शब्द
शब्द
शब्दांनीच होतो मनामनाचा मेळ
शब्दांनीच होतो नात्यांचा खेळ
शब्दच असतात मनाला भावणारे
शब्दच असतात हृदयाला डिवचणारे
शब्दच बिंबवितात खूप काही मनावर
शब्दच छेदतात मनाला आरपार
शब्दांनीच वाढतो कलह
शब्दच करतात त्यांचा सुलाह
शब्द बोचतात त्या धारदार काट्यांसारखे
शब्दच जखमेवर फुंकर घालतात मंद हवेसारखे
शब्द मांडतात कित्येक कैफियती
शब्द विस्कटवितात सरळ कहाणी
बोलल्या जाणाऱ्या शब्दांचे रुप वेगळे असते
पण जे शब्द कधी बोलले गेले नाही त्यांचे मर्मच अनोखे असते
निःशब्दात ही शब्द लपतो
भावनांचा तो कल्लोळ असतो
शब्दांनीच गुंफली जातात ती काही नाती
शब्दांनीच होते कधी नात्यांची माती
वक्त्याला श्रोत्यांशी बांधणारे शब्द असतात
लेखकाच्या भावना वाचकाला कळविणारे शब्दच असतात
शब्दांनी जिंकता येते अवघ्या विश्वाचे मन
शब्दच टिकवितात विश्वासरूपी धन
आपलेच शब्द मांडता आपले विचार
कटु शब्दांमुळेच होतो आपला तिरस्कार
क्षणभंगुर असतात काही शब्द
तर काही असतात शाश्वत
ज्यांच्यासाठी उच्चारीले जातात शब्द
त्यांनाच कळतं त्यातील रहस्य
शब्द कधी झेलले जातात
कधी वाचले तर कधी समजविले जातात
शब्दांचे गुलाम तर सगळेच पण
शब्दांचा बादशहा मिळणे दुर्मिळच
शब्दांचे असते खूप मोल
तेच सावरता वेळोवेळी तोल
शब्दांची ही ऐसी अनोखी माया
कळणाऱ्यालाच कळते त्यातील किमया
