्नी पडली गळ्यात
म्हणून दूसरा होऊन जाई खिन्न. .४..
कोणी विचारत नाही म्हणून
एकाला सक्तिचा एकांत
जमावापासून बचावण्यासाठी
नेते,अभिनेते होऊन जाती श्रांत.. ५..
जग अवघं उत्सुक सदरा
सुखी माणसाचा शोधायला
सुखी माणूस मात्र म्हणाला
मला सदराच नाही घालायला.. ..६..
“सदराच नाही तर सुखी कसा?
लोकांनी विचारलं त्याला
म्हणाला तो, “निजानंदी रंगण्याला
सदराच हवाय हो कशाला ? “.. ७..
