नाते निरागस तुझे नि माझे ....
नाते निरागस तुझे नि माझे ....
ती होती केवळ मैत्री की दोस्ती बालपणीची
जरी नव्हती तेव्हा जाणीव कसली
तरि, ओढ वेगळीच तुझी मला अन् तुलाही माझी होती
किती जमल्या मैत्रिणी आणि मित्र खेळण्या खेळ
मन शोधित राही तुला आणि मजसाठी तु हटुन राहिशी ...
खेळ भातुकलीचा , तो अजुन आठवतो , कधी कधी
राजी होतसे ' राणी ' तुझी दिसताच ' राजा ' माझा बोहल्यावरी ...
गंमत आज खरचं वाटते मला , आठवण होता तेव्हाची
असो खेळ लपाछपीचा किंवा चोर - शिपाई
मी मात्र तुझ्या टिममध्ये आणि तु माझ्या टिममध्येच असायचिस ....
आठवत असेल तुलाही कदाचित ,
शाळेतुन येताना ,
नेमकीच गाठ पडायची आपली विहिरीच्या काठावर,
गाभुळलेली चिंच मी हळुच द्यायचो तुला , आणि
चिमणीच्या दातानी तोडून द्यायचीस 'रावळगाव' तू मला !
नंतरहि कितीदातरी,
पुलापलीकडे कातळावर ,
वाट बघत असायचीस तु मैत्रिणीची, आणि शोधत मित्राला नेमकाच यायचो मी तिथे
भेटायचा नाही मित्र माझा अन्
विसरून जायची मैत्रिण तुझी ,
मैफील आपल्या गप्पांची मात्र
मस्त रंगुन जायची !............
त्या भेटीतील भाव कदाचित ,
जाणले होते, तुझ्याही आणि माझ्याही मनानी ....
कां कळेना , पण ना मिळाले शब्दरूप त्याना , आणि
तसेच राहिले हृदयी दडुनि ! .......
आज कधितरि आठवते सारे ,
पण खंत तयाची नाही बिलकुल
तसेच ठेवीन हृदयात लपवून मी
निरागस नाते, तुझे नि माझे !!
