इंद्रायणी
इंद्रायणी
काही दिवसांपूर्वी,
उन्हाच्या झळांनी क्षीण होत चाललेली,
इंद्रायणी दिसली,
'आता मरूनच जाईल'
असं वाटत असतानाच,
रखमाईने आभाळाकरवी धाडलेली
माहेरची ओटी पोहोचली..
प्रवाहात एकरूप होत,
मी विसावलो तिच्या काठी..
विसरून गेलो,
जगाने दिलेले नाव गाव पत्ता..
आणि फक्त राहिली ती आणि मी...
आजपर्यंत नुसतंच सोसतच आलेली,
माय,
आज स्वतः नटली होती,
ओटीभरण असलेल्या पोटुशीसारखी..
तिच्या गर्भार तळात,
लक्षवेळा पुनर्जन्म घेणारे बाळ..
उशाला ज्ञानेश्वरी घेऊन,
गाथेला नाळ जोडून,
समाधिस्थ निजले होते..
इंद्रायणी म्हणते,
बाळा...
नाळ तुटू देऊ नको,
डोक्याखालून ज्ञानेश्वरी काढू नको...
मी नऊ महिने वाहत राहीन,
वारी करत राहीन,
तू जग..
तू वाढ..
चैतन्यमय हो..
माझ्यातला एक झरा घेऊन..
मागच्या जन्मीची कोरी पाने घेऊन,
चांगदेवासारखा आलास,
पण मरून माझ्यात सामावताना
ज्ञानेशाची ओवी होऊन ये..
जन्म घेऊन विलग व्हावं लागतं आईपासून
मी ही जड पावलांनी निघालो..
डोळे भरून वळून पाहिले,
आणि ती मला मुक्ताई भासली..
