स्त्रीपुष्पाची व्यथा
स्त्रीपुष्पाची व्यथा


आज सांगते तुज आई
त्रास असह्य मज होई,
जेव्हा उकीरड्यावरी
मज फेकून तू जाई
होते तुजवर संकट भारी
हे असेल जरी खरे,
'पोटचा गोळा' फेकणे
हा पर्याय नाही बरे
कशी सांगू आई तुजला?
माझ्या जगण्याची तऱ्हा,
कुत्र्याच्या हिसक्यापेक्षा
जीव गेलेला तो बरा
पडते नजर मग कोणाची
कुत्र्याच्या त्या हल्ल्यावर,
येती मला वाचवाया
सोबत घेऊन वार्ताहर
होती बाया माणसं गोळा
पोलिसांच्या सुरु धावा,
पाणी येई कोण्या डोळा
जीव पाहुनी कोवळा
आई, सर्वांची चालू तोंडे
तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे,
म्हणे, "किती निर्दयी मायबाप!
कुठे फेडतील हे पाप?"
मिळे बालिकाश्रमात प्रवेश
भुकेमुळे मी बेहोश,
हाल पाहुनी आई माझे
उडाले डॉक्टरांचेही होश
सदा भासे मज आई
तू जवळ मज घेई,
प्रत्येक स्त्रीमध्ये आई
मी तुझा शोध घेई
झाले मोठी जरी आज
तुझी कमी हृदयात तशीच,
पोटाची भूक भागली गं
तुझ्या मायेची भूक तशीच
कधी बसता एकांतात
काहूर माजतो मनात,
तुझ्या निर्दयतेचा आई
राग येई मज अमाप
माझा जन्म सार्थ करण्या
आज मी 'नवा वसा' घेई
माझ्यासारख्या बालकांची
जगेन बनून 'मी आई'