कुब्जा
कुब्जा


कुब्जे तू खरंच भाग्यवान,
क्षणात तुला सुंदर बनवलं म्हणे "त्याने",
पण मला खात्री आहे, त्याने असा काही चमत्कार नक्कीच नसेल केला...
त्याने फक्त पाहिलं असेल, "तुला",
सुंदरतेची गुळगुळीत व्याख्या तोडून मोडून,
त्याने पाहिलं असेल, तुझं सुंदर कुबडेपण,
आणि त्यात जपलेलं तुझ सुंदर मन...
खरचं कुब्जे तू खरी भाग्यवान..
जी त्याला दिसली, ती सुंदरता, हल्ली नाही दिसत कोणालाच..
हल्ली रोज मोजली जाते, एक एक नजरेत, माणसाची लांबी, रुंदी, उंची,
नाकाची धार, केसांची गुणवत्ता, गोरीपान चमडी...
आणि श्रीकृष्णाच्या डोळ्यात दिसलेली तुझी निर्मळ सुंदरता,
आज गुदमरून गेली आहे, असंख्य सौंदर्य उत्पादनांच्या विळख्यात...
बघणाऱ्याच्या डोळ्यांत दिसणारी ती,
आता शोधत असते आपले अस्तित्व कॅमेऱ्याच्या सेल्फीमध्ये...
मानलंच जरी मी की केला होता "त्याने" हा चमत्कार,
आणि दूर केलं होत तुझं कुबडेपण,
मग आता समाजाला आलेलं सुंदरतेचं कुबडेपण नाहीसं करायला,
सांगशील का तुझ्या श्रीकृष्णाला पुन्हा इथे यायला...