सरीवर सरी आला पाऊस
सरीवर सरी आला पाऊस
सरीवर सरी आला पाऊस ll धृ ll
निळे मेघ बरसती, मोत्यांच्या धारा
सोनपिवळ्या रानी, सळसळे गंधित वारा l
ऊन तापल्या धरतीने बदललेली कुस
सरीवर सरी आला पाऊस ll धृ ll
भिजले तन-मन, भिजले हिरवे क्षण
भिजले कणकण, आनंदले पक्षीगण l
चल कारभारणी पावसात भिजू, नको छत्री घेऊस l
सरीवर सरी आला पाऊस ll धृ ll
बीज अंकुरे धरतीच्या पोटात,
फुटले हसू बळीराजाच्या ओठात l
तुरा काढुनी डोलतो बघ कसा ऊस
सरीवर सरी आला पाऊस ll धृ ll
मोहरली काया, आभाळाची माया
दीप गंगेला वाहती, सुहासिनी सया l
लाल, पिवळ्या फुलांनी बहरला बघ कापूस
सरीवर सरी आला पाऊस ll धृ ll
फुलवी मोर पाचूचा निळा पिसारा
भरी मातीच्या गंधाने सृष्टीचा गाभारा l
आला नदीला पूर,
कारभारणी नको एकटी जाऊस
सरीवर सरी आला पाऊस ll धृ ll
क्षितिजावरी इंद्रधनु करी सप्तरंगाची उधळण
वर्षाराणीच्या पायी छुमछुमते बिजलीचे पैंजण l
फणा काढुनी वारूळी नागिन करते फुसफुस
सरीवर सरी आला पाऊस ll धृ ll