"सारं काही स्वत:साठी"
"सारं काही स्वत:साठी"
देवधर्म पूजाअर्चा
सारं असतं स्वतःसाठी
देवाला यातलं काही
नको असतं स्वतःसाठी
फूलं अर्पण करतो देवाला
ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून?
सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा
त्याला काय करायचंय फुलं घेऊन?
नैवेद्य जो आपण दाखवतो
तो काय देव खातो?
तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं
भरणपोषण करित असतो
निरांजनाच्या इवल्या ज्योतीने
ओवाळतो आपण प्रभूला
चंद्रसूर्य जातीने
हजर ज्याच्या दिमतीला
स्तोत्रं त्याची गातो ती काय
हपापलाय म्हणून स्तूतीला?
निर्गुण निराकार जो
त्याला अवडंबर हवंय कशाला?
सारं काही जे करायचं
ते स्वतःसाठीच असतं करायचं
प्रार्थनेनं देव बदलत नसतो
स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं
आजकाल प्रत्येक गोष्टीचं अवडंबर माजवले जातंय. मला या कवितेतून हे सांगायचे आहे की ,जे काही कराल ते पूर्ण भाव ठेवून करा.म्हणजे आपण जे करु त्यानं आपण समाधानी होऊ. देवाला देवून उपकार केल्याची भावना नको.
