काव्य केतू
काव्य केतू
टबोण्या टप्पारावरती धुवारीची झालोरी,
कधी अवचित सुटे झकार काकरडोंगरी।
वारा वाजवी गुल्मपर्णाची घमंडी झंझरी,
लागला झकू झडीबदलीचा का घनघोरी||१||
काकसावळ्या मेघांची गगनगर्भी खुमारी,
मावळतीच्या आडरानी घनघोफी गुंगारी|
गडकोणात दुधाळ धोदाना फुटून पाझरी,
डोऱ्या सरितेस आली जलप्रपाती धोदरी||२||
डोबोडोबी वर्षाबिंदू जणू नाचती खाचरी,
टुचबाज नारी बाजिंदी टुचकोली पाखरी|
झावर लाल कोरी पालवीची झाल पांघरी,
पानकळाच्या वेणा लपवी नभात काकरी||३||
सावड चावड हुरहुरती उरात उठे काफरी,
असा पाऊस मातता स्वर का होई किनरी|
दाटता ढवंढाय स्वप्नचूराडा बिलोरी अंतरी,
समाधीचा कुण्या ना विझावा दिवा खापरी||४||
——
सये काठाच्या बनी ये ना टाळीत चुकार नजरा,
ओढूनी टुकार चंद्र खोस कुंतली माळून गजरा।
गोजिरी लावा कशी तुरकली तितर संगे खाचरा,
कमयजात केळ आले पाहून थरका मोर नाचरा।।१।।
धानी पदराशी चाळा कोंदणी गर्भार सयींचा पेरा,
भाळी का रेखिला हुकल्या प्रितीचा प्राक्तन फेरा।
जरी निकुंजात पडला डोऱ्या भिंगार मैनांचा घेरा,
होईल गगनगर्ती नामोसी कसा गं टाकू राघव डेरा।।२।।
नजरेचा पारा गंध न्यारा नाही देहाचा थांग व्होरा,
उनाड वारा उमर घाट कोरा पसारा डोहाचा भोरा।
केवडबनी काती माल्हनीवर फड्या नागाचा जोरा,
राकेच्या नभी चांदण हळदीत डागाळला चांद गोरा।।३।।
