नातं
नातं
1 min
191
नातं त्याचं नि माझं काहीस आगळ वेगळं,
काय नाव द्याव त्याला नाही कधीच कळलं...
अनेक रूपांमध्ये तो भेटत आलाय मला,
प्रेमवर्षावात चिंब भिजवलय क्षणाक्षणाला...
कधी हलकेसे तर,कधी रिमझिम बरसायचा,
कधीतरी वेड्यागत तो धो धो कोसळायचा...
बऱ्याचदा लोचनांतही तो दाटून यायचा,
वेळी अवेळी मनातल्या रानात पडायचा...
कित्येकदा शमवलाय त्यानं दाह मनीचा,
फुंकर घालत काढलाय शूल अंतरीचा...
अनुभवलय त्याला अंगणात नाचताना,
अन सौदामिनीसवे भयभीत करताना...
बघितलयं वायुसवे पानावर झुलताना,
ऐकलयं त्याला पाखरांसवेही गातांना...
त्यानच तर दिले पंख कल्पनेच्या पाखराला,
अन् कविता होऊन तोच कागदावर उतरला...
