ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

181
सरता दिवस ग्रिष्माचे
लागे मना ओढ पावसाची,
बरसतील मेघधारा
आस मिटेल धरणीची.
सृष्टी झेली ग्रिष्माच्या तप्त झळा
भेगाळलेली माती सोसी दुःखकळा,
धरणी क्षणात निवेल
ऋतू येता पावसाळा.
धरणीस ओढ लागे
वरुणाच्या मिलनाची,
विरह सरता वेळ आली
प्रणय प्रीतीनं नटण्याची.
वरूणाच्या प्रेमस्पर्शानं
धरणी अंतरंगी हर्षेल,
होता शिंपण जलामृताचे
धरित्रीची कूस उजवेल.
तहानलेल्या पशुपक्ष्यांना
लागे पावसाची आस,
तृषा शांत करण्या मनी असे
नभांगणीच्या मधुर थेंबाचा ध्यास.
भिजल्या मृदेचा कस्तुरीगंध
मना वाटे हवाहवासा,
चातकासवे बळीराजाही सांगे
ये ना लवकर पावसा.
मयुरासम प्रेमिकांनाही
लागे ओढ पावसाची,
श्रावणसरीत बेधुंद होण्या
व्हावी उधळण सप्तरंगी इंद्रधनुची.