घनःश्याम श्रावण
घनःश्याम श्रावण
1 min
174
श्यामवर्ण घन नभी ते आले
घनःश्याम रुप मजला गमले
रिमझिम संतत पाऊस येतो
तवकृपेचा वर्षाव जणू होतो
तृणपाती हिरवी मखमाली
नाजूक रंगीत फुले उमलली
जलबिंदूंचे वर जडले मोती
मोरमुगुट तव वाटे चित्ती
बघे सूर्यबिंब ढगाआडूनी
केशर पिवळे ऊन लेऊनी
सोनरुपेरी हे नभांगण दिसे
तव पितांबर मज तो भासे
कोकीळ करीते मंजूळ कुजन
मुरलीचे तव मधूर गुंजन
थंडगार हा चंचल समिरण
तव नुपुरांची वाटे रूणझुण
अल्लड हा निर्झर खळखळ
वाहून नेई शामवर्ण जळ
उडती स्वैर वाऱ्याने कोमल
कुरळे कुरळे तव ते कुंतल
आला श्रावण आला श्रावण
इंद्रधनुचे आकाशी तोरण
मेघश्यामा तुझ्या स्वागता
सज्ज जाहली धरती माता,
