कृष्णशेला
कृष्णशेला
1 min
41K
ही कुणी पसरली नभात केशरलाली
जणू हास्य उमटले अंधाराच्या गाली
किलबिल पक्ष्यांचा नाद सुरू जाहला
मातीने उचलल्या काळोखाच्या शाली
कळसावर शोभे रविकिरणांचे झुंबर
लेवून सोनसळी नटू लागले अंबर
दशदिशांत घुमते अझान अल्ला ईश्वर
धूप फुलांत सजतो समाधानी औदुंबर
दव सरकुनी लपले अवनीच्या गर्भात
कळी दिव्यात होई खेळ जुना परसात
तुळशीच्या ओटी वात कुणी सावरते
खांद्यावर केसांतून झडे बरसात
चौकावर शेकोट्यांच्या ओळी सजल्या
रस्त्यावर झुकत्या दीपतारका विझल्या
झिजल्या वहाणा तरी ना झिजलेले पाय
"चला" म्हणुनी हसऱ्या पायवाटा गजबजल्या!!!
