शब्दझुले
शब्दझुले
1 min
193
चल सख्या
पावसात जाऊ
श्रावण घेऊ
अंगावर
ओवाळून टाकू
धुके
हिरव्या सोनेरी
रंगावर
चल जरा
बघू भिजून
निजून ढगाच्या गादीवर
बांधू चल
थोडे उंच झुले
आभाळाच्या माडीवर
हात देऊन
सरीच्या हाती
फिरून येवू रानी-वनी
पाचूच्या त्या
हलक्या पालख्या
वाहून नेतील सहा जणी
आला आला श्रावण
म्हणून
वाऱ्याने केला अंगार जणू
तप्त धरेने
वसुंधरेने
केला सोळा शृंगार जणु
पोरीबाळी झाल्या गोळा
झिम्मा फुगडी
मंगळागौर
पाहून सोहळे
मातीचे कोवळे
भरून आले काळे उर
नदीच्या काठा,
ओल्या वाटा
ओलीचिंब सांज खुले
मी आहे तसा बंद घरात
बांधत बसलो
शब्दझुले
