पेरणी
पेरणी
1 min
43K
आभाळाचं आलं गाणं
मृगाच्या पावसासंगं
बळीराजाचा वं मोर
नाचतोय पाभरीसंगं
रिमझिम रिमझिम
घुमतोय कानी नाद
वाऱ्या संगतीनं घाली
त्याला मातीमाय साद
ढेकूळ झालंय मऊ
ताकातील लोण्यावाणी
बळीराजाचं काळीज
हलकं कापसावाणी
बेनं काढलं जपून
निवडून पाखडून
खांद्यावरी पिशवीत
मूठ मापात सोडून
अता वाफसा धरला
अधीर झाली धरणी
वाट पहातेय कुरी
बळीराजाची पेरणी
