मखमल
मखमल
पाऊस पडून गेल्यावर मी इवली इवली होते ,
पानांची नाजूक दुलई अलगद पांघरून घेते .
सभोवती हिरवी मखमल कृष्णाई आभाळाची ,
इंद्रधनुषी स्वप्ने घेऊन मी स्वच्छंद पाखरू होते.
मातीचा आवेग सारा थेंबाथेंबाला आकळतो,
पाऊस बावरा नकळत मृद्गंधाने दरवळतो.
वेलींची थरथर वेडी झाडांना पिसे करते,
ह्रदयीचे भाव अनामिक मी चांगलीच ओळखते.
पण नव्याने रूप तुझे हे अनोळखी मज आहे,
हा सखा नव्हे बरसणारा एवढे कळते आहे.
रुसणे तुझे आमच्यावर मी समजून घेते आहे,
तुझे रौद्र प्रभंजन होणे मी उमजून घेते आहे.
अंकुरणे तुझे कोंभातून आम्ही खुडतो आहे,
आकाशओढीने लसलसणे आम्ही कुस्करतो आहे.
मी माझ्यापुरते सोडविते कोडे अगतिकतेचे ,
तुझ्या अस्तित्वासाठी बंधन पाळेन मैत्रीचे.
एकेक रोपटे वळणावर तुझे अभिष्ट सांगणारे,
भेटेल तुला निःशंक माझे सुहृद व्यक्तणारे.
