जाणीव
जाणीव
आकाशात जागा विकत घेतली आहे म्हणे माणसाने,
म्हणजे आता त्या जागेवर परत कधीच ढग दिसणार नाहीत फिरताना,
नाही त्यांचे वेडेवाकडे आकार दिसतील तयार होताना,
ना दिसेल आकाशाची निळाई,
ज्यावर रात्री अंधार दाटून येऊन लुकलुकत्या चांदण्यांच्या वस्त्या दिसायच्या,
त्या जागेवरून मन चिंब करून टाकणारा पाऊसही पडणार नाही कदाचित किंवा आलाच जरी एखादा ढग दाटून त्याच्या पुढ्यात तर,
त्या दाटून आलेल्या ढगामधलं पाणीसुद्धा तो थांबवून ठेवेल,
स्वतः च्या गरजा पूर्ण करण्यासाठी,
आलाच एखादा पक्षी उडत उडत त्याच्या दारावर,
थांबला क्षणभर विसाव्यासाठी तर त्याला फसवून मारून खायलाही तो मागे पुढे पाहणार नाही,
मळभ दाटून आल्यावर त्याला आठवणसुद्धा येणार नाही जिवलागांची कारण,
त्याच्यासाठी क्षितिजापलीकडे गेली असतील सगळीच नाती,
वाऱ्यालासुद्धा त्याने दिशा नेमून दिल्या असतील फिरण्यासाठी बंदिस्तपणे,
आता आकाशात निरभ्र असं काहीच नसेल,
नाही मोकळं असेल आकाश पूर्वीसारखं,
कारण आकाशात जागा विकत घेतली आहे म्हणे माणसाने...
