साडी
साडी


लहानपणी नेसली होती आईने साडी,
मलाही तिच्या साड्यांची लागली होती गोडी
आई म्हणे साडीसोबत हवी एक नथ आणि गजरा,
कुंकू लावे, बांगड्या घाले, सुंदर दिसतो तिचा चेहरा लाजरा
सासू तिची, आजी माझी, काजळ लावे तिला,
म्हणे "लागू नयेत कुणाच्या नजरा, असाच ठेव गृहलक्ष्मी तुझा चेहरा हसरा"
हळूहळू मोठे झाले, मग स्वतःच नेसू लागले
तेव्हा कळले की साडीचा सोनेरी काठ,
म्हणजेच आयुष्यात पडलेली माझा मैत्रिणींसोबतची गाठ
नोकरीला जाते मी साडी नेसून, कधी झाले यशस्वी, कधी जाई खचून
मग झाले लग्न, ब
ालपण सरले, लागले मेहनतीला पदर खोचून
साडीची एक एक निरी, जीवनाला जोडलेली अनुभव ती खरी
जीवन कधी गोड लागले तर कधी कडू,
प्रवास झाला पन्नाशीचा, पण वाटते आत्ताच जन्मले जणू
लाभलं प्रेम, लाभली मैत्री, लाभलं मातृत्व,
लाभली माया, लाभली शांती, झाले मन तृप्त!
वर्षानुवर्षं अशीच पडू दे सुखांची सरी,
साडी अशीच नेसून गाठू आता शंभरी!
पंतवंडांना सांगेन मी म्हातारपणीदेखील :
"लहानपणी नेसली होती आईने साडी,
कधी कळेना मला लागली या साडीची गोडी!"