जमीन
जमीन
स्त्रीत्वाचा समान धागा बांधत
तिने अवकाश शोधत
उत्तुंग भरारी घेत
त्याला कवेत घेतलं
जखडून ठेवणारी प्रत्येक
बेडी तोडली तिने
पारंपारिक समज ,अंधश्रध्दा
स्त्रियांना सोसावे लागणारे दुय्यमत्व
इतकच नाही तर
आयुष्यातले खचवणारे प्रसंग
या सार्याच्या पलीकडे जात
तिने नव्या वाटा शोधल्या
पाहिली नवी सर्जनशील स्वप्नं
केली जुलूम आणि अनिश्चततेवर मात
हे अंगण केवळ स्वतः पुरते नाही
अनेक स्वप्न या अंगणात विसावली
वाचलयं तिनं...
ती अर्धा अवकाशाची मालकीण
पण नाही होत अर्थबोध तिला
कारण जीवन जगतानाची विसंगती
मग ती पडते संघर्षाला बळी
कारण 'एका पुरूषाने आपल्याला
हवे असलेले जग निर्माण करावे'
ही तिची अपेक्षा ठरते फोल
मग ती सरसावते
आपले जग आपण बांधण्यासाठी
चाकोरीच्या बाहेर जाऊन
ठसा उमटवण्यासाठी
तिचा बुलंद आवाज आभाळात
पोचवणारे क्षणिक तरंग
bhadule तिच्या ह्रद्यावर
चिरंतन आणि प्रेरणादायी
तिच्या व्यक्तिमत्वाला...
फुटतात धुमारे, पडतात कंगोरे
पण, तसं जमीन मिळणं
अवघड असतं नाही का?
ती झगडत राहते
स्वतः सोबतच इतरांसाठीही
ती जमीन शोधतीय आज ही
