शब्द
शब्द
आज म्हणे कुणीतरी,
शब्दांची चोरी केली होती
स्वर आणि व्यंजनांसकट
जोडाक्षरेही पळवली होती.
माणसाच्या तर चेहर्यावरची पार रया गेली होती
शब्दांवाचून जणू ही दुनिया मुकी झाली होती
नवरेमंडळी मात्र जाम खुश होती
कधी नव्हे ते घरात शांतता नांदत होती
बायकांची मात्र खूप पंचाईत झाली
मूग गिळून बसायची सवय राहिली नाही
मग हातवारे, ईशारे यांची मदत घेतली गेली
तरी काही केल्या रोजच्यासारखी मजा नाही आली
या सगळ्यात भावना मात्र खुश होत्या
आज त्या मुक्तपणे अखंड वाहत होत्या
कुणाच्या स्पर्शात, कुणाच्या नजरेत
कुणाच्या अश्रुत तर कुणाच्या हसण्यात
आज त्या दिलखुलास बोलत होत्या
हळूहळू माणसाला शब्दांविना कळू लागले
शब्दांचा फाफटपसारा आणि फोलपणा
आहे खरा अनासायी हेही कळून चुकले
नको नेहमी शब्दांचा आसरा
जाणिवाही असतात खूप बोलक्या
आज त्याला हे मनोमन पटले होते
शब्दांच्या चोराने खरंतर
माणसावर उपकारच केले होते
