न्यारे रंग वसंताचे
न्यारे रंग वसंताचे
पानगळी उदासीची
मळभं करण्या दूर..
घेउन आला वसंत
नवचैतन्याचा पूर..!
प्रफुल्लित दिसे सृष्टी
लेवून पल्लव साज..
चाहूलही वसंताची
आला बघा ऋतूराज..!
तरूशिखरावरती
कोकिळ गातसे गाणी..
वसंत आगमनाची
कुहूकुहू येई कानी..!
बालतृणाचे वनात
हिरवे रम्य गालीचे..
तपत्या ऊन्हात बघा
रूप तरूंच्या सालींचे..!
वृक्ष- वेली रस्तोरस्ती
फुलांचे घालती सडे..
मोहून घेती हरेका
त्यांची भुल सर्वा पडे..!
पळस फुलला असा
वन दिसे लालीलाल..
उगवतो सूर्य कसा
फेकूनी नभी गुलाल..!
सुमनेही सुगंधाची
उधळण करतात..
पशूपक्षी बघा त्याची
स्तुती गीतही गातात..!
मोहोर आंब्याचाही हा
घेऊन आला वसंत..
पानगळी नंतरही
फुटवे पालवी संथ..!
कोवळ्याच पालवीने
ही वसुंधरा नटली..
वसंत आगमनाने
पुन्हा खुलून उठली..!
न्यारे रंग वसंताचे
मोहित करते सर्वा..
रंग खुलविण्या स्वचे
निसर्गाची करा पर्वा..!!
