कॉफी आणि बरंच काही
कॉफी आणि बरंच काही


तुला आठवतं आपण दोघे कॉफी शॉप मध्ये भेटायचो ते
कॉफी नेहमी तशीच असायची वाफाळलेली आणि आपली मनं सुद्धा
इतरांच्या ही कॉफीचा सुगंध दरवळायचा की आसपास
पण का कुणास ठाऊक आपली कॉफी सूर शोधत असायची एकमेकांचा
साखरेच्या पाकिटात असलेला गोडसर चांदवा विरघळायचो आपण एकमेकांच्या कपात
आणि त्या कपाच्या वर्तुळातून शांत, पूर्ण असलेला चंद्र वाहायचा वाफा बनून आसमंतात
मग पुन्हा तो वेटर हलकेच आपल्या सहवासाचे क्षण मेनू कार्ड मध्ये देऊन जायचा
माझी निवड तुझी आवड भिन्न असली तरी कॉफी च्या कपात स्वप्नांची एकच चव उतरवून जायचा
आता नक्षत्राच चांदणं व्यापून घ्यायचं ते कॉफी च वलय आणि हळुवार गप्पांचे लयबद्ध तराने व्हायचे
कॉफी शेजारीच नीट घडी घालून बसलेल्या टिशू पेपर ला स्पर्शाचे शुभ्र नाजूक बहाणे मिळायचे
मौनांचीही भाषांतरे व्हायची गडद कॉफीच्या रंगासारखी
आणि मग ती कॉफी व्यक्त व्हायची ओठांजवळ त्या गर्द पसाऱ्यात
की काहीतरी खूप स्ट्रॉंग होतय तिथे आत खूप खोल मनाच्या कोपऱ्यात
उगाचच पुटपुटायची कॉफी, तुम्ही दोघे आता हो म्हणा किंवा नाही
पण स्ट्रॉंग होतंय ती नक्की कॉफी च ना की बरंच काही ?