जय जिजाऊ
जय जिजाऊ
दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिराऊ
जय जय, जय जय जय जिजाऊ॥धृ॥
पराक्रमाचा आदर्श दिला बालशिवबाला
दिले शौर्याचे चैतन्य अवघ्या महाराष्ट्राला॥1॥
बारा बलुतेदारांना सगळ्यांचे केले भाऊ
स्वातंत्र्यास्तव सर्वा बनविले लढाऊ॥2॥
रयतेच्या रक्षणाला दिली हाती तलवार
रूढीकर्मकांडावर केलास प्रहार॥3॥
जोडिलेस माणूस येथे बनविले भाऊ
अजिंक्य शिवशंभूंनाही घडविलेस आऊ ॥4॥
लेकरापरी रयतेवरी लावुनिया माया
स्वातंत्र्यासाठी अखंड झिजविलीस काया॥5॥
दुःखितांची आई तू महाराष्ट्राची माता
तुझ्या चरणी ठेवितो विनम्र हा माथा॥6॥
तुझ्यामुळे शिवराय अन शूरशंभूछावा
तुच शौर्य वात्सल्य अन ममतेचा ठेवा॥7॥
तुझ्यामुळेच धाडस तुझी दिव्यप्रेरणा
तुझ्यामुळेच सामर्थ्य अन भावंडभावना॥8॥
तुझ्यामुळेच शिवशाही अन् हरहरचा घोष
तुच संपविलास येथे जातीजातीतील व्देष॥9॥
