ऋतूराज वसंत
ऋतूराज वसंत
सहा ऋतूंचे सहा सोहळे
निसर्गाचे ऋतुचक्र वेगळे
प्रत्येकाचे रुप आगळे
ऋतूराज वसंताचे खूप निराळे l
निसर्गाने कूस बदलता
ऋतू गेला बदलूनी
शिशिराला मग निरोप द्याया
आला ऋतू वसंत बहरुनी l
स्पर्शात त्याच्या जणूं जादू भरली
सृष्टी मनमोहक जाहली
पानगळीच्या फांदीवरती
कोवळी चैत्रपालवी फुटली l
भेटीसाठी ऋतूराजाच्या होई
आरक्त देखणा गुलमोहोर
बहावाही आतूर होई
लेवूनी हळदीतुरे अंगभर l
किरमिजी शालू नेसूनी येई
काटेसावरी अवनीवरी
रक्तवर्णी ती पर्णे घेऊनी
बदाम लावी हजेरी l
मोहक गंधीत सुरंगी पिवळी
वनी नववधू सजली
जाई जुई मोगरा सायली
नाजूक अबोली करवली l
गाभुळलेली चिंच जडावूनी
वाके उंच शेंड्यावरी
फुले मोहोर पानोपानी
आमराईतल्या आम्रवृक्षावरी l
फणस काजूला फळेही धरती
लटके टपोरी जांभूळ स्वारी
जाळीमध्धी पिकती करवंदे
लयलूट रानमेव्याची दारी l
शितल उष्ण वारेही वाहती
फुटे सुस्वर कोकिळकंठातूनी
आसमंती चैतन्य पसरवीत
येई ऋतूराजा मोहरुनी l
निसर्गाने वसंत ऋतुला
दिधला नववर्षाचा मान
रांगोळ्या नी गुढी उभारुनी
त्याचा घरोघरी सन्मान l
सानुल्याशा चेत्रगौरीचे स्वागत माहेरी
वसंतपंचमी उधळत येई रंग केशरी
आल्हाददायकशा वातावरणी होई
प्रभू श्रीरामांचे आगमन भूवरी l
वसंताच्या सोहळ्याचे गाऊया गोडवे
अनुभवूया रमणीय सारे क्षण
निसर्गाच्या कॅलिडोस्कोपातील
हे तर पवित्र मंगल हे तोरण l
