ओढ पावसाची
ओढ पावसाची


(अष्टाक्षरी काव्य)
ग्रीष्माच्या या महिन्यात
होते अंगाची या लाही
वाहती घामाच्या धारा
आता सोसवत नाही ||१||
सरत येतो उन्हाळा
लागे पावसाची आस
पाण्याविना कशी आज
धरणी दिसे भकास ||२||
मृग नक्षत्रात लागे
काळ्या ढगांची चाहूल
गडगड होता नभी
नाचे मोर धरी ताल ||३||
पडे पावसाचे थेंब
पसरे मातीचा वास
शेतकरी राजा लागे
आता पेरणीचा ध्यास ||४||
आला पहिला पाऊस
भुई ओलीचिंब झाली
माना वरती करून
शेतात पिके डोलली
||५||
शोभूनी दिसे धरती
लेवूनी हिरवा साज
प्रसन्न होतसे मन
पाहुनी निसर्ग आज ||६||
पडे पहिला पाऊस
खळखळ वाहे झरे
दिसे इंद्रधनू नभी
हर्षाला सीमा न उरे ||७||
ओसंडून जाई नदी
वाहे दुधडी भरुनी
जातसे दूरच्या गावी
देण्या तान्हेलेल्या पाणी ||८||
पहिल्या पावसात या
मज भिजवेसे वाटे
आनंदाने माझ्या आज
नयनात अश्रू दाटे ||९||
ओढ लागे मज आज
येण्या पहिल्या पाऊस
विनंती करीतो देवा
निसर्गा कोपू नकोस ||१०||